सुंदर आकर्षक चपळ शरीरासाठी रोज करा अश्विनी मुद्रा. ही एक योगमुद्रा आहे. काही तज्ञांच्या मते हे एक आसन आहे. याला कोणी कोणी “विलोमासन’सुद्धा म्हणतात. ही करण्याची पद्धती सर्वांगासनाशी मिळती-जुळती आहे. यामध्ये गळ्यापासून बैठकीपर्यंतचा भाग हा जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत असतो.
प्रथम जमिनीवर उताणे झोपावे म्हणजे शयनस्थिती घ्यावी. नाकाने श्वास आत घेऊन रोखावा, मग दोन्ही पाय जुळवून हळूहळू वर करावेत. दोन्ही हातांनी कंबरेच्या खाली नितंबांना आधार द्यावा. आपल्या हाताचे कोपरे जमिनीला टेकलेलेच ठेवावे आणि या स्थितीत स्थिर रहावे. आता नेहमीचा श्वासोश्वास करावा.
आपली दृष्टी पायाच्या अंगठ्यावर स्थिर करावी. या आसनामध्ये खाली डोके वर पाय अशी शरीराची उलटी अवस्था असते. म्हणजेच विपरीत कार्य असते. म्हणूनच हिला विपरीत करणी म्हणतात. ही मुद्रा तज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावी.
प्रथम ती एक मिनिटापर्यंत करावी. पाय वर उचलताना श्वास घेत घेत उचलत द्विपाद उत्तानपादासनात जावे. कंबर वर उचलताना सावकाश श्वास सोडत उचलावी. डोक्यावरून दोन्ही पाय तोल सांभाळता येईल इतपतच मागे घ्यावे. चवडे ताणून धरावे, दोन्ही हातांनी कटिबंधाच्या हाडाखाली आधार देतच आपण पाय उभे करतो. आसन सोडताना श्वास घेत हळूहळू श्वास सोडत तोल सांभाळत द्विपाद उत्तानपादासनात यावे मग दोन्ही पाय सावकाश श्वास सोडत खाली आणावे व अलगद जमिनीवर टेकवावे. या आसनात पाठ तिरकी आणि मान पूर्णपणे मोकळी रहाते. म्हणजेच कोणताही बंध बांधला जात नाही. सरावाने हे आसन आदर्श करता येते.
साधारणपणे दोन ते तीन मिनिटांपर्यंत स्थिरता राखता येते. पण रोज केले तर सहा मिनिटांपर्यंत मनातल्या मनात अवयव ध्यान करत सहज टिकवता येते. प्रत्येकाने हे आसन रोज जरूर करावे. कारण या आसनाचे फायदे खूप आहेत. एक तर आपण पाय उभे करतो. त्यामुळे विपरीत अवस्थेमुळे हृदयातील सर्व अवयवांमधील अशुद्ध रक्त हृद्याकडे गुरूत्वाकर्षणामुळे आपोआप वहाते. त्याचप्रमाणे पाय हृद्यापासून उंच नेल्याने शुद्ध रक्त पुरवठा होताना थोडा ताण येतो. पायाचे स्नायू आपण ढिले सोडतो. त्यामुळे रक्ताची जरूरी कमी होते. हृद्याचा ताणही कमी होतो.
मुख्य म्हणजे विपरित करणीमुळे वृद्धत्व येत नाही. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही आणि पडल्याच तर त्या नाहीशा होतात. जठाराग्नि प्रदिप्त होतो. केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. शरीर चपळ बनते. काही लोकांना उष्णतेमुळे गळवे, पुरळ, खरूज असे रक्त दोषजन्य रोग होतात. पण नियमित विपरीतकरणी केली असता ते समूळ बरे होतात. नित्य सरावाने गंडमाळेचा रोगही जातो. दृष्टी तेजस्वी बनते, शरीर, सुंदर, आकर्षक, बलवान तर होतेच पण सर्व शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे प्रवाहीत होतो. हत्तीरोगातही ही मुद्रा करवून घेतली जाते. जर एखाद्या व्यक्तीस हत्तीरोगाची सुरूवात असेल तर तिने हे विलोमासन जरूर करावे.
एकंदरीत आपल्या शरीरावरील, हातापायावरील, चेहऱ्यावरील सूज कमी करणारे, पाठदुखी, कंबरदुखी घालवणारी व चेतना देणारी ही आसन मुद्रा आहे. पण हटप्रदिपिकेमध्ये ही एक मुद्रा मानली आहे. मुद्रा असो वा आसन तुम्ही ते नियमित करणे आवश्यक आहे. दोन तीन मिनिटे तरी करावे. मात्र हृदयविकार व रक्तदाब असलेल्यांनी हे आसन करू नये. तसेच दैनंदिन सरावात पाय थरथरू लागताच सरळ आसन सोडावे. विपरित करणी केल्यानंतर शक्यतो अश्विनी मुद्रा करावी. ही मुद्रा केल्याने कंबरेचे स्नायू मजबूत होतात. तसेच शौचाला साफ होते. स्त्रियांचे मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स जातात.
आता ही अश्विनी मुद्रा कशी करायची तर ज्यावेळी तुम्ही विपरित करणी पाय डोक्यावर घेता तेव्हा ते पाय गुडघ्यात दुमडून कटीप्रदेशातील पृष्ठभागापाशी किंवा गुदद्वाराजवळ मुडपून तेथील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण कमीत कमी 50 वेळा करावे. ही मुद्रा योग्य योगशिक्षकाच्या मार्गदर्शना खालीच करणे हितावह आहे. जरी करायला अवघड वाटली तरी पण कंबरदुखी बरी करणारी तसेच गुडघेदुखी होऊ न देणारी ही अश्विनीमुद्रा आहे.