मोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये जुलाब होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याची शक्यताही लहान मुलांमध्ये जास्त असते. अशावेळी आहाराची योग्य काळजी घेतली नाही तर शरीरातील पाणी व क्षारांचा समतोल बिघडून जीवावरही बेतू शकते.
डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत
लहान मुलांमधील जुलाबाची कारणे:
लहान मुलांमध्ये जुलाबाची अनेक कारणे असली तरी महत्त्वाचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग. काही विषाणू व जीवाणूजन्य जंतुसंसर्गांमध्ये जुलाब होऊ शकतात. या जुलाबांची तीव्रता जास्त असते आणि ते काही दिवस अथवा आठवड्यांपर्यंतही (जंतुसंसर्ग नाहीसा होईपर्यंत) टिकू शकतात. बर्याचदा या जुलाबाच्या बरोबरीने उलट्या, मळमळ, ताप अशी लक्षणेही दिसतात.
उघड्यावरचे अन्न खाणे, खाण्यातून विषबाधा होणे, अपचन, एखाद्या पदार्थाची ऍलर्जी, ऍन्टीबायोटिक्ससारखी औषधे ही लहान मुलांमधील जुलाबाची आणखी काही कारणे. हे जुलाब त्यामानाने कमी तीव्रतेचे असतात व लवकर थांबतात.
बऱ्याचदा पालक एखादा जुलाब झाला तरी घाबरून जातात आणि लगेचच मुलांच्या आहारावर खूप बंधने आणतात. खरंतर असे करायची गरज नाही. दिवसातून चार पेक्षा जास्त वेळा जुलाब झाले तर मात्र आहारामध्ये खालील उपाययोजना आमलात आणायला हव्या.
आहारातील काही पदार्थ जुलाब वाढवू शकतात तर काही पदार्थ जुलाब थांबायला किंवा त्यांचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतात.
मुलांना जुलाब होत असताना कोणते पदार्थ द्यावेत?
जुलाब होत असताना सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते ती शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊ नये याची. त्यासाठी फक्त भरपूर पाणी पिणे पुरेसे नाही कारण पाण्यात सगळे क्षार नसतात. साध्या पाण्याऐवजी नारळपाणी, इलेक्ट्रॉल/ओ.आर.एस./लिंबू सरबत/ताजे पातळ ताक (किंचीत मीठ व साखर घालून)/चिकनसूप (ब्रॉथ) यासारखे द्रवपदार्थ उपयुक्त ठरतात. घरच्या घरी तयार करता येण्यासारखी जलसंजीवनी जुलाबांवर उत्तम उपाय ठरते.
जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत:
एक लिटर उकळून गार केलेल्या पाण्यात सपाट चमचे (टीस्पून) साखर किंवा ग्लुकोज पावडर व अर्धा सपाट चमचा मीठ घालून ढवळावे. यात थोडे लिंबूही पिळता येईल. हे पाणी जुलाब होत असताना थोडे थोडे देत रहावे. एक वर्षाच्या आतील बाळांना दिवसभरात अर्धा लिटर तर त्यापेक्षा मोठ्या मुलांना दिवसभरात किमान एक लिटर जलसंजीवनी द्यावी (डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की प्रमाण ठरवावे). जलसंजीवनी सलाईनसारखे काम करते आणि जुलाबांमध्ये होणारे डिहायड्रेशन टाळायला मदत करते.
मुलांना जुलाबांबरोबर उलट्या होत असतील तर तोंडाने घेतलेले पाणी अथवा जलसंजीवनी पोटात टिकत नाही. अशावेळी एकदम खूप द्रवपदार्थ देऊ नयेत. घोट – घोट द्यावेत. यावेळी पॉप्सिकल्स (क्षारयुक्त पाण्याचे गोठवलेले बर्फाचे गोळे) चोखायला देता येतात.
बाळ स्तनपान घेत असेल तर जुलाब होत असतानाही स्तनपान सुरु ठेवावे.
जुलाब होत असताना द्रवपदार्थांबरोबर आहारात पचायला अगदी हलक्या पदार्थांचा समावेश करता येतो. उदा. मऊ भात, मुगाचे कढण, मुगाची डाळ व तांदूळ यांची खिचडी, रव्याचा पातळ उपमा, शिरा, दही, दही-भात, तांदळाचे घावन, इडली, डोसा, व्हाईट ओट्सची पेज, साबुदाणा कांजी, रव्याची कांजी, अरारूट कांजी, केळ, साल काढून वाफवून घेतलेले सफरचंद, उकडलेला बटाटा, पांढऱ्या ब्रेडचा टोस्ट इ.
या पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थांचे प्रमाण कमी असल्याने व दह्यातील उपयुक्त जीवाणू पोटात गेल्यामुळे जुलाब थांबायलाही मदत होते. दही मात्र ताजे व घरी लावलेले असावे. विकतचे दही पाश्चराईज्ड असल्याने त्यात मित्र जीवाणूंची संख्या कमी असते.
वरीलप्रमाणे घनपदार्थ देताना ते थोड्या प्रमाणात व थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने द्यावेत म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच जुलाब होणार नाही.
जुलाब होत असताना तोंडाची चव जाते. त्यासाठी मुलांना अधून मधून आल्याचा रस – काळे मीठ – गूळ व लिंबू यांचे चाटण द्यावे. हे पचनासही मदत करते.
जायफळाचा तुकडा पाण्यात उगाळून चाटवल्यानेही जुलाब कमी व्हायला मदत होते. जलसंजीवनी अथवा लिंबाच्या सरबतात थोडी जिरेपूड अथवा बडीशेपेची पूड घालूनही फायदा होतो.
मुलांना जुलाब होत असताना कोणते पदार्थ टाळावेत?
जुलाब होत असताना फळांचे अथवा भाज्यांचे रस (ज्यूस), भाज्यांचे सूप, सॅलड्स / कोशिंबीर, पालेभाज्या, मोडाची कडधान्ये, सालासकटची धान्ये असे तंतूमय पदार्थ जास्त असणारे पदार्थ टाळावेत. दूध, पनीर, खवा यासारखे दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, व मांसाहारी पदार्थही देणे टाळावे. याबरोबरच पॅकबंद पदार्थ, शीतपेये, चहा, कॉफीसारखी उत्तेजक पेये, बाहेरील/ उघड्यावरील पदार्थ, तिखट, मसालेदार आणि तेलकट / तळलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. या पदार्थांमुळे जुलाब वाढू शकतात.
ज्या भाज्यांनी पोटात गॅसेस होण्याची शक्यता असते अशा फळभाज्या टाळाव्या. उदा. मुळा, कोबी, वाटाणा, हरबरा, ढोबळी मिरची, फ्लॉवर, मका, बिन्स इ.खूप गरम अथवा खूप गार पदार्थ देणेही टाळावे. टोकाच्या तापमानामुळे देखील जुलाब वाढू शकतात. त्यामुळे सर्व पदार्थ रूम टेंपरेचरला असताना द्यावेत.
या व्यतिरिक्त मुलांना एखादा ठराविक पदार्थ खाल्यानंतर जुलाब होतात का याकडे बारीक लक्ष ठेवावे. तशी शंका आल्यास तो पदार्थ आहारात पूर्णपणे वर्ज्य करावा आणि जुलाब थांबतात का ते पहावे. जुलाब होण्यामागे एखाद्या पदार्थाची ऍलर्जी / अपचन हे कारणही असू शकते.
मुलांना जुलाब होत असल्यास आपल्या मनाने औषधे देऊ नयेत. एखादा दिवस जुलाब थांबायची वाट पाहावी, आहारात वर सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी. हे करूनही जुलाब न थांबल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
- खालील लक्षणे दिसल्यास मात्र न थांबता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:
- दिवसातून चार किंवा अधिक जुलाब होणे किंवा तीन दिवसापेक्षा जास्त जुलाब होत रहाणे.
- पोटात पाणी न टिकणे, जुलाबाबरोबर उलट्या होणे, पोट दुखणे, जुलाबातून रक्त जाणे
- अतिशय गडद रंगाची लघवी होणे अथवा तासात लघवी न होणे
- तोंड आणि त्वचा खूप कोरडी पडणे (त्वचेवर चिमटा काढल्यास त्वचा तशीच सुरकुतली रहाणे)
- लहान बाळांमध्ये रडताना डोळ्यातून पाणी न येणे
खूप ताप येणे - मरगळ, खूप थकवा, उभे रहाता न येणे
- डोळ्यांवर सारखी झापड येणे, डोळे खोल जाणे
लहान मुलांना जुलाब होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना चटकन जंतुसंसर्ग होऊन जुलाब होऊ शकतात. लहान मुलांमधील जुलाबाची काही कारणे सहज टाळण्यासारखी आहेत. उघड्यावरचे व अस्वच्छ अन्न खाणे हे जुलाबाचे एक महत्वाचे कारण आहे. हे टाळण्यासाठी लहान मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ विशेषतः न शिजवलेले पदार्थ (भेळ, पाणीपुरी, फ्रूटचाट, ज्यूसेस), दूधाचे पदार्थ (लस्सी, ताक, मठ्ठा, मिल्कशेक्स, आईसक्रीम, मिठाई) व रस्त्याच्या कडेला उघड्यावर शिजवले आणि साठवले जाणारे पदार्थ देणे पूर्णपणे टाळावे. बाहेरचे पाणीही टाळावे.
बाहेर जाताना घरून पाण्याची बाटली घेऊन जावी. बाहेर पाणी पिण्याची वेळ आलीच तर पॅकबंद पाणी अथवा शहाळ्याचे ताजे पाणी द्यावे. घरीदेखील भाज्या स्वच्छ धुवून घेणे, पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे, खाली पडलेले उचलून न खाणे, जेवणापूर्वी हात-पाय स्वच्छ धुणे अशा सवयी लावून घ्यायलाच हव्यात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी रोज सकस आहार घेणे याला तर पर्याय नाहीच! जुलाब झाल्यावर उपाय करण्यापेक्षा जुलाब होऊच नयेत यासाठी शक्य तितकी काळजी घेणे चांगले. नाही का?