हल्ली बऱ्याच लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता दिसून येते. नियमितपणे पोट साफ न होणे (आठवड्यातून तीन पेक्षा कमी वेळा), खूप कोरडी आणि कडक शी होणे, शी करताना खूप जोर लावायला लागणे, पाय/ पोट आवळून धरणे, शी करताना दुखणे, शीमधून रक्त पडणे, वारंवार पोटात दुखणे ही बद्धकोष्ठतेची काही लक्षणे. जरी हा त्रास तात्पुरता असला तरी तो वारंवार व्हायला लागला तर वेळीच लक्ष द्यावे लागते. बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष केल्यास मूळव्याधीसारखे आजार उद्भवू शकतात.
बद्धकोष्ठतेची कारणे व उपाय:
अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यातील नको असलेल्या भागाची शी बनते. या प्रक्रियेस जर खूप वेळ लागला म्हणजेच अन्नाचा नको असलेला भाग आतड्यामधून अतिशय संथपणे पुढे सरकत राहिला किंवा एका जागी थांबून राहिला, तर त्यातील जास्तीत जास्त पाणी शरीरात शोषले जाते आणि शी कोरडी होते. म्हणजेच बद्धकोष्ठता होते. यासाठी खालील घटक कारण ठरू शकतात. यावरचे उपायही कारणानुसारच दिले आहेत.
वेळच्या वेळी शी न करणे:
अनेकदा मुले खेळायच्या नादात शी आली तरी दुर्लक्ष करतात. काही वेळा घराबाहेर असताना शी लागते आणि बाहेरची स्वछतागृहे वापरायला नको म्हणून मुले शी करत नाहीत. यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर अनेकदा शी करताना त्रास होतो, गुदद्वाराजवळ टोचते किंवा दुखते. हे पुन्हा पुन्हा सहन करायला लागू नये म्हणूनही मुले शी करायचे टाळतात आणि बद्धकोष्ठता अजूनच वाढते.
उपाय:
मुलांना ठराविक वेळी शी करायची सवय लावा. विशेषतः सकाळी खाऊन झाल्यानंतर त्यांना शी करायला घेऊन जा. पोट भरल्यावर झाल्यानंतर शी करणे सोपे जाईल. शी न केल्याने किंवा धरून ठेवल्याने त्रास वाढणार आहे हे मुलांना समजावून सांगा आणि शी आल्यावर ताबडतोब संडासात पाठवा. मुलांना बसायला सोपे जाईल, स्वच्छता असेल अशी व्यवस्था संडासात करा.
मुलांना लवकर संडास वापरायला शिकवणे :
कधी कधी पालक अतिउत्साहात मूल बसायला शिकताच सुरू करतात. काही वेळा मुलांना हे रुचत नाही, जमत नाही. मग याला विरोध करण्यासाठी मुले शी च्या वेळी रडारड, त्रागा करतात. शी धरून ठेवतात. यामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते.
उपाय:
मुले व्यवस्थित बसायला आणि चालायला लागली, शी आल्याचे सांगायला लागली, चड्डी काढू लागली, तुमच्या सोप्या सूचना ऐकून तसे वागायला शिकली की सुरू करा (साधारण वर्षानंतरच). त्याची खूप घाई करू नका, जबरदस्ती करू नका. त्यावेळी रडरड होत असेल, जमत नसेल तर थांबून थोड्या दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा.
आहारात तंतूमय पदार्थांचे (फळे, भाज्या, सालासकटची धान्ये) प्रमाण अतिशय कमी असणे:
मुलांना जेव्हा वरचे अन्न सुरु केले जाते तेव्हा बर्याचदा त्यात भाज्यांचे प्रमाण नगण्य असते. नंतरही बरीच मुले भाज्या – फळे खायला कुरकुर करतात. यामुळे मुलांन पुरेसे तंतूमय पदार्थ मिळत नाहीत व बद्धकोष्ठता होते.
उपाय:
अन्नाच्या पचनानंतर नको असलेले पदार्थ बाहेर टाकायला आणि शी मध्ये पाण्याचे प्रमाण धरून ठेवायला तंतूमय पदार्थ मदत करतात. यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते. यासाठी वरचे अन्न सुरु करतानाच मुलांना भाज्या व फळे खाण्याची सवय लावावी. नुसत्या भाज्या खायला मुले कुरकुर करत असतील तर भाज्यांचे पराठे, सूप, कोशिंबीरी, पचडी, रायते असे पदार्थ द्यावेत. या पदार्थांमधून भाज्या पोटात जातील. इतर स्वयंपाकातही शक्य तिथे भाज्या किसून घालाव्या. उदा. इडली, आप्पे, थालिपीठ इ. दिवसातून एक किंवा दोन ताजी फळे मुलांना द्यावीत (ज्यूस देऊ नयेत).
धान्ये देखील सालासकट वापरावी. केवळ गहू आणि तांदूळ न वापरता आहारात तंतूमय पदार्थांनी समृद्ध अशा ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा या धान्यांचा व सालासकट डाळी व कडधान्यांचा वापर करावा. बद्धकोष्ठता झाल्यावर किंवा बद्धकोष्ठता वारंवार होत असेल तर आहारात भिजवलेले काळे मनुके, अंजीर, सब्जा, पपई, पालेभाज्या, दही अशा पदार्थांचा आवर्जून समावेश करावा.
आहारात दूध, दूधाचे पदार्थ, मैदा (बेकरीचे पदार्थ), बटाटा, फास्ट फूड यांचे अतिप्रमाणात सेवन करणे.
अनेक मुले दूधाचे अतिसेवन करतात. सारखे दूध, दूध – पोळी, दूध- भात, मिल्कशेक, चीज, पनीर असे पदार्थ आहारात घेतल्याने तसेच बटाटा व मैद्याच्या पदार्थांचे सारखे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होते. या पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थ नसतात. फास्ट फूड (पिझ्झा, बर्गर, फिंगर चिप्स) नियमित खाणार्या मुलांमध्येही बद्धकोष्ठता होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. उपाय:
मुलांना घरचे ताजे अन्न द्यावे. विकतचे पॅकबंद पदार्थ पूर्ण टाळावे. घरीदेखील दूधाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. बर्याच मुलांना डब्यात बटाट्याची भाजीच लागते. इतर भाज्यांमध्येही बटाट्याचा सढळ हस्ते वापर केला असतो. ही सवय चांगली नाही. भाजी या गटातून बटाट्याला हद्दपार करावे! बटाटा, साबुदाणा, पिझ्झा कधीतरी खायचा असेल तर त्या दिवशी भरपूर भाज्या व कोशिंबीरी खायला पर्याय नाही हे मुलांना सांगा!
आहारात पाणी व द्रवपदार्थांचे प्रमाण अतिशय कमी असणे.
बरीच मुले पाणी प्यायला विसरतात, कंटाळा करतात किंवा खाल्यानंतर अगदी एखादा घोटच पाणी पितात. यामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते.
उपाय: प्रत्येक खाण्यानंतर किमान एक छोटा पेला भरून पाणी पिण्याची सवय मुलांना लावा. साध्या पाण्याबरोबरच नारळपाणी, ताक, भाज्यांचे सूप, कोकमचे किंवा आवळ्याचे किंवा लिंबाचे सरबत, जलजिरा अशी मुलांना आवडणारी पेये द्या. त्यातून पाणी पोटात जाईल. या पेयांमध्ये साखर व मीठाचा वापर शक्यतो टाळाच, करायचाच झाल्यास अगदी कमी प्रमाणात करा. शीतपेये पूर्णपणे टाळा.
पुरेशी हालचाल आणि व्यायामाचा आभाव:
आहाराबरोबरच व्यायामाचाही बद्धकोष्ठता टाळण्यात महत्वाचा वाटा आहे. नियमित व्यायाम केल्याने, खेळांमध्ये होणार्या हालचालींमुळेही बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. त्यामुळे मुलांच्या दिनचर्येत अभ्यासाइतकेच खेळांना आणि व्यायामाला महत्व द्या. घरी बैठे खेळ किंवा मोबाईलवरचे खेळ खेळण्यापेक्षा मोकळ्या हवेत खेळायला प्राधान्य द्या.
याशिवाय नेहमीच्या दिनचर्येतील बदल (प्रवास, तापमानातील बदल, दगदग), मुलांना ताण येईल अशा काही घटना (उदा. नवीन शाळा सुरू होण्याचा काळ, शाळेतल्या परीक्षा, स्पर्धा), काही औषधे यामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते. आजारपणात भूक मंदावते. अशावेळी कमी खाल्ले गेल्यानेही बद्धकोष्ठता होते.
बद्धकोष्ठता झाल्यास वर सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या. शक्यतो लहान मुलांमधील बद्धकोष्ठता योग्य ती काळजी घेतल्यास फार काळ टिकत नाही आणि वारंवार होतही नाही. पण बद्धकोष्ठता वारंवार होत असेल, आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकत असेल, बद्धकोष्ठतेबरोबर ताप असेल, पोट फुगले असेल, खाण्याची आजिबात इच्छा होत नसेल, मूल किरकिरे झाले असेल, वजन कमी होत असेल, शी मधून रक्त पडत असेल आणि गुदद्वारातून मोठ्या आतड्याचा लहानसा भाग/एखादा कोंब बाहेर आल्यासारखा वाटत असेल तर डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्या. आहारतज्ञांशी बोलून आहारात कुठे चूक होतेय का ते शोधून योग्य उपाययोजना करा. पोट नीट साफ होणे ही दैनंदिन जीवनातली खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यासाठी लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा!
-डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत