पुणे – माझ्या मुलीचे ना खाण्या-पिण्याचे खूपच नखरे आहेत. माझी मुलगी भाज्याच खात नाही, दूध पीत नाही. माझा मुलगा जेवताना एका जागी बसतच नाही, टी.व्ही. लावल्याशिवाय जेवतच नाही. त्याच्या आवडीचे असेल तरच खातो. अशा मुलांच्या खाण्या-पिण्याबाबतच्या बारीक-सारीक तक्रारी आपण नेहमीच ऐकतो. यापैकी बहुतांशी तक्रारींमागची कारणेही आपल्याला माहीत असतात आणि उपायही! पण काहीवेळा जेव्हा मुलांच्या खाण्याविषयीच्या टोकाच्या सवयी त्यांच्या आरोग्यावर परिणाम करायला लागतात, अगदी जीवावरही बेतू शकतात, तेव्हा त्यांना इटिंग डिसॉर्डर असे म्हणतात. इटिंग डिसॉर्डर प्रामुख्याने पौगंडावस्थेमध्ये आणि मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. पण सध्या मुलांमध्येही त्यांचे प्रमाण वाढत चालले आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही त्या आढळायला लागल्या आहेत.
इटिंग डिसॉर्डरचे खालील तीन प्रकार प्रामुख्याने दिसून येतात-
1) ऍनोरेक्झिया – यात मुले अतिशय बारीक असतात तरीही आपण जाड आहोत असा भास त्यांना होतो. त्यामुळे सतत बारीक होण्याबद्दलचेच विचार त्यांच्या मनात घोळत असतात. वजन अथवा चरबी वाढण्याच्या अनाठायी आणि तीव्र भीतीपोटी पुरेसा आहार घेतला जात नाही, आहारात ठराविक पदार्थ टाळले जातात. बारीक राहण्यासाठी अतिरिक्त व्यायाम केला जातो.
2) बुलिमिया – या प्रकारातही मुले वजनाबद्दल अतिशय जागरूक असतात पण ही मुले अतिरिक्त प्रमाणात खातात. खाताना त्यांचा स्वतःवर ताबा रहात नाही. खाऊन झाल्यानंतर त्यांना पश्चात्ताप होतो, आणि इतके खाल्ल्यामुळे वजन वाढू नये म्हणून खाल्यानंतर ही मुले उलटी काढून अन्न बाहेर काढून टाकतात. अतिरिक्त खाऊन वजन वाढू नये म्हणून रेचक किंवा एनिमा घेतात.
3) बिन्ज इटिंग – यात मुले अधाशीपणे खात सुटतात त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात खाल्ले जाते. कधीकधी तर खाणे असह्य होते तरीही मुले खात राहतात.
इटिंग डिसॉर्डर मागची कारणे आणि परिणाम
यामागचे नक्की कारण जरी माहीत नसले तरी हा विविध कारणांचा एकत्रित परिणाम असू शकतो. अनुवंशिकता, शरीरातील संप्रेरकांमध्ये काही अनैसर्गिक बदल होणे, काही मानसिक आजार, आपल्या शारिरीक प्रतिमेविषयी खूपच काटेकोर असणे, शारीरिक प्रतिमेला एखाद्या संस्कृतीत खूप महत्त्व असणे, किंवा खाण्यापिण्यावर कठोर बंधने असणे, वजन वाढण्याची सतत भीती वाटणे, सतत तणावाखाली असणे, वैयक्तिक किंवा कौटुंबिक कलह, अप्रिय घटना अथवा प्रसंग, असहाय्यता, एकटेपणा, स्वतःविषयी कमीपणा वाटणे (आत्मसन्मानाचा आभाव), अशी काही कारणे सांगता येतील. या कारणांवर मात करण्यासाठी मुले आपल्या खाण्यापिण्यात टोकाचे बदल करतात. याची परिणती नैराश्य, चिंता, व्यसने, विविध शारीरिक आजार आणि मृत्यूतही होऊ शकते.
इटिंग डिसॉर्डरची लक्षणे:
1) वजनातील अनैसर्गिक बदल : वाढीच्या वयातील मुलांचे वजन काही कारणाशिवाय पुरेशा प्रमाणात वाढत नसेल किंवा वाढण्याऐवजी कमी होत असेल तर नक्कीच त्यांच्या खाण्या-पिण्यात काहीतरी चुकतेय हे लक्षात घ्यायला हवे. मुले कमी जेवतात का, जेवणात ठराविक पदार्थ खात नाहीत का हे तपासायला हवे. याउलट वजन प्रमाणाबाहेर वाढायला लागले तर मुले विनाकारण, भूक नसतानाही खात नाहीत ना? चुकीचे पदार्थ खात नाहीत ना? याची पडताळणी करायला हवी. वाढत्या वयातील मुलांचे उंचीच्या प्रमाणात वजन न वाढणे अथवा बराच काळ वजन स्थिर रहाणे अथवा वजन कमी होणे अथवा वजन प्रमाणाबाहेर वाढणे या तीनही गोष्टी इटिंग डिसॉर्डरची शक्यता दाखवतात.
2) घरी कुटुंबीयांबरोबर एकत्र जेवण्यास नकार देणे अथवा घरी न जेवणे: अचानक कुटुंबीयांबरोबर एकत्र जेवण घेण्यास नकार देणे, जेवण्याच्या वेळेत घरी न थांबणे, आपले जेवण आपल्या खोलीत घेऊन जाणे, एकटे बसून जेवणे, आवडीचे पदार्थ टाळणे किंवा त्यांना वाईट म्हणणे ही इटिंग डिसॉर्डरची महत्वाची लक्षणे. एकटे बसून खाताना ही मुले एकतर खूप कमी प्रमाणात किंवा अतिशय जास्त प्रमाणात खातात. जास्त खाल्ल्यास एकांतात उलटी करून अन्न बाहेर काढतात. त्यामुळे अशा लक्षणांची वेळीच दखल घ्यायला हवी.
3) एखादा विशिष्ट अथवा वेगळ्या प्रकाराचा आहार घेणे: अचानक आहारात ठराविक पदार्थ घ्यायला सुरुवात करणे, अचानक आहारातले तेलकट, तूपकट, गोड पदार्थ बंद करणे, नॉन-व्हेज बंद करणे, काही ठराविक पदार्थांची भिती वाटणे, खाण्याच्या वेळा कमी करणे किंवा प्रमाण कमी करणे, इंटरनेटवर वाचून एखादे फॅड डाएट (उदा. व्हेगन डाएट) पाळायला लागणे, या डाएटच्या नावाखाली सर्वांबरोबर खाणे टाळणे ही सगळी इटिंग डिसॉर्डरची लक्षणे असू शकतात.
4) अचानक व्यायाम खूप वाढवणे: वजन आटोक्यात ठेवण्याच्या वेडातून अनेकदा इटिंग डिसॉर्डर असणाऱ्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात व्यायाम करतात. त्यामुळे व्यायाम अचानक वाढवणे, व्यायामाविषयी अगदी सतर्क असणे, मोठ्यांचे / सेलेब्रिटीजचे अनुकरण करून अथवा व्हिडीओज पाहून अतिरिक्त अथवा टोकाचे (अवघड) व्यायाम करणे ही लक्षणे जर मुले दाखवू लागली तर इटिंग डिसॉर्डरची शक्यता नाकारता येत नाही. मुलांना लहान वयातच योगासने शिकवणे आणि आपल्या स्वतःच्या शरीराविषयी आदर उत्पन्न करणे हा फार चांगला उपाय आहे.
5) दिसण्याविषयी, स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेविषयी खूप सजग होणे: आपल्या दिसण्याविषयी, आपल्या बाह्य प्रतिमेविषयी मुले अचानक खूपच सजग आणि जागरुक रहाताना दिसतात. सारखे आपल्या वजनाविषयी बोलणे, वजनाविषयी विचार करणे, सारखे वजन तपासणे, थोडे वजन वाढलेले दिसताच निराश होणे, वारंवार आणि तासन् तास आरशात बघत राहणे, चारचौघांत जाणे टाळणे (उदा. पार्टी / सण समारंभ, नातेवाईकांच्या गाठीभेटी), वजन लपविण्यासाठी मुद्दाम ढगळे कपडे घालणे, दिसणे म्हणजेच सर्वस्व असा विचार मनात घर करून राहणे या सगळ्या इटिंग डिसॉर्डरच्या दृष्टीने धोक्याच्या घंटाच.
6) वर्तणुकीतील बदल: एकटे राहणे, लहानसहान कारणांवरून चिडचिड आणि त्रागा करणे, शाळेत चांगले मार्क मिळत असताना अचानक मार्कांमध्ये घसरण होणे, जगाचे ओझे स्वतःच्या पाठीवर असल्यासारखे सतत दबावाखाली राहणे, अनेक मित्रमैत्रिणी असलेल्यांनी अचानक मित्रमैत्रिणीशी संपर्क तोडणे असे स्वभावातील मोठे बदल इटिंग डिसॉर्डरची संभवता दर्शवतात.
7) अन्नपदार्थांबाबत, स्वयंपाकाबाबत अचानक रस निर्माण होणे, त्याबद्दल माहिती काढणे: अचानक अन्नपदार्थांबद्दल कुतुहल जागृत होणे, स्वयंपाक करण्यात रस वाटणे, सगळ्यांसाठी स्वयंपाक करणे पण स्वतः न खाणे किंवा स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करणे, पॅकबंद पदार्थांवरील माहिती काळजीपूर्वक वाचत रहाणे अशी काही लक्षणे इटिंग डिसॉर्डरकडे बोट दाखवतात.
पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे बारीक लक्ष ठेवायला हवे. काही वेगळे जाणवल्यास, वर दिलेली लक्षणे मुलांमध्ये दिसून आल्यास वेळीच सावध व्हायला हवे. बऱ्याचदा घरच्या घरी फक्त समजावून, कानउघाडणी करून, लक्ष देऊन इटिंग डिसॉर्डर्स बऱ्या होण्यासारख्या नसतात. अशावेळी फार वेळ न दवडता तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. इटिंग डिसॉर्डर्स पूर्ण बऱ्या होण्यासाठी काही महिन्यांचा, वर्षांचाही वेळ लागू शकतो, काही वेळा औषधांची, समुपदेशकांची, आहारतज्ञांची मदत लागते. काही तपासण्या कराव्या लागतात. क्वचितप्रसंगी दवाखान्यात भरती करावे लागू शकते. इटिंग डिसॉर्डरवर जितक्या लवकर उपचार होतील, तितके मुलांच्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतील आणि मुले त्यातून लवकर बाहेर पडतील हे लक्षात ठेवायला हवे.
– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत