सहा ते नऊ महिने या काळात बाळे भाताची पेज, मुगाच्या डाळीची पेज, नाचणी सत्वाची पेज, फळे व भाज्यांचे रस, सूप्स हे पदार्थ आवडीने घ्यायला लागतात. सुरुवातीला फक्त 2-3 चमचेच खाणारी बाळे आता हळूहळू जास्त प्रमणात म्हणजे साधारण अर्ध्या वाटीपर्यंत खाऊचा चट्टामट्टा करतात. जसे बाळांचे वय वाढते तसे हळूहळू पदार्थांचा घट्टपणा वाढवावा. वरील पदार्थ घेण्याचे प्रमाणही हळूहळू वाढवावे आणि दिवसातून दोन ते तीनच्या जागी चार ते पाच वेळा वरचे अन्न द्यायला सुरुवात करावी. दोन खाण्यांमध्ये साधारण दोन ते तीन तासांचे अंतर ठेवावे.
या काळात स्तनपान किती वेळा द्यावे?
जशी बाळे वरचे खायला लागतील, तसे स्तनपानाचे प्रमाण हळूहळू कमी करावे. एका आड एक भुकेच्या वेळेला, रात्रीच्या वेळी बाळ उठल्यास स्तनपान द्यावे. स्तनपान बंद मात्र करू नये. एक वर्षापर्यंत स्तनपानाद्वारे बाळाची उष्मांकांची निम्मी गरज पूर्ण होते तर एक ते दोन वर्षे वयाच्या काळात स्तनपानाद्वारे उष्मांकांची एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश गरज पूर्ण होऊ शकते. त्यामुळे दोन वर्षांपर्यंत स्तनपान सुरु ठेवावे. स्तनपान सुरु ठेवल्याने बाळाला अनेक आजारांपासून संरक्षण मिळतेच, शिवाय आईचेही वजन आटोक्यात रहायला मदत होते!
वेगवेगळ्या चवींची ओळख
आठ महिने झाल्यावर म्हणजेच नऊ महिन्यांच्या सुरुवातीला ताजे गोड दही आणि अंड्याचा मऊ शिजवलेला बलक सुरु करता येतो. काही बाळांना अंड्याचा बलक आवडत नाही (बलकाला काहीसा उग्र वास असतो आणि तो शिजवल्यावर खूपच पिठूळ होतो). अशावेळी दह्यामध्ये अंड्याचा बलक कुस्करून दिल्यास बाळे आवडीने खातात. दूध आणि अंड्याचा पांढरा भाग मात्र एक वर्षापर्यंत देऊ नये. साखर व मीठाचा वापरही एक वर्षापर्यंत करू नये. एखाद्या पदार्थाला गोडवा आणायचा असल्यास फळांचा (कुस्करलेले केळे, कुस्करलेला चिक्कूचा गर, खजूराचा पल्प) यांचा वापर करावा. वेगवेगळ्या चवींची बाळाला ओळख करून देण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये लिंबू रस किंवा कोकमच्या आगळाचे दोन थेंब, थोडी जिरेपूड, धनेपूड, आमचूर पावडर यांचा आलटून पालटून वापर करावा. बाळाला एखादा पदार्थ आवडला नाही तर तो पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवून पहावा, त्यात काही नवीन घटक घालून पहावेत. बाळे नक्की खातील.
उदा. पालकाचे सूप न आवडणार्या मुलांना डाळ आणि पालक एकत्र शिजवून द्यावे किंवा डाळ-तांदळाची खिचडी करताना त्यात पालक बारीक चिरून घालावा.
फिंगर फूड्स
नऊ ते दहा महिन्यांनंतर बाळांना काही पदार्थांचे लहान लहान तुकडे करूनही देता येतात. तोपर्यंत बऱ्याच बाळांना दात यायला सुरुवात झाली असते, हिरड्या टणक व्हायला लागल्या असतात. त्यामुळे असे छोटे छोटे तुकडे बोटाच्या चिमटीत पकडून बाळे तोंडात टाकतात आणि मजेत चावत बसतात. त्यामुळेच अशा पदार्थांना फिंगर फूड्स असे म्हणतात!
यामध्ये केळ्याचे किंवा पिकलेल्या फळाचे (बिया काढून पपई, खरबूज, कलिंगड, साल काढलेले सफरचंद, आंबा) छोटे छोटे काप देता येतील, पनीर किंवा चीजचे लहान लहान तुकडे करून देता येतील; मऊ इडलीचे तुकडे करून देता येतील; गाजर, फ्लॉवर, बटाटा, रताळे अशा भाज्या मऊ शिजवून त्यांचे लहान काप करून देता येतील.
पण हे बाळाला देण्यापूर्वी फळे-भाज्या स्वछ धुवून घ्याव्यात आणि बाळाचे हातही स्वच्छ धुवावेत.
फिंगर फूड्स म्हणून या वयातील मुलांना शेंगदाणे, फुटाणे, बदामाचे तुकडे, कच्च्या गाजराचे तुकडे, द्राक्षे, मक्याचे दाणे असे पदार्थ देऊ नये. हे पदार्थ घशात अडकून बसायची शक्यता असते.
स्वच्छता
वरचे अन्न देताना स्वच्छता न पाळणे हे सहा ते बारा महिने या वयातील बालकांमधील अतिसाराचे महत्वाचे कारण आहे. कोणताही पदार्थ बनवताना हात स्वच्छ धुणे, ताजे घटकपदार्थ वापरणे, स्वच्छ भांडी व चमचे वापरणे, उकळून गार केलेले पाणी वापरणे, तयार केलेला पदार्थ झाकून ठेवणे, त्यावर चिलटे/माशा बसणार नाहीत याची काळजी घेणे, हे फार महत्वाचे आहे. द्रवपदार्थ देण्यासाठी बाटलीचा वापर करू नये. त्याच्या अनेक तोट्यांपैकी बाटलीच्या अस्वच्छतेमुळे होणारा जंतूसंसर्ग हा एक महत्वाचा तोटा आहे. पाणी देताना वाटी-चमच्याने द्यावे अथवा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर सिपरचा वापर करावा. त्याचीही स्वच्छता काळजीपूर्वक राखावी.
आजारपणातील आहाराची काळजी
सर्दी-खोकला-ताप-अतिसार हे बाळांमधील नेहमी दिसणारे आ
जार. बाळे आजारी असताना त्यांची भूक कमी होते. बाळे नेहमीइतके खात नाहीत. त्यामुळे बाळांना जबरदस्ती करू नये. बाळाच्या आवडीचे, मऊ पदार्थ थोड्या प्रमाणात व थोड्या थोड्या अंतराने द्यावेत. मात्र या काळात द्रवपदार्थ जास्त प्रमाणात द्यावेत. आजारी असताना स्तनपान अधिकाधिक वेळा करावे. जुलाब होत असतानादेखील स्तनपान थांबवू नये. अनेकांची अशी समजूत असते की दुधामुळे जुलाब वाढतील. पण स्तनपानाबाबत हे खरे नाही.
9 ते 12 महिने या काळात बाळाला देण्यासाठी काही पाककृती
आंबिल घटकपदार्थ: नाचणी सत्व – एक टेबलस्पून
घट्ट ताक – अर्धी वाटी
पाणी – अर्धी वाटी
जिरेपूड, हिंग – प्रत्येकी एक चिमूट
कृती : नाचणी सत्व पाण्यात कालवून हे मिश्रण गॅसवर ठेवावे. चमच्याने सतत हलवावे. मिश्रण थोडे घट्ट होताच गॅस बंद करावा व ते थंड होऊ द्यावे. घट्ट ताक, हिंग व जिरेपूड घालून बाळाला द्यावे.
रताळ्याचा शिरा
घटकपदार्थ: रताळे – एक लहान आकाराचे
तूप- एक टीस्पून
खजूर पल्प – एक टीस्पून
बदामाची पूड – एक टीस्पून
वेलदोडा पूड – एक चिमूट
कृती : रताळे उकडून घ्यावे. त्यानंतर त्याचे साल काढून किसून घ्यावे. छोट्या कढईत तूप घ्यावे. तूप तापल्यावर त्यात किसलेले रताळे परतून घ्यावे. थोडे पाणी घालून एकजीव व शिजवून मऊ करावे. खजूर पल्प, बदामाची पूड व वेलदोड्याची पूड घालून ढवळावे व गॅस बंद करावा.
भगरीचा उपमा
घटकपदार्थ: वरई – 2 टेबलस्पून
बारीक चिरलेला कांदा – 2 टीस्पून
बारीक चिरलेला टोमॅटो – 2 टीस्पून
तेल- 1 टीस्पून
पाणी – 1 वाटी
मोहरी, हिंग, मीठ, कोथिंबीर, लिंबू
कृती: वरई भाजून घ्यावी. एका कढईमध्ये तेल तापवावे. त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घालावे. त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो परतावा. त्यानंतर वरई घालून वर गरम पाणी घालावे व वरई मऊ शिजू द्यावी. फार घट्ट होऊ देऊ नये.
वरई शिजली की कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ आणावी व गॅस बंद करावा. कोमट झाल्यावर लिंबू पिळून बाळाला उपमा द्यावा.
मिक्स व्हेज – एग सूप
घटकपदार्थ : गाजर – 1 लहान
फ्लॉवर – 2 तुकडे
दूधीभोपळा – 5-6 तुकडे
टोमॅटो – अर्धा
कांदा – अर्धा
पुदिना – 3-4 पाने
उकडलेल्या अंड्याचा बलक – 1
पाणी – अर्धा कप
लिंबाचा रस
कृती : सर्व भाज्या एकत्र करून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्याव्यात. त्यानंतर भाज्या मिक्सरमध्ये घालून मऊ पेस्ट करावी. उकडलेल्या अंड्याचा बलक पाण्यात कालवून तो या पेस्टमध्ये घालावा. गरजेपुरते पाणी घालून पातळ करावे. कोमट करून लिंबू पिळून द्यावे. (शाकाहारींनी अंड्याच्या बलकाऐवजी मऊ शिजवलेली मसुराची डाळ घालावी.)
याशिवाय नऊ ते बारा महिन्यांच्या बाळांना मिश्र पिठांची मऊ धिरडी, तांदळाची उकड, डोसा, कढी-भात, दही-भात, ज्वारीची मऊ भाकरी आणि मुगाचे वरण असे अनेक पदार्थ देता येतील. (लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत