आपल्याकडे प्रत्येक सणाला विशिष्ट पदार्थाचे महत्त्व असते. जसे गणपतीला उकडीचे मोदक, नवरात्रात देवीला पुरण खीर, दसरा दिवाळीला विविध पक्वान्न इत्यादी गोष्टींना शास्त्रीय आधार आहेच आणि परंपरासुद्धा आहे. पण जसा काळ पुढे सरकतो आहे, तसा या परंपरेत आता अनेक बदल घडत आहेत. घरी करणे जमत नाही म्हणून पदार्थ बाहेरून आणतो, पण त्याच्या सकसतेपेक्षा रंग, रूप, व चव याला प्राधान्य दिले जाते. पण अनेक पदार्थ असे असतात, ज्यामध्ये अनैसर्गिक किंवा कृत्रिम रंग घालून ते आकर्षक बनविले जातात.
आजकाल महागाईमुळे भेसळसुद्धा भरपूर वाढलेली दिसते. कोणाला वाटेल, दिवाळीचे चार दिवस किंवा नवरात्राचे नऊ दिवस गोड खाल्ले, तर काय विशेष होणार आहे? पण अक्षरशः 4 दिवसात 2 किलो वजन वाढायला वेळ लागत नाही. शिवाय आपण आपल्या पचन संस्थेवर ताण देत असतो, तो वेगळाच. अशा अटीतटीच्या वेळी, आपले खानपान संयमाने व नियोजन करून असावे.
श्रावण सुरू झाला की आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी असे एकामागून एक सण सुरू होतात. यामध्ये मग उत्साह, खाणे-पिणे, खरेदी, कौटुंबिक एकत्रीकरण अशा गोष्टींना उधाण येते. पूर्वी हे सण साजरे करण्याची पद्धत व आजची पद्धत यात खूप तफावत जाणवते. पूर्वी सगळ्या गोष्टी घरीच करण्याचा आनंद स्त्रिया घेत असत.
परंतु आता नोकरीमुळे बराच वेळ बाहेर जातो त्यामुळे सर्व गोष्टी विकतच आणल्या जातात. सणासुदीला बाहेरच जेवायचे, असे प्रकार वाढले आहेत. गणपतीला लागणारे मोदकही बाहेरूनच. त्यासाठी खव्याचा किंवा आंब्याचा एकवीस मोदकांचा बॉक्स, पंचखाद्य, गौरी व नवरात्रात फराळाचे पदार्थ, दसरा व दिवाळीला मिठाई, हे सगळे नेहमीचेच आहे, पण या सणांच्या काळात यात केक, चॉकलेट यांची सुद्धा भर पडते. म्हणजेच काय पोटावर एकापाठोपाठ एक असे अत्याचार सुरूच असतात.
आपल्याकडे प्रत्येक सणाला विशिष्ट पदार्थाचे महत्व असते. जसे गणपतीला उकडीचे मोदक, नवरात्रात देवीला पुरण खीर, दसरा दिवाळीला विविध पक्वान्न इत्यादी गोष्टींना शास्त्रीय आधार आहेच आणि परंपरा सुद्धा आहे. पण जसा काळ पुढे सरकतो आहे, तसा या परंपरेत आता अनेक बदल घडत आहेत. घरी करणे जमत नाही म्हणून पदार्थ बाहेरून आणतो, पण त्याच्या सकसतेपेक्षा रंग, रूप, व चव याला प्राधान्य दिले जाते. पण अनेक पदार्थ असे असतात, ज्यामध्ये अनैसर्गिक किंवा कृत्रिम रंग घालून ते आकर्षक बनविले जातात. आजकाल महागाईमुळे भेसळसुद्धा भरपूर वाढलेली दिसते.
अगदी उकडीच्या मोदकाचेच उदाहरण घ्यायचे तर बाहेरील पारीत तांदुळाच्या पिठीऐवजी मैदाच वापरतात. दिवाळी आली की भेसळीच्या खव्याची मिठाई तयार केल्याच्या बातम्या येत असतात. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ (बेसन) अनेक प्रकारच्या फरसाणमध्ये वापरावे लागते. पण ते कुठल्या डाळीचे पीठ आहे, हे आपण कधी बघतो का? एखादा खरंच खवय्या असेल, ज्याला याची माहिती असेल. अन्यथा यामध्ये फरसाणात बेसनाचा उपयोग कमी आणि निकृष्ट दर्जाच्या डाळीच्या पिठाचा उपयोग जास्त केला जातो.
अशा गोष्टी आपण टाळणे गरजेचे असते. अन्यथा सणांचा आनंद घेण्यावर विरजण पडू शकते. सणांमध्ये परंपरागत गोड व तळलेले पदार्थ हा नेहमीचा भाग आहे. अर्थातच याचा नुसता भरणा करत बसणे आपल्यासाठी धोकादायकच आहे. कोणाला वाटेल, दिवाळीचे चार दिवस किंवा नवरात्राचे नऊ दिवस गोड खाल्ले, तर काय विशेष होणार आहे? पण अक्षरशः 4 दिवसात 2 किलो वजन वाढायला वेळ लागत नाही. शिवाय आपण आपल्या पचन संस्थेवर ताण देत असतो, तो वेगळाच. अशा अटीतटीच्या वेळी, आपले खानपान संयमाने व नियोजन करून असावे.
दुपारी जड जेवण झाले असल्यास, रात्री हलकेच खाणे ठेवावे. ताक, फळे, खाऊनच राहावे. रात्रीचे जेवण बाहेर होणार असेल, तर दुपारी साधेच जेवावे. नैवेद्याला खूप साखर असलेले पदार्थ टाळून पौष्टिक पदार्थांचा वापर करता येतो. जसे रात्रीच्या खजूर व त्याच्या आत भाजलेले बदाम भरून चॉकलेट सारखे करता येईल किंवा पंचखाद्याप्रमाणेच, पण जरा वेगळे म्हणजे खोबऱ्याचे तुकडे, भाजके शेंगदाणे, गुळाचे बारीक तुकडे, खडीसाखर व भाजकी डाळ घालून एकत्र असे पदार्थ करणे उत्तम. यातही पाच पदार्थच आहेत आणि मुले ते आवडीने खातात. शिवाय पौष्टिकही आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण सुका मेवा म्हटले की साधारण काजू, बदाम, बेदाणा, हेच मनात येते.
याव्यतिरिक्त जवळपास 25 प्रकारची सुकी फळे सुक्या मेव्याच्या गटात मोडतात. ती सुका मेव्याच्या दुकानात उपलब्ध असतात. त्यात सुके जर्दाळू, सुके किवी, सुके लेमन, सुके जिंजर यांचा समावेश होतो. ही सर्व फळे अत्यंत पौष्टिक असून त्याचे वेगवेगळे पदार्थ प्रसाद म्हणून रोजच्या नैवेद्याला बनवता येतात. जेवताना खिरीचे प्रकार करावेत ज्यामुळे दूध आपल्या पोटात न चुकता जाते. शक्य असल्यास गोड पदार्थात खजूर, खारीक, पावडर वापरावी. भोंडल्यामध्ये स्त्रियांचे खूप खाणे होते.
जर सोसायटीत रोज भोंडला असेल तर पदार्थांची थीम ठरवून घ्या. अनेक स्त्रियांनी एकाच दिवशी अनेक पदार्थ न आणता कोणी केव्हा काय आणावे, हे ठरवून घ्या. शिवाय खिरापतीत बेसनाचा पदार्थ, तळलेले पदार्थ, साखर घालून केलेले गोड पदार्थ, विकतचे पदार्थ नकोत, असे नावीन्यपूर्ण नियम केले म्हणजे स्त्रियांच्या डोक्याला थोडी चालना मिळून पोटावर होणारे अत्याचार थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतात.
दुसरीकडे पाहुणे म्हणून जेवायला किंवा फराळाला गेल्यास, पहिले वाढलेले बराच वेळ खात राहावे. जर आपण ते पटापट संपवले, तर पुन्हा पुन्हा आग्रहाचे खावे लागते. घरून निघताना ग्लासभर ताक पिऊनच निघावे, म्हणजे खाण्यावर नियंत्रण राहते. अशा प्रकारे आपल्याला सर्व सण आनंदाने व तब्बेतीची कुरकुर न होता साजरे करता येतील.
ज्या पोटासाठी हे सर्व सुरू आहे, त्याच्यासाठी मेंदूचा वापर करा व सणांची मजा लुटा. सण साजरे करणे म्हणजे खाद्यपदार्थाला केंद्रस्थानी न ठेवता, इतर आनंदाच्या गोष्टींवर जसे स्वच्छता करणे, सजावट करणे, पुस्तकांचे वाचन करणे, ट्रेकला जाणे इत्यादी गोष्टीही करता येऊ शकतात.
– डॉ. मेधा क्षीरसागर