- चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
- कोकमामध्ये पाणी घालून त्याचा गर बनवावा. हा गर पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
- कोकमचा गर, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
- अतिसार, संग्रहणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकम कुसकरून गाळलेले पाणी प्यावे.
- अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा गर संपूर्ण अंगास लावावा.
पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा. - हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
- हिवाळ्यात थंडीमुळे ओठ फुटणे किंवा त्वचा कोरडी पडून भेगा पडणे यासाठी कोकमचे तेल कोमट करून लावावे.
- आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
- कोकम (१० तोळे ) पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुसकरून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
- मूळव्याधीचा त्रास होत असेल व रक्त पडत असल्यास कोकमचा गर दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
- कोकमच्या सालीपासून अमसूल तयार केले जाते. रोजच्या जेवणात तसेच सोलकढी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- अमृत कोकम (सिरप) या पेयाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. अमृत कोकम बनविण्यासाठी ताज्या कोकम फळांच्या सालीचा वापर करतात.