सुट्ट्या सुरू झाल्या की, सर्वांना वेध लागतात ते सर्व सहलीला जाण्याचे. कौटुंबिक सहल असेल किंवा मित्रमैत्रिणींची सहल, सर्वांच्या मनात सतत चिंता राहते ती डायबेटीसची, म्हणून सहलीला निघतांना मधुमेही रूग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या सोबत असलेल्या प्रवाशांनी काय सतर्कता बाळगावी ते आज आपण पाहू.
सहलीला जाताना डायबेटीक पेशंटना ज्या शंका पडतात त्या अशा ः-
1) मला सहल झेपेल का?
2) परगावी, परदेशी मी माझे पथ्य कसे पाळू?
3) मला काही झाले सहलीत तर मी एकटा /एकटी काय करू?
4) परगावी दवाखाना, ऍडमिट होणे या गरजा लागल्या तर काय करायचे?
5) माझ्यामुळे सहप्रवाशांची गैरसोय होईल.
6) गोळ्या औषधे मध्येच संपली तर काय?
7) मला इंजेक्शन टोचता येत नाही. मग मला इन्शुलिन कोण देणार?
8) ट्रीप सोसली नाही तर पैसे वेळ, आरोग्य अशी तिहेरी हानी होईल. घरचे रागावतील हे वेगळेच.
9)चपला, कपडे, बुट, कोणते वापरावे?
10) सर्व काळज्या दूर ठेऊन मस्त मजा करणार, 8 दिवस घरच्यांची कटकट नसेल. मस्त खाऊ, पिऊ, ट्रीटमेंट गेली खड्ड्यात, असे म्हणणारे लोकही सापडतात.
तर इतक्या सगळ्या गोष्टीचा आपण टप्प्याने विचार करू या आणि हे करतांना आपण एक लक्षात ठेऊ या की, आयुष्य सुंदर आहे आणि ते सुंदर ठेवणं आपल्याही हातात आहे. आता एकेका प्रश्नाचं उत्तर पाहू या.
1) आपल्याला सहल झेपेल का हा विचार मधुमेह असो किंवा नसो, प्रत्येकानी केला पाहिजे. म्हणजेच 10 वर्षाच्या मुलांनी एव्हरेस्ट चढावे का? हा जसा विचार प्रत्येकजण करेल, तसाच विचार मधुमेहींनी सहल आखतांना करावा. त्यासाठी सहलीत प्रवास किती तासाचा असेल? तो कोणत्या वेळी असेल? प्रवासात टॉयलेट, कॅन्टिन याची सोय कुठे व किती वेळाने असेल? प्रवासात किती कि.मी. व कोणत्याही वेळी चालावे लागेल. चढ आहे का? हा बारकाव्यासह विचार करावा. कोणतीही गोष्ट नीट माहिती केली की अन्न पाणी, गोळ्या औषधे, बुट, चपला या सगळ्यांची नियोजनबद्ध तयारी करा. तर तुम्हाला सहल झेपेल का हे समजेल. लांबच्या व कठीण सहली पूर्वीच्या एका आठवड्यात एउ सह मेडिकल फिटनेस जरूर करून घ्या. दूर गाईडला तुमच्या आजाराची कल्पना द्या.
2) पथ्याचा विचार डोक्यात जरूर ठेवा. काय खायचे, काय खायचे नाही, खाण्याचे प्रमाण व वेळा यासंबंधी सर्व आहार तक्ता मधुमेह तज्ज्ञांकडून घ्या आपल्या टूर प्लॅटनमधील खाण्याच्या तक्त्याशी तो जुळवुन पहा ज्या कमतरता आढळतील त्याचा विचार घरून नेण्याच्या डब्यासाठी डोक्यात ठेवा. उदा.साधारणपणे ब्रेकफास्ट, लंच व रात्रीचे जेवण याची सोय सहल नियोजनात असते. पण दुपारी मधल्या वेळचे खाणे टूरमध्ये सहसा दिले जात नाही. त्याची विचारणा करा व जवळ टिकाऊ वस्तू बिनतेलाच्या खाकरा, मेथीचे पराठे, ब्राऊन ब्रेड, सॅंडविच, दुपारच्या जेवणातला जादाचा फुलका, उपमा अशी सोय स्वतःच्या डब्यातून करून ठेवा. सकाळी स्थळ दर्शनाला बाहेर पडतांना दुपारच्या खाण्याचे प्लॅनिंग करा, अन्यथा दिवसभराची दगदग, वेळेवर न खाणे याने संध्याकाळी चक्कर येऊ शकते.
3) परक्या माणसांसोबत सहलीला जाताना आपण एकट्याने आपली काळजी घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा व आहार , औषधे, डॉक्टरांचा सल्ला याचे काटेकोर पालन करा. जवळ मधुमेहाचे आयडेंटिटी कार्ड स्वतःचा नाव पत्ता, औषधोपचार, स्वतःचा व आपल्या डॉक्टरांचा फोन नं. यासह जरूर जवळ बाळगा. मी मधुमेहीअसून मी हायपोमधे बेशुद्धीत आढळल्यास मला 2-3 चमचे साखर खाण्यास देऊन लगेच डॉक्टरांना फोन करावा, असे कार्डवर लिहीलेले असावे. आपल्या सह प्रवाशांना आपण डायबेटीक असल्याचे सांगून ठेवावे. स्वतःजवळ साखर, खडीसाखर, चॉकलेट असे गोड पदार्थ ठेवावे व घाम, चक्कर वाटल्यास औषध म्हणून खावे. उगीचच खाऊ नये. पथ्य व औषधे वेळेवर व प्रमाणात घेतल्यास इमर्जन्सी येत नाही.
4) परगावी, परदेशी ऍडमिट होण्याची वेळ येऊ नये यासाठी डबा व औषधे याचे नियोजन करावे. बहुतेक वेळेस वेळापत्रक चुकल्याने येणारी ग्लानी, बेशुद्धी, वाढलेला बीपी, अती चालल्याने पायावर येणारी सूज, धाप लागणे अशा गोष्टी घडू शकतात व नियोजन केले तर त्या टाळताही येतात. सर्वत्र चालेल असे मेडीक्लेम किंवा त्यासारखे हेल्थ इन्शुरन्स काढावे व पॉलिसीची झेरॉक्स जवळ ठेवावी. आपल्या औषधांच्या चिठ्ठीची व पथ्याच्या चार्टची झेरॉक्स सतत जवळ असावी. प्रवासाला जाण्यापूर्वी जिथे जाणार तिथल्या मेडिकल सोयींचा थोडा अंदाज घ्यावा. हल्ली इंटरनेटमुळे ही माहिती मिळणे सोपे झाले आहे. काही त्रास आला तर वेळ काढूपणा न करता तिथल्या डॉक्टरांना दाखवावे.
5) सह प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता आपण स्वतः नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण वागावे. खाणे-पिणे औषधे यासाठी लोकांवर अवलंबून राहू नये.
6) टूरचे दिवस मोजून सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा सर्व औषधांच्या एकत्र वेळेनुसार पुड्या जवळ ठेवाव्या व पर्समध्ये सतत जवळ बाळगाव्या. म्हणजे औषधाची वेळ झाली की प्रवासातही औषधे चुकत नाहीत. दोन-तीन दिवसांची जादा औषधे जवळ ठेवावी.तसेच पोटदुखी, जुलाब, उलट्या, ताप, खोकला, सर्दी अशा नेहमीच्या आजाराची औषधे डॉक्टरांना आधीच विचारून जवळ बाळगावी. हवेमुळे औषधे खराब होतात, म्हणून पाकिटातून बाहेर काढून ठेऊ नये. नेहमीचे प्रिस्क्रिप्शन सतत जवळ असावे.
7) साध्यातला साधा मनुष्यही इन्शुलिन स्वतः टोचून घेऊ शकतो. उतके ते सोपे आहे. त्यामुळे उगीचच घाबरून न जाता स्वतः शिकावे याकरता स्पेशल ट्रेनर्सची सोय असते, तसे आपल्या मधुमेह तज्ज्ञांना विचारावे. प्रवासात काचेची इन्शुलिन बॉटल न्यायाची असल्यास स्पेशल कोल्ड बाजारात मिळतात ती वापरावी म्हणजे हवेच्या उष्णतेचा विपरीत परिणाम इन्शुलिनवर होत नाही. इन्शुलि पेन रूम टेंपरेचरलाही तीन आठवड्यापर्यंत उत्तम राहते. आवश्यक त्या सुया, कापूस, डेटॉलजवळ ठेवावे. इन्शुलिनची व खाण्याची वेळ चुकवू नये.
8) ट्रीपची ट्रायल न करता ट्रीपची आखणी नियोजनाने केली तर ट्रीप आनंददायी होते. सोसेल अशा सहलीचीच निवड करा.
9) सोपे सुटसुटीत सुती कपडे,योग्य मापाचे व सर्व बोटे मोकळेपणाने मावतील, असे जास्त गादीचे व योग्य आर्च सपोर्टचे बूट प्रवासात वापरावे. मोजे, कॉटनचे, घाम शोषुण घेणारे, सैल इलॅस्टिकचे असावे. व ते रोज धुतलेले वापरावे. रुममध्ये टॉयलेटमध्ये वावरताना सुद्धा पाय सरकवून घालण्याच्या सपाता 24 तास वापराव्या. कधीही अनवाणी चालू नये. पायांना ओल राहू देऊ नये. दिवसांतून दोन तीनदा पाय धुऊन स्वच्छ कोरडे करावे. बेचक्यातून कोरडे ठेवावे. रबरी सपता, पायापेक्षा जड व कडक पादत्राणे वापरू नयेत. मंदिरात अनवाणी गेल्यास आल्यावर लगेच पाय धुऊन कोरडे करावे. मंदिरातही शक्यतो मोजे घालावे. पायाकडे निरखून पाहून काही टोचले नाही ना काही अस्वच्छता नाही ना? याची खात्री करावी. झोपतांना तळपायाला व्हॅसलिन लाऊन पाय मऊ ठेवावे.
10) प्रवासात पथ्यपाणी औषधे पाळले तर त्रास कमीतकमी होतो. सर्व नियोजन बंद केल्यास साखर भरमसाठ वाढून किटॉसिस, इन्फेक्शन्स असे त्रास होऊ शकतात. पाचशेच्या वर शुगर गेल्यास कोमा उदभवू शकतो. प्रवासात वेळा लक्षात ठेऊन नियोजनबद्ध वागल्यास ट्रीप सुखावह होते. जड सामान न नेणे, बॅगला चाके असणे अशी काळजी जरूर घ्यावी. त्यानुसार आवश्यक तेच सामान घ्यावे. तसेच ग्लुकोमिटर जवळ बाळगल्याने वरचेवर साखर तपासता येते. आपल्या डॉक्टरांशी आधीच बोलल्यास ट्रीपची काळजी कशी घ्यायची हे समजते. ट्रीपच्या आनंदाला मुकण्यापेक्षा काळजी घेऊन सहल अविस्मरणीय करणे आपल्या हातात असते.
– डॉ. गौरी दामले