– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत
भारत म्हणजे मधुमेहाची (चीन नंतर) दुसरी राजधानी! हल्ली प्रत्येक घरात मधुमेहाचा एकतरी रूग्ण सापडेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोनाने दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या जास्त दिसून येत आहे. यामुळे मधुमेहींनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मधुमेह असणाऱ्यांना कोरोनाचा जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो का?
खरंतर कोरोना जंतूसंसर्गाविषयी अद्याप सखोल माहिती उपलब्ध नाही. जगभरातल्या वेगवेगळ्या अनुभवांमधून आपण या विषाणू विषयी अधिकाधिक शिकत आहोत. सध्या समोर असलेल्या आकडेवारीनुसार असे लक्षात आले आहे की मधुमेही रुग्णांना कोरोना जंतुसंसर्ग होण्याचा धोका मधुमेह नसणाऱ्यांइतकाच आहे; कोरोनाची लागण टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाही सारख्याच आहेत. पण मधुमेह असलेल्यांना जर कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येण्याची आणि गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आढळली आहे. मधुमेहींमध्ये कोरोनामुळे आढळून येणारा मृत्यूदर तुलनेने जास्त आहे.
पण यामुळे मधुमेहींनी घाबरून जायचे कारण नाही. कारण असेही लक्षात आले आहे की मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवल्यास कोरोना जंतुसंसर्गाची गुंतागुंत होण्याचा धोका कमी होऊ शकतो. मधुमेहावर उत्तम नियंत्रण ठेवणे शक्य आहे. जरी सध्या लॉकडाउनच्या काळात ताजी भाज्या आणि फळे मिळण्यावर तसेच बाहेर पडण्यावर (बाहेर करण्याच्या व्यायामावर) बंधने असली तरी खालील माहिती तुम्हाला मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे यासाठी उपयुक्त ठरेल.
मधुमेहाचे नियंत्रण योग्य आहे की नाही ते कसे ठरवाल?
1. मधुमेहावर चांगले नियंत्रण म्हणजे वारंवार हायपो (रक्तशर्करा 70 मिलीग्रॅम/डेलि पेक्षा कमी) न होणे
2. उपाशीपोटीची रक्तशर्करा 140 मिलीग्रॅम/डेलि पेक्षा कमी असणे
3. जेवणानंतर 2 तासांनी रक्तशर्करा 180 मिलीग्रॅम/डेलि कमी असणे
4. एचबीएवनसी (HbA1c) म्हणजेच मागील 3 महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी 8% पेक्षा कमी असणे
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक घटक
1. वेळच्या वेळी औषधे
ए. मधुमेहाची औषधे वेळेवर घ्या. विशेषतः खाण्याच्या आधी किंवा नंतर ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितले आहे ती वेळ पाळा. तरच औषधे चांगल्या प्रकारे काम करून रक्तातील साखर योग्य पातळीत ठेवण्यास मदत करतील.
बी. शक्यतो औषधे ऑनलाइन ऑर्डर करा. फार्मसीमध्ये जाणे देणे टाळा.
सी. औषधे, इन्शुलिन योग्य प्रकारे, योग्य तापमानात ठेवा.
डी. तुमची नेहमीची औषधे उपलब्ध नसल्यास पर्यायी औषधे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे सुरू किंवा बंद करू नका.
2. संतुलित आहार
ए. तुम्ही काय खाता त्याची साखर बनते आणि रक्तातील साखर वाढते. त्यामुळे संतुलित आहार घ्या, रक्तातील साखर खूप कमी किंवा खूप जास्त होऊ नये म्हणून उपवास आणि भरपेट खाणे हे दोन्ही टाळा. लॉकडाऊनच्या काळात आहारात चमचमीत पदार्थांचे सेवन किंवा वेळ घालवण्यासाठी चरत रहाणे टाळा.
बी. आहारात ताजे सॅलड, भाज्या आणि फळे यासारखे फायबरयुक्त पदार्थ घ्या. भाज्या-फळे स्वच्छ धुवून वापरा. हे पदार्थ लॉकडाऊनच्या कालावधीत उपलब्ध नसल्यास, मोडाची कडधान्ये, बीन्स, सब्जा, सालासकटची धान्ये घ्या.
सी. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळा.
डी. सर्वसामान्यपणे मधुमेहींना कोणती सप्लीमेंट्स घेण्याची आवश्यकता नसते. पण आपल्याला सप्लीमेंट्सची गरज आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
3. नियमित व्यायाम:
ए. लॉकडाउन म्हणजे व्यायाम किंवा वर्कआउट टाळण्यासाठी निमित्त नाही! व्यायामामुळे प्रतिकारशक्ती आणि रक्तातील साखर – दोन्ही उत्तम रहाण्यास मदत होते.
बी. दररोज किमान एक तास वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करा. गच्चीवर चालणे, स्पॉट जॉगिंग, दोरीच्या उड्या, स्टेशनरी सायकलिंग, स्क्वॅट्स, लंजेस, पुश अप्स, सूर्य नमस्कार असे घरच्या घरी करता येणारे व्यायामप्रकार निवडा.
सी. मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा सांधेदुखीसारखे आजार असल्यास, योग्य प्रकारचे व्यायाम जाणून घेण्यासाठी डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.
4. ताणतणावाचे व्यवस्थापन:
ए. ताणतणावामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.
बी. लॉकडाऊनच्या काळात अनिश्चिततेमुळे, आर्थिक ओढाताणीमुळे, घराबाहेर पडण्यावर बंधने आल्यामुळे ताणतणाव वाढणे सहाजिक आहे. पण लॉकडाऊनकडे सकारात्मकतेने बघा.
सी. मुळात जे बदलता येणार नाही ते शांतचित्ताने स्विकारा.
डी. तणावाचे कारण शोधा आणि पुढील पैकी एक करा: AVOID / ALTER / ADAPT / ACCEPT!
ई. तणाव व्यवस्थापनासाठी पुढील उपाय मदत करतील: छंद जोपासणे, निसर्गाच्या जवळ जाणे (बागकाम करणे, पक्षी निरीक्षण करणे), व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, मनोरंजनात्मक कार्यक्रम पहाणे, हलकी फुलकी पुस्तके वाचणे, स्वतः रोज काहीतरी लिहिणे इ.
5. नियमित तपासणी:
ए. वरील चार उपायांनी रक्तातील साखर चांगली ठेवायला मदत होईलच; पण ती खरोखरच चांगली राहते की नाही याची खातरजमा करणेही महत्वाचे!
बी. दररोज घरी (ग्लुकोमीटरवर) कमीतकमी 4 वेळा (प्रत्येक जेवणाच्या आधी आणि झोपायच्या आधी), किंवा कोणताही त्रास झाल्यास साखर तपासा.
सी. रक्तातील साखर तपासणे शक्य नसल्यास लघवीतील साखर तपासा. आजारी असाल तर लघवीतील किटोन्सही तपासा.
डी. दररोज तळपायांची तपासणी करा. कोठेही जखम नाही ना याची खात्री करा. दररोज झोपायच्या आधी पावले स्वच्छ आणि कोरडी करा.
ई. कोणती तातडीची समस्या नसल्यास लॉकडाउन पूर्ण होईपर्यंत वार्षिक तपासण्या पुढे ढकलल्या (लॉकडाऊन संपल्यानंतर केल्या) तरी चालतील.
मधुमेह व्यवस्थापनाच्या या 5 घटकांचा अवलंब करून मधुमेह व्यवस्थित नियंत्रणात ठेवा. याबरोबरच बाहेर पडणे टाळा. बाहेर पडायची वेळ आल्यास पुरेशी काळजी घ्या. यामुळे कोरोनाच्या जंतुसंसर्गापासून तसेच त्याच्या गुंतागुंतीपासून लांब रहायला नक्कीच मदत होईल.
– डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत
आहारतज्ज्ञ, मधुमेह प्रशिक्षक