बर्न (स्विर्त्झलंड) : मानवी यकृतील आजार दूर करणारे आणि शरीराबाहेर ते एक आठवड्यापर्यंत जिवंत ठेवू शकणारे अद्भूत यंत्र विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. स्वित्झर्लंडमधील इटीएच झुरीचमधील संशोधकांसह अन्य संशोधकांनी दिलेल्या माहिती नुसार, नवीन तंत्रज्ञानाने इजा पोहोचलेले यकृत काही दिवसात पूर्णत: कार्यरत होऊ शकेल. त्यामुळे यकृताच्या आजाराने किंवा कर्करोगाच्या विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
या यंत्राची माहिती नेचर बायोटेक्नॉलॉजी या विज्ञानविषयक नियतकालीकांत प्रकाशित झाली आहे. या यंत्राद्वारे शरीरातील यकृताच्या कार्य करता येणे शक्य होणार आहे. शल्यचिकित्सक, जैवशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या चार वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर हे यंत्र बनवण्यात यश मिळवले आहे. अवयव रोपण आणि कर्करोगाच्या रुग्णांना याचा लाभ होणार आहे. याच बरोबर यकृत रोपणाच्या संधी यामुळे वाढणार आहेत, असे पीयेरे अलीन क्लेवीन या संशोधकाने म्हटले आहे.
हे संशोधन सुरू झाले त्यावेळी 2015 मध्ये यंत्रामध्ये यकृत 12 तास जिवंत ठेवता येऊ शकत होते. त्या यंत्रात सुधारणा करून अत्यंत वाईट दर्जाचे यकृत सात दिवसांपर्यंत ठेवता येऊ लागले. त्यात यकृताची इजा बरा करण्याच्या सुविाधा निर्माण केल्या गेल्या. त्यानंतर यकृतासभोवती जमलेली चरबी कमी करण्यात किंवा काही प्रमाणात यकृताच्या पुनर्निमितीस यश आले. वैद्यक आणि अभियंत्यात संवाद होऊ शकेल अशी भाषा हेच आमच्या पुढचे मोठे आव्हान होते, असे फिलीफ रुडॉल्फ वोन रोहर या सहसंशोधकांनी सांगितले.