हाडमोडी ताप एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा आजार इडिस जातींच्या डासांमार्फत पसरतो. डास चावल्यावर 3 ते 10 दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औषध नाही. हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र ओळखणे थोडे अवघड जाते.
रोगनिदान
साधारणपणे हा आजार 5 ते 7 दिवसांत आपोआप बरा होतो, पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरड्या, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. जठरातून रक्तस्राव झाल्यास उलटीत रक्त दिसते. आतड्यातून रक्तस्राव झाल्यास विष्ठा काळसर दिसते. त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात. प्रत्यक्ष रक्तस्राव व्हायच्या आधी पण हा दोष ओळखता येतो.
रक्तदाब मोजण्यासाठी आवळपट्टी बांधली व 100 पर्यंत दाब निर्माण केला तर त्या हातावर असे लहान ठिपके तयार होतात, यावरून प्लेटलेट्स कमी झाल्याचे समजते. रक्तस्राव जास्त झाल्यास रक्तदाब कमी होतो आणि रुग्ण अत्यवस्थ होतो. याची लक्षणे म्हणजे घाम येणे, हातपाय गार पडणे, नाडी जलद चालणे, इ. रक्त तपासणीत रक्त कणिकांचे प्रमाण 20 हजारांच्या खाली गेल्यास रक्तस्रावाचा धोका समजावा.
उपचार
नुसता डेंग्यू ताप असल्यास पॅमालच्या गोळ्या देऊन भागते. डेंग्यू रक्तस्राव असेल तर मात्र रुग्णालयात दाखल करून विशेष उपचार करावे लागतात.
प्रतिबंध
हा ताप डासांमार्फत पसरत असल्याने याच्या साथी वेगाने पसरू शकतात. रक्तस्रावाचा त्रास सहसा पंधरा वर्षांखालील मुलामुलींना होतो. इतरांनाही हा धोका थोडाफार असतोच. या साथीत अनेक मृत्यू झालेले आहेत. यासाठी अद्याप लस नाही.
प्रतिबंधक उपाययोजना म्हणून खालील सूचना आहेत.
साथीच्या काळात रुग्णांना मच्छरदाणीत आणि वेगळे ठेवणे.
मच्छरदाणी वापरून डासांचे चावे टाळणे.
डासरोधक मलम/धूर यांचा वापर करून डासांना लांब ठेवणे.
इडिस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. डबे, मडकी, चाकांचे टायर्स, रिकाम्या नारळाच्या कवट्या, इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात इडिस डास लवकर फैलावतात. यातले पाणी दर आठवड्याला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. साथीच्या काळात अशा पाण्याच्या जागा निचरा करून डासांची उत्पत्ती टाळणे हा महत्त्वाचा भाग आहे.
साथीच्या काळात झोपताना हातपाय झाकतील असे कपडे वापरावे. यासाठी पॅंट व लांब बाह्यांचा शर्ट वापरावा.
कीटकनाशकांचा धोका आणि पर्यायी उपाय
औषध फवारणीबद्दल काही धोके लक्षात घेणे आवश्यक आहे.
औषध प्रतिकार
पहिली गोष्ट म्हणजे हळूहळू काही वर्षांनी त्या प्रदेशातले डास त्या त्या औषधांना दाद देईनासे होतात. हा अनुभव पिकांवरच्या किडींबाबतही येतो. हे कसे होते हे पाहणे आवश्यक आहे. अमर्याद संख्या असलेल्या कीटकांमध्ये काही प्रमाणात रंगसूत्रे, गुणसूत्रे, इत्यादींमध्ये सूक्ष्म बदल होत राहतो. उदा. ज्वारी-बाजरीच्या शेतातही एखादे रोप वेगळे दिसून येते. निसर्गात हा बदल सूक्ष्म प्रमाणात सतत होत असतो. अमर्याद जननक्षमता व संख्या असलेल्या डासांमुळे असे बदल होण्याची शक्यता संख्याशास्त्रीय कारणांमुळे वाढते. कारण जेवढे जीव जास्त तेवढी बदलांची शक्यता जास्त.
अशा परिस्थितीत एखादा कीटक विशिष्ट औषधाला दाद न देणारा असणे स्वाभाविक असते. हेच विशिष्ट औषध सतत फवारत गेल्यानंतर या एखाद्या काटक डासाची प्रजा सोडता बाकी सर्व डास मरतील. हळूहळू सर्वच प्रजा त्या काटक गुणधर्माची बनेल. औषध फवारणीचा परिणाम होत नसल्याने त्यांचीच संख्या वाढत राहील. या पध्दतीने सर्व कीटक परिस्थितीशी जुळवून घेतात. वर्ष दोन वर्षाचा कठीण काळ सोडता सदैव त्यांची संख्या कायम ठेवतात.
शेतीसाठी आणि डासांसाठी रासायनिक औषधांचा होणारा वापर हा घातक ठरणार अशी चिन्हे आहेत. डीडीटी हे निसर्गात अजिबात नष्ट न होणारे द्रव्य आहे. आजपर्यंत पृथ्वीवर वापरलेले डीडीटी जसेच्या तसे आणि तेवढेच शिल्लक आहे. आता शेतीतल्या पिकांत, मातीत, पाण्यांत, सर्व प्राण्यांमध्ये डीडीटीचा अंश सापडतो. नवजात अर्भकाच्या शरीरातही त्याचा अंश आढळतो म्हणूनच रासायनिक औषधांच्या वापराबाबत योग्य दूरदृष्टी राहणे आवश्यक आहे.
कीटकांची संख्या एकूण पर्यावरणावर अवलंबून असते. विशिष्ट प्रदेशात, विशिष्ट काळात (मानवाचा हस्तक्षेप सोडला तर) वनस्पती जीवनाचा व प्राणी जीवनाचा संबंध दीर्घकाल संतुलित असतो. उदा. एखादे जंगल असेल तर त्यात निरनिराळ्या झाडांचे परस्पर प्रमाण, एकूण संख्या, ही बदललीच तर अगदी हळूहळू बदलते. जंगलात पुरेशा संख्येने हरिणांसारखे प्राणी असतील तरच मांसभक्षक प्राणी जगू शकतील. भात शेतीत किडींचे प्रमाण बेडकांमुळे मर्यादित राहते. पण या संतुलित निसर्गात मानवी हस्तक्षेपाने नव्या समस्या निर्माण होतात.
रेल्वे व रस्ते यामुळे जागोजाग साचणारे पाणी, पाण्याचा वाढलेला व अयोग्य पध्दतीने वापर, साचलेल्या पाण्याचे पृष्ठभाग, इत्यादींमुळे डासांना आदर्श परिस्थिती तयार होते. डासांचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करून उपाय केले पाहिजेत. सिंचनाच्या नव्या पध्दती वापरणे (उदा. ठिबक सिंचन), जलाशयात डासांच्या अळ्या खाऊन जगणारे गप्पी मासे सोडणे, इत्यादी उपाय चांगले वाटतात.
भातशेती हे डासांचे वस्तिस्थान होऊन जाते. यासाठी दर सात दिवसांनी त्यातले पाणी वाहून जाऊ देण्याचा प्रयोग काही विभागात झाला आहे. यामुळे डासांची अंडी-अळ्या वाहून जातात. हा उपाय पाण्याच्या एकूण उपलब्धतेवर अवलंबून आहे.
चिकनगुण्या तापाची कारणे आणि साथ चिकनगुण्याचा मूळ आफ्रिकन शब्दार्थ म्हणजे वाकडेपणा – बाक! या तापाने माणूस जागोजागी वाकतो म्हणून हे नाव. आपण याला मराठीत वाकड्या ताप म्हणू शकतो. हा ताप एका विषाणू प्रकारामुळे होतो.
हा विषाणू पट्टेरी पायाच्या इडिस डासांमुळे पसरतो. आजारी माणसाच्या रक्तात हे विषाणू असतात. इडिस हे रक्त शोषतात व इडिसांच्या शरीरात हे विषाणू टिकून राहतात. दुसऱ्या माणसाला हा इडिस चावला की 2-12 दिवसात हा आजार प्रकटतो. पण इडिस चावल्यानंतर सगळयांनाच हा आजार होईल असे नाही. हा आजार दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पसरत नाही. याच इडिसमुळे डेंग्यू तापही पसरतो. दोन्ही तापाच्या साथी येतात. मात्र डेंग्यू घातक ठरू शकतो तसा चिकनगुण्या घातक नाही. पण चिकनगुण्याने खूप त्रास होतो.
लक्षणे व त्रास
या तापाची सुरुवात अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी या लक्षणांनी होते. खूप थकवा येतो. मरगळ येते. मळमळ, उलटी, अंगावर पुरळ ही पण लक्षणे दिसतात. सांधे दुखतात किंवा सुजतात पण. यामुळे बरेच लोक आधाराला काठी घेतात. ही सांधेदुखी ताप गेल्यावर पण अनेक आठवडे टिकू शकते. डेंग्यूमध्ये अशी टिकाऊ सांधेदुखी नसते. हा दोन्हीमधला फरक आहे. चिकनगुण्यात डेंग्यूप्रमाणे रक्तस्राव, मेंदूज्वर, किंवा मृत्यू होत नाहीत हे विशेष. या तापाने जन्मभर त्याविरुध्द प्रतिकारशक्ती मिळते.
या तापावर लस नाही व इलाज फक्त वेदनाशामक – व तापशामक औषधांचा, डायक्लोफेनॅक, इ. औषधे उपयुक्त आहेत. आयुर्वेदात यासाठी तापावर गुळवेल सत्व, योगराज गुग्गुळ (सांधेदुखी) ही उपयुक्त औषधे आहेत. लक्षणे असेपर्यंत उपचार घ्यावेत.
इडिस व त्याचे नियंत्रण
हा इडिस (डासाची मादी चावते) मानवी वस्तीजवळ आढळतो. भांडी, टायर, टब, फुलदाण्या, कुंड्या, पिपे, बादल्या, कूलर, इ. ठिकाणी पाणी साठून राहिले की हे इडिस वाढतात. (अंडी घालतात) डासांचे पाय पट्टेरी असतात. त्यामुळे इडास पटकन ओळखू येतात. ह्या इडिसांचा उपद्रव कमी करणे हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे.
दर आठवड्यात एकदा डासांची पाण्याची ठिकाणे रिकामी करावीत व त्यांचा तळ ब्रशने घासावा.
पाणी ठेवणे गरजेचे असल्यास ते कापडातून गाळून घ्यावे. त्यानंतर कापड उन्हात वाळवावे म्हणजे अंडी मरतील.
पाण्यात गप्पी, गंबुसिया मासे सोडावेत. ते डासांच्या अळ्यांना खातात.
नेहमी मच्छरदाणीत झोपावे. मच्छरदाणी कीटकनाशकयुक्त असेल तर आणखी चांगले. (केओथ्रिनमध्ये बुडवून वाळवलेली) म्हणून याला मच्छरदाणी म्हणू या. अंगाला मच्छररोधक मलम लावावे. निलगिरी तेलाने डास दूर राहतात.
रुग्णांनी इतरांना लागण होऊ नये म्हणून मच्छरदाणीत झोपावे. सर्वांनी डासरोधक मलम लावावे.
– डॉ. शाम अष्टेकर