डिमेन्शिया हा वयानुसार येणारा आजार आहे. या आजारात रुग्णाचा जेवढा कस लागतो, तेवढाच कस त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचा लागतो. डिमेन्शिया आजार बरा होऊ शकतो व तो टाळलाही येऊ शकतो. या आजाराची लक्षणे अन उपचार पद्धती बरोबरच रुग्णाला कसे हाताळावे हेदेखील समजून घ्यायला हवे.
वाढत्या आयुर्मानामुळे स्मृतीभ्रंश (डिमेन्शिया) चे आव्हान उभे टाकले आहे. साठीपुढील ज्येष्ठांना होणाऱ्या डिमेन्शिया आता बदलत्या जीवनशैलीमुळे यंग ओल्ड (55 ते 60) या वयोगटवरही प्रभाव टाकू लागला आहे. 75 वर्षांपुढील वयोगटातले 25 ते 30 टक्के ज्येष्ठ डिमेन्शियाने ग्रस्त असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
मेंदूच्या पेशीतील अंतर्गत बदलामुळे डिमेन्शिया होतो. अल्झायमर हा मल्टी इन फास्ट, व्हॅस्क्युलर. हाही डिन्मेशियाचा प्रकार आहे. व्हिटामिन्स, मिनरर्ल्स, मेटोबॉलिझमची कमतरता, किंवा अपघातामुळे मेंदूला आलेली जखम, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म बदल मोठ्या प्रमाणावर घडल्याने डिमेन्शिया होतो. डिमेन्शियामुळे स्मरणशक्ती कमी होतेच, पण सारासार विचारसरणी आणि भावना आणि वर्तनावर नियंत्रण रहात नाही. वैद्यकीय शास्त्रातल्या प्रगतीमुळे आयुष्यमान वाढल्याने वृद्धांची संख्या वाढते आहे. आयुष्य जेवढे वाढते, डिमेन्शियाचे लोकसंख्येतील प्रमाण तेवढेच वाढत आहे.
वय वर्षे 65 पर्यंत स्मृतिभ्रंशाचे प्रमाण शंभरात पाच टक्के असे आहे. वय वर्षे 80 पर्यंत ते 50 टक्के तर त्यापुढील वयात 90 टक्के एवढे स्मृतिभ्रंशाचे प्रमाण वाढते. जगात 24 दशलक्ष हून आधिक ज्येष्ठांना स्मृतीभ्रंशाने ग्रासले आहे. येत्या 20 वर्षांत हे प्रमाण दुप्पट होण्याची भीती इंडिया डिन्मेशिया रिपोर्टच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
आपल्याकडे 60 ते 65 वयोगटात डिमेन्शियाचे 2 ते 4 टक्के, 65 ते 75 वयोगटात हे प्रमाण 4 ते 9 टक्के तर 75 पुढील वयोगटात हे प्रमाण 25 ते 30 टक्के असते. बरा होणारा किंवा औषधांनी नियंत्रित होणारा डिमेन्शिया हा रोग आहे. पण मेंदूतील पेशीत मोठ्या प्रमाणावर एकत्रित संप्रेरकांमध्ये बदल घडल्यास होणारा डिन्मेशिया हा नियंत्रित न होणारा असतो.
डिन्मेशियामुळे पेशंटचे दैनंदिन चक्र पूर्ण बदलते. त्यामुळे छोट्या गोष्टींमध्ये त्यांची काळजी कुटुंबाने घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्यस्त ठेवण्याची गरज आहे. ज्येष्ठांनीही रोज कोडी सोडविणे, यासारखे मेंदूला व्यायाम देणारे खेळ खेळावेत, असे सांगितले जाते. आपल्याकडे निवृत्तीचे वय 60 आहे. त्यामुळे त्या वयोगटातील सर्वांना काही ना काही गोष्टींचे विस्मरण सहज होते. या कधीतरी होणाऱ्या विस्मरणाकडे दुर्लक्ष करू नका तर मेंदूची स्क्रिनींग टेस्ट करा, असे आवाहन त्यांनी केले.
डिमेन्शिया आणि निगेटीव्ह थॉट्स हे एकमेकांशी संबंधित आहेत का?
एकदा एक काका अचानक घरातून निघून गेले. ते हरवल्याचे समजताच सर्वांचीच धावपळ सुरू झाली. दोन मुलं, दोन नातू, सगळे शेजारीपाजारी सगळीकडे शोधू लागले. शेवटी पोलिसांमध्ये मिसिंगची तक्रार दिली. रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशनमधून फोन आला की, रेल्वे स्टेशनजवळील मंदिरात ते सापडले आहेत, पण त्यांना काहीच सांगता येत नव्हतं. सुचत नव्हतं. पण पोलिसांकडे फोटो असल्याने त्यांना ओळखणं सोपं झालं. मध्यरात्री काका घरी आले. सर्वांचा जीव भांड्यात पडला. मात्र, सतत विसरण्याचा त्यांना आजार जडला होता. डिमेन्शिया साधारणपणे उतारवयात पहायला मिळतो.
- लक्षात न रहाणे
- साध्या साध्या गोष्टी विसरायला होणे,
- स्वत:चंच नाव विसरणे
- एरवी फोनवरील निरोप सांगायला विसरण
- निरोप द्यायला, कोण आलं-गेलं विसरणे
- घरातील वस्तु नेहमीच्या जागी न ठेवणं
- एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा विचारणे
- जेवण झालेलं असलं तरी परत जेवायला मागणे
- शर्टची बटणे नीट लावता न येणे
अशा प्रकारचा हा त्रास डिमेन्शियासारख्या आजाराचा असू शकतो. डिमेन्शिया हा मेंदूचा आजार वाढत्या वयात होणारा आहे. ज्यात मानसिक क्षमता, लक्षात ठेवणं, भाषा, मनाची एकाग्रता, सारासार विचार करण्याची क्षमता, तर्क लावणे, विविध कृतींचा ताळमेळ इत्यादींवर परिणाम होतो. हा त्रास हळूहळू वाढत जातो.
सुरुवातीला घरच्यांना समजत नाही की ही व्यक्ती असं का वागायला लागलीय, हळूहळू जेव्हा वागणं इतरांना त्रासदायक व्हायला लागतं, त्यावेळेस वैद्यकीय मदत घेतली जाते. तोपर्यंत बऱ्याचदा उशीर होतो. या आजारात रुग्ण बरा न होता याचा त्रास हळूहळू वाढत जातो, तब्येत खालावत जाते. याकरिता लवकर म्हणजे आजाराच्या सुरुवातीला उपचार सुरू केले तर आजाराची तीव्रता, प्रगती याला आपण काही प्रमाणात प्रतिबंध करू शकतो. काही गैरसमज: म्हातारचळ लागलंय किंवा मुद्दामहून करतात. सतत आजाराचे नाटक करतात. अधून-मधून हे रुग्ण नॉर्मल वागताना दिसतात म्हणून अशी शंका येऊ शकते.
वय झाल्यावर थोडेफार विस्मरण हे स्वाभाविक असतं, पण काही लोकांना डिमेन्शिया आजार होतो. पाच ते सात टक्के लोकांना साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयानंतर हा त्रास सुरू होतो. बऱ्याचदा या आजाराला काहीच उपचार नाहीत, आता हा आजार वाढत जाणार, आता फक्त जमेल तशी सेवा करणं आपल्या हातात आहे, असाही एक गैरसमज आढळतो. हा आजार वाढत जाणारा असला तरी त्याची लक्षणं वाढणार नाहीत व त्रास कमी करता येईल, अशी औषधे निश्चितच उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णाला व त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस होणारा त्रास कमी करू शकतो.
या आजारांबरोबरच बऱ्याचदा भास होणे, भ्रम होणे, चिडचिड, झोप न लागणे, बडबड करणे इत्यादी मानसिक लक्षणे दिसून येतात. त्याकरिता हे औषधोपचार उपयोगी ठरू शकतात. डिमेन्शिया हा मेंदूचा आजार आहे त्या करिता त्या व्यक्तीला दोष देऊ नका किंवा त्याची लाज वाटून देऊ नका. डिमेन्शिया वाढल्यानंतर रुग्णाची काळजी लहान मुलांसारखी घ्यावी लागते. आजार समजून घेतल्यास अधिक चांगल्या प्रकारे रुग्णाला मदत करता येईल. त्याचबरोबर स्वतः वरचा ताण कमी करता येईल व आजारी व्यक्तीस सन्मानाने वागवता येईल.
सुरुवातीच्या काळात घ्यायची काळजी
- शक्यतो स्वतःची कामे स्वतः करू द्या.
- चुकल्यास न रागावता शांतपणे लक्षात आणून द्या.
- त्यांना त्यांची कामे करू द्या.
- घरात मोठे घड्याळ कॅलेंडर दिसेल असे लावा.
- घरातील छोटी-छोटी कामे करू द्या.
- घरातल्या व्यक्तींचे मोठे फोटो लावून ठेवा.
- फोन नंबर महत्त्वाचे मोठ्या अक्षरात लिहून ठेवा.
- स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.
- बाहेर फिरणं, निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त त्यांना वेळ घालू द्या. संगीत, टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम त्यांना पाहू द्या.
- ज्येष्ठ नागरिक संघ मीटिंग आणि जमेल तसा व्यायाम हे उपयुक्त ठरते.
या बरोबरच रुग्णाची काळजी घेणाऱ्यांनीस्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये म्हणजे न कंटाळता, न चिडता, समाधानाने रुग्णाची सेवा जास्त काळ करता येईल. डिमेन्शिया टाळण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सतत सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे. मोकळ्या हवेत व्यायाम करणे, समाजात लोकांमध्ये मिसळणे, सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, आपले बीपी, डायबेटिस नियंत्रणात ठेवणे, योग्य संतुलित आहार तर महत्त्वाचे.
याचबरोबर बुद्धीला चालना देणारी कामे करत राहणे, नवीन काहीतरी शिकत राहणे, वाचन, वादन, गायन, संगीत महोत्सवाला हजेरी, बागकाम इत्यादी छंद जोपासणे, याकरिता फार खर्च करायची गरज नाही, यामुळे निश्चितपणे आपल्याला हा डिमेन्शियासारखा त्रास टाळता येऊ शकेल.
जागरुकता आवश्यक
माणसाच्या मेंदूमध्ये 10 लाख कोटी मेंदूपेशी असतात. मेंदूतील प्रमुख रसायने ऍट्रनलीन, नॉरऍड्र्÷िऱ्÷रनलीन, डोपामिन, ऍसिटिलकोलिन आहेत. याशिवाय न्यूरोटासॅन्सन, एकॉफिलिन, न्युरोझोटिन, एन्डाफिन ही रसायनेसुद्धा कार्य करतात. वेगवेगळया आजारांत वेगवेगळ्या रसायनांचे कार्य बिघडते. उतारवयात मेंदूंमधील पेशींची संख्या कमी होत जाते.
त्यामुळे आठवणींवर विपरित परिणाम होतो. यालाच स्मृतिभंश किंवा डिमेन्शिया म्हणतात, हे एव्हाना आपण पाहिलेच आहे.
डिमेन्शियासारख्या आजारांबाबत आपल्याकडे फारशी जागृती नाही. म्हातारपण आले, की स्मरणशक्ती कमी होते, हे सगळेच जण गृहित धरतात. आणि त्याप्रमाणेच ज्येष्ठांचे आणि घरातील व्यक्तिंचे सर्व व्यवहार चालतात.
पण डिमेन्शिया आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाणे जरुरीचे आहे. डिमेन्शिया आजारात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. एकाग्रता, भाषणकौशल्य, स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता कमी होते. पेशंटची वर्तणूक बदलते तसेच स्वभावातही बरेच बदल दिसतात. यात चिडचिडेपणा, हिंसक वृत्ती, हट्टीपणा, दुर्लक्षिले गेल्याची भावना व त्यातून येणारे नैराश्य व आजाराच्या पुढच्या अवस्थेत किंवा उपचारांअभावी पेशंटला भास होणे, भ्रम होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे आदी लक्षणे दिसतात.
साधारणपणे वयाच्या साठीनंतर मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. स्मरणशक्ती कमी होते, हाता-पायांची हालचाल कमी होणे, रोजच्या कामाचा विसर पडणे या गोष्टी वाढत जातात. मेंदूतील पेशी नाश पावल्या, की पुन्हा जिवंत होत नाहीत. त्यामुळेच बुद्धीचा ऱ्हास होतो. आजाराच्या पुढील टप्प्यात पेशंट स्वतःलाही ओळखत नाही. रस्त्यावरून जाताना कोठे जायचे याचा विसर पडतो. ही स्टेज म्हणजे अल्झायमर. डिमेन्शियामध्ये मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाल्याने काही वेळा पॅरॅलिसीससारखा आजारही होऊ शकतो.
भविष्याची अनिश्चितता आणि स्वतःला अपाय होण्याची संभाव्यता यामुळे मनात चिंता निर्माण होते. त्यात मनुष्य इतका हरवून जातो, की घरात कुणाशी बोलतो आहे, याचेही भान राहात नाही. उलट गरजेनुसार निर्माण झालेला बुद्धिमत्तेवरील ताण अधिक नवनिर्मिती करतो; पण चिंता अधिक झाली, तर ती धोकादायक ठरते. त्या स्थितीला चिंताग्रस्ताचा विकार जडला आहे, असे म्हटले जाते.
हे पडताळून पाहण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे शोधा-
- मन एकाग्र करणे जड जात आहे का?
- खालेल्या अन्नाचे पचन होते का?
- सभोवती बरीच माणसे असल्यास तुम्हावर दडपण येते का?
- तुम्हाला पहिल्यापेक्षा लवकर राग येतो का?
- सातत्याने तणावाची किंवा कडेलोट झाल्याची तुमची भावना असते का?
- निर्णय घेण्यास भीती वाटते का?
कोणत्याही समस्येला तोंड देण्याचे कार्य मेंदू करतो. मेंदू चांगल्या स्थितीत असण्यासाठी आहार सकस व संतुलित ठेवावा. त्यामुळे मेंदूच्या सर्व पेशींना आवश्यक जीवनसत्त्वे, क्षार व महत्त्वाचे घटक मिळतील. विविध तृणधान्ये, मोड आलेली कडधान्ये, सर्व भाज्या, कोशिंबिरी, दूध, ऋतुमानाप्रमाणे फलाहार, आवश्यक तेवढे मीठ, मसाले, मर्यादित प्रमाणात तेल, तूप आहारात असावे. गोड खाणे टाळावे. मद्यपान, धुम्रपान तर मेंदूसाठी कटाक्षाने टाळावे. नियमित व्यायाम करावा. वर्तमानपत्रातील कोडी नियमित सोडवावी. याप्रमाणे शारीरिक, मानसिक स्थिती चांगली राहते. असे केले, तर डिमेन्शिया, अल्झायमरसारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकू.
– डॉ. एस.एल. शहाणे