[[{“value”:”
– ऋषिकेश जंगम
मुंबई : आजच्या काळात केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेल्यावर कानात एअरपॉड्स, समोर मोठा आरसा आणि हातात मोबाईल असतो. पण एक काळ असा होता, जेव्हा गल्लीतील छोटंसं सलून म्हणजे फक्त हेअरकट करण्याची जागा नव्हती;
तिथे रेडिओवर किंवा जुन्या म्युझिक सिस्टमवर कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक यांच्या आवाजातली सदाबहार गाणी वाजायची… केस कापता कापता ही गाणी कानावर पडायची आणि नकळत त्या काळातलं बालपण डोळ्यांसमोर उभं राहायचं. आता याच जुन्या आठवणींना इंटरनेटने अक्षरशः डिजिटल रूप दिलं आहे!
सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर सध्या ‘Deluxe Saloon’ म्हणजेच ‘saloon.wtf’ या भन्नाट वेबसाइटची जोरदार चर्चा सुरू आहे. नाव ऐकून ही एखादी हेअर कटिंग सलूनची वेबसाइट वाटू शकते; पण प्रत्यक्षात हे कोणतेही सलून, हेअर कटिंग सेंटर किंवा ब्युटी सर्व्हिसचं ऑनलाइन प्लॅटफॉर्म नाही.
ही आहे जुन्या काळातील भारतीय सलूनचा माहोल आणि 90च्या दशकातील संगीताची आठवण करून देणारा एक छोटासा, पण भन्नाट म्युझिक प्रोजेक्ट. ‘यश भारद्वाज’ यांनी तयार केलेल्या या वेबसाइटने आपल्या साधेपणामुळेच इंटरनेटवर लक्ष वेधून घेतलं आहे.
नेमकं काय आहे हे ‘Deluxe Saloon’?
‘Deluxe Saloon’चा सगळ्यात मोठा आकर्षण म्हणजे त्याचा नॉस्टॅल्जिक फील. वेबसाइट उघडली की तुम्हाला एखाद्या आधुनिक म्युझिक स्ट्रीमिंग अॅपसारखे शेकडो पर्याय, प्लेलिस्ट किंवा गुंतागुंतीचे मेन्यू दिसत नाहीत. उलट, संकल्पना मुद्दाम साधी ठेवण्यात आली आहे.
जुन्या गल्लीतील सलूनमध्ये बसून केस कापून घेताना पार्श्वभूमीवर 90च्या दशकातील हिंदी गाणी सुरू असावीत, असा अनुभव डिजिटल पद्धतीने देण्याचा हा प्रयत्न आहे.
विशेष म्हणजे, वेबसाइटच्या निर्मात्याने स्वतः X वर ही कल्पना शेअर करताना “simple hairstyles with music that could fix your soul” अशा शब्दांत प्रोजेक्टची संकल्पना मांडली आहे.
कुमार सानूची गाणी आणि ‘नाईंटीज’ची आठवण :
90च्या दशकातील हिंदी चित्रपटसंगीताची एक वेगळीच ओळख होती. कुमार सानू, उदित नारायण, अभिजीत, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल यांसारख्या गायकांच्या आवाजातील प्रेमगीतं त्या काळातील तरुणाईच्या आठवणींचा भाग बनली.
आजच्या जनरेशनसाठी हा फक्त जुना संगीतकाळ असला, तरी 90च्या दशकात वाढलेल्या अनेकांसाठी ही गाणी म्हणजे बालपण, शाळा, गल्ली, मित्र, जुन्या टीव्हीवरील गाणी आणि स्थानिक सलूनमधील संगीत यांच्याशी जोडलेल्या आठवणी आहेत. आणि याच भावनेला ‘Deluxe Saloon’ने हात घातला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांना अक्षरशः जुन्या काळात नेऊन सोडलं.
आज Spotify, YouTube Music किंवा इतर म्युझिक अॅप्सवर गाणं आवडलं नाही की लगेच Skip च बटन येत, पण ‘Deluxe Saloon’ची गंमत याच्या अगदी उलट आहे. जुन्या सलूनचा अनुभव जसा होता, तसा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
म्हणजे तुम्ही एखाद्या जुन्या सलूनमध्ये बसला आहात आणि तिथे दुकानदाराने लावलेलं गाणं तुम्हाला ऐकावंच लागणार आहे. आणि हीच मर्यादा या वेबसाइटला वेगळी ओळख देते. आधुनिक म्युझिक प्लेअरपेक्षा हा एक डिजिटल नॉस्टॅल्जिया एक्सपीरियन्स म्हणून पाहता येतो.
यश भारद्वाज कोण?
‘Deluxe Saloon’मागे असलेलं नाव म्हणजे ‘यश भारद्वाज’. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ते टेक्नॉलॉजी, डिझाइन आणि इंटरनेट प्रोजेक्ट्सवर काम करणारे क्रिएटर आहेत. ते आपल्या वेबसाइटवर विविध स्वतःच्या प्रोजेक्ट्सची माहिती देतात. त्यात Thumbnail Market, BulkGen, Pondy Life आणि CheckPlug यांचा समावेश आहे.
यश यांच्या प्रोफाइलची आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी भारतातील एका meme-page networkची निर्मिती केल्याचा दावा केला आहे, ज्याने तब्बल 16 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला होता.
त्यांच्या वेबसाइटनुसार त्यांनी 2016 पासून 220 कंपन्यांसोबत काम केलं आहे. तसेच Solana आणि Balaji Srinivasan यांच्याशी संबंधित डिझाइन कामाचा त्यांनी उल्लेख केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ‘saloon.wtf’बाबत त्यांचा स्वतःचा X पोस्टही उपलब्ध आहे. त्या पोस्टमध्ये “I made a website…” असं सांगत त्यांनी या प्रोजेक्टची निर्मिती स्वतः केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ‘Deluxe Saloon’चे निर्माते म्हणून यश भारद्वाज यांचं नाव अधिकृतपणे त्यांच्या स्वतःच्या प्रोफाइलवरून जोडता येतं.
एका साध्या कल्पनेने इंटरनेटवर एवढी चर्चा का?
याचं उत्तर कदाचित ‘नॉस्टॅल्जिया’मध्ये दडलं आहे. इंटरनेटवर दररोज हजारो नवीन अॅप्स, AI टूल्स, गेम्स आणि वेबसाइट्स येतात. पण त्यापैकी एखादी साधी वेबसाइट लोकांना त्यांच्या बालपणाची आठवण करून देते, तेव्हा तिचं आकर्षण वेगळंच असतं.
‘Deluxe Saloon’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गाजावाजा केला नाही. उलट साधेपणा, जुनं संगीत आणि भारतीय मध्यमवर्गीय आठवणींचा संदर्भ यांचा वापर केला. त्यामुळे ही वेबसाइट पाहताना अनेकांना “अरे, आपल्या जुन्या सलूनमध्येही असंच संगीत वाजायचं!” अशी भावना होते.
म्हणूनच ‘Deluxe Saloon’ ही केवळ म्युझिक वेबसाइट म्हणून न पाहता 90sच्या भारतीय पॉप-कल्चरला डिजिटल सलाम करणारा एक छोटासा इंटरनेट प्रोजेक्ट म्हणून पाहता येईल.
‘सलून’च्या नावामागची गंमत काय?
वेबसाइटचं नावच ‘Deluxe Saloon’ आणि डोमेन ‘saloon.wtf’ हे देखील या प्रोजेक्टच्या विनोदी आणि जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्वभावाशी जुळतं. नाव पाहून आधी “इथे हेअरकट मिळतो की काय?” असा प्रश्न पडतो;
पण वेबसाइट उघडल्यानंतर समोर येतो तो केस कापण्याचा नव्हे, तर आठवणींमध्ये रमण्याचा अनुभव! आणि कदाचित याच अनपेक्षित कल्पनेमुळे ‘Deluxe Saloon’ सोशल मीडियावर इतका चर्चेत आला आहे.
“}]]
