आरोग्य ही संपत्ती मानली जात असल्याने ती मिळावी आणि मिळाल्यावर ती दीर्घ काळ टिकावी ह्यासाठी आपण सतर्क राहून सातत्याने प्रयत्न करणे हे अत्यंत आवश्यक असते. हे सातत्य राखण्यसाठी लहान- मोठ्या सर्वांनीच रोज व्यायाम करणे हे नितांत गरजेचे आहे.
दैनंदिन व्यायामाची गरज काय? असे जर कोणी विचारले तर त्याला हेच उत्तर मिळू शकते की बाबारे! व्यायाम हा रोज का करायचा, कसा करायचा, कोणत्या स्वरूपाचा करायचा ह्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे खालील शरीराच्या गरजा पूर्ण करणे हेच आहे.
माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे माणसाचे हृदय. या हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, हृदयाचे शरीरास रक्त पुरविणे, रक्ताचे योग्य पकारे रक्ताभिसरण घडविणे. शरीर सक्षम करणे, सर्व शरीरास सुरळितपणे रक्त पुरवठा होणे.
माणसाच्या शरीरास सुडौलपणा येणे, त्याच्या स्नायूंना बळकटी येणे.
व्यवस्थित भूक लागणे व खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होणे, पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालणे.
चांगली झोप येणे.
शरीरातील मेद, चरबी, लठ्ठपणा कमी होणे
मानसिक ताणतणाव कमी होऊन मन शरीर ताजेतवाने व अधिक कार्यक्षम होणे.
वाढत्या वयाबरोबर होऊ पाहणारे, मधुमेह, हृदयरोग, कंपवात ह्या सारख्या व्याधी होण्याची शक्यता कमी करणे.
वरीलप्रमाणे शारीरिक क्षमतेच्या वाढीसाठी व्यायामाची असणारी गरज लक्षात घेऊन आरोग्यतज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर्स आणि अनुभवी व्यक्ती ह्यांच्याकडून जे व्यायामाचे प्रकार करावेत असे सांगितले जातात ते असे की –
हृदयाची सबलता वाढविण्यासाठी धावणे, जलद गतीचे चालणे, दोरीवरच्या उड्या मारणे. पोहोणे, सायकल चालविणे अशा प्रकारे व्यायाम करावेत.
स्नायूंच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या सुडौलतेसाठी झाडावर चढणे, उठाबशा काढणे, जोरबैठका मारणे पुलअप्स काढणे, झोके घेणे, यासारखे व्यायाम करावेत.
आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी दोरी वरच्या उड्या मारणे, मैदानी खेळ खेळणे, धावणे, पळणे यासारखा व्यायाम करावा.
वरील प्रकारचे व्यायाम हे थोडे थोडे पण रोज करायला हवेत. सूर्य नमस्कार आणि चालणे हे सर्वात सोपे व्यायाम प्रकार असून ते फार उपयुक्त आहेत. एका सूर्यनमस्कारात अनेक प्रकारच्या शारीरिक हालचाली होत असल्याने सूर्य नमस्कार घालणे हा एक प्रभावी व्यायामप्रकार मानला गेलेला आहे. व्यायाम करण्यासाठी आपल्याला कोणताच आर्थिक बोजा उचलावा लागत नाही. त्यासाठे लागते फक्त थोडीशी हवेशीर मोकळी जागा, आणि आपल्या मनाची जिद्द. आपण व्यायामामध्ये सातत्य राखले तरच त्याचा फायदा होऊ शकतो.
कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम केल्यावर काही गोष्टीची विशेष खबर दारी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
उदाहरणार्थ-
व्यायामाने घाम आला असता त्यावर वारा बसू देऊ नये.
व्यायाम झाल्यावर थोडी विश्रांती अवश्य घ्यावी.
व्यायाम केल्याने घाम येतो शरीरातील पाणी बाहेर जाते, त्यामुळे तहान लागते, पण व्यायाम केल्याकेल्या पाणी पिऊ नये.
या संदर्भात एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की इथे “पी हळद अन् हो गोरी’ असे घडत नाही. त्यासाठी व्यायामातले सातत्य, आहाराची बंधने, ह्या गोष्टीपण पाळाव्या लागतात.
तरच आपल्याला आनंदी आणि स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्याची साथ मिळते.
चला न्याहारीला!
चला.. मुलांनो, नाष्टा तयार आहे हं लवकर या. आईने मुलांना आवाज दिला.
सोनू चल रे तुला क्लासला जायचंय ना? ब्रेकफास्ट तयार आहे, ये लवकर ताईने दादाला बोलावले.
अरे आलात का मुलांनो! न्याहारी तयार झालीय हं, पटकन या सारे, आजीने नातवंडांना आवाज दिला.
मुले गोळा झाली. प्रत्येकाने आपापली उपमा भरलेली डीश हातात घेतली आणि मुले ब्रेकफास्ट करू लागली. मध्येच धाकट्या नातवाने विचारले, आजी तू म्हणालीस, न्याहारी, आई म्हणाली नाष्टा ताई म्हणाली ब्रेकफास्ट. हे असं का?
त्यावर मुलांना समजावणीच्या स्वरात आजी म्हणाली, त्याच काय आहे, हे शब्द किंवा ही नावे जरी वेगवेगळी असली तरी त्या सर्वाचा अर्थ किंवा इथे अभिप्रेत असलेली कृती एकच आहे. हे बघा! ब्रेक म्हणजे काय तोडा, आणि फास्ट म्हणजे काय तर उपास, लंघन, न खाण्याचा कालावधी, होय ना? तसेच मराठी भाषेतल्या नाष्टा किंवा न्याहारी या शब्दाचा अर्थ हा सुद्धा हाच आहे की रात्रीच्या जेवणापासून आपण दीर्घकाळ काही खाल्लेले नसते ते खाणे. सकाळचे पहिले खाणे म्हणजेच न्याहारी किंवा नाष्टा. आलं का लक्षात? पण आजी! हा नाष्टा करायलाच हवा का? कित्येक वेळा मला उशीर झालेला असतो आणि आई मात्र आग्रह करीत असते की काही तरी खाऊनच जा. हे असं का? नातीने विचारले. त्यावर आजी म्हणाली, हे बघा! आरोग्यशास्त्रानुसार ह्या सकाळच्या खाण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचं कारण असे की रात्री आपण जेवण करून बराच वेळ झालेला असतो.
पोटातील अन्नाचे पचन होऊन, सकाळचे प्रात: विधीही उरकल्याने पोट रिकामे झालेले असते, पण आपल्या जठरातील पित्तरस, पाचक रस हे तर साठलेले असतातच. त्यांना वेळीच फिडिंग दिले नाही तर ते उसळतात मग डोके दु:खी, उलटी, मळमळ, घशाशी येणं असे त्रास सुरू होतात. ते टाळण्यासाठी किंवा तसा त्रास होऊ नये म्हणूनच हे सकाळचे नाष्टा करणे महत्त्वाचे असते.
आता आपण केव्हा कसं आणि किती खावे हे सुद्धा आरोग्यतज्ज्ञांनी आणि अनुभवी लोकांनी त्यांच्या अभ्यास आणि स्वानुभावाने सांगून ठेवले आहे. आपल्याकडे या संदर्भात असे सांगतात की सकाळचा नाष्टा हा भरपूर करावा, दुपारी मध्यम जेवावे आणि रात्री हलका आहार घ्यावा.
सकाळी हा नाष्टा, ही न्याहारी, हा ब्रेकफास्ट का करायचा हे समजले तरी तो कशासाठी ही जिज्ञासा मुलांच्या मनात होतीच. त्याचेही उत्तर असे की या सकाळच्या आणि योग्य अशा खाण्याने आपल्या शरीरातील पचनसंस्थेस कार्यान्वित केले जाते, शक्ती ऊर्जा उत्साह ताजेतवाने वाटणे आपल्याला काम करण्यास उत्साह वाटणे, शारीरिक मरगळ दूर होऊन शरीर दिवसभर सक्षम आणि कार्यरत राहणे हे या सकाळच्या न्याहारीचे प्रमुख फायदे आहेत.
आता हा नाष्टा कोणता आणि किती करावा? या बाबतही काही नियम किंवा सूचना सांगितल्या जातात. त्या अशा की –
ज्याने त्याने आपापल्या भूकेच्या प्रमाणात कमी जास्त न्याहारी करावी.
या न्याहारीमध्ये कालपरत्वे आणि ऋतुमानाप्रमाणे आवश्यक ते बदल करावेत.
त्यात त्या त्या ऋतुमानात उपलब्ध असलेल्या भाच्या, फळे, ह्यांचा समावेश करावा.
उकडलेले, भाजलेले, शिजवलेले हलके आणि पौष्टिक अशा पदार्थांची या न्याहारीत योजना असावी.
ब्रेड, बिस्किट, टोस्ट, खारी ह्या सारख्या बेकरी पदार्थांचा ही मर्यादित प्रमाणात ह्यात समावेश करता येतो.
ही न्याहारी प्रथिनेयुक्त, कर्ब्रोदके आणि साखर ह्याचे प्रमाण संतुलित असेल अशी असावी.
यामध्ये तेलकट तूपकट पदार्थ असू नयेत.
या सकाळच्या न्याहारीत सामावेश करता येईल किंवा ज्यांचा समावेश केला जातो असे पदार्थ आहेत ते म्हणजे-रव्याची खीर, धिरडे, धपाटे, खिचडी, उपमा, शिरा, मेतकूट तूपभात, खुदखुद्या भात, फळे दूध, इत्यादी. तसेच आरोग्याचा विचार करून आरोग्यतज्ज्ञांकडून असेही सांगितले जाते की उत्तम कार्यक्षमता, ताजेतवानेपणा, उत्साह स्फूर्ती ह्यासाठी एक चमचाभर तूप आणि किमान अर्धाकप दूध हे अवश्य घ्यावे.
या न्याहारीचे प्रमाण आणि त्यातील पदार्थांची निवड ही लहान मुले मोठी माणसे त्यांचे कामाचे स्वरूप, वयोमान, प्रकृतीमान, आजार, ह्याचा विचार करून त्यात आवश्यक ते बदल करावेत.
ह्या सर्वांचा विचार केला असता आपल्या हे सहजपणे लक्षात येईल की या सकाळच्या न्याहारीला आपल्या दैनंदिन आरोग्यात किती महत्त्वाचे स्थान आहे.
– मंजिरी गोखले