दुपारचे जेवण झाले, हात धुतले, तोंडात सुपारी किंवा बडिशेप टाकली की नकळ्त आपली पावले जड होतात. शरीर सुस्तावू लागते. डोळ्यावर हळूहळू झापड येऊ लागते. अशावेळी लगेच झोपावेसे वाटते. पण तसे करणे हे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याने असे सांगितले जाते की जेवल्यावर लगेच झोपू नये. निदान थोडावेळ तरी बसावे किंवा लगेचच न झोपता काही वेळ तरी थोडे चालावे. अशा जेवणानंतरच्या चालण्याच्या छोट्या व्यायामाला “शतपावली घालणे’ असे म्हणतात. शतपावली या शब्दातूनच किती पावले चालावीत, याचा संकेत दिलेला आहे. शत म्हणजे शंभर, किमान शंभर पावले तरी चालावीत असे आरोग्यशास्त्र सांगते.
शतपावली घाला हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की, जेवल्या जेवल्या जर झोपेसाठी आडवे झाले तर अन्न पचन क्रियेत अडचण येते. शतपावली घातल्याने जी शारीरिक हालचाल होते, त्यामुळे शरीर सैल आणि हलके होते. चालण्याचा थोडासा व्यायाम झाला म्हणजे डोळ्यावर येणारी पेंग कमी होते. या शतपावली घालण्याच्या साध्या सोप्या उपायासाठी केवळ जेमतेम दहाच मिनिटांचा कालावधी लागतो.
पण ही काही मिनिटेच आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन करण्यास फार उपयुक्त ठरतात. नोकरदार लोकांना जेवणानंतर लगेच कामास सुरुवात न करता अशा प्रकारे ऑफिसमध्येच मोकळ्या जागेत चालून ही शतपावली अवश्य घालावी. या प्रत्येकांनी व्यायामासाठी मुद्दाम वेळ द्यावा. त्याची त्यांना कार्यक्षमता वाढण्याच्या कामी नक्कीच मदत होते.
नोकरदार व्यावसायिक कामासाठी घराबाहेर जाणारे लोक ह्यांना आठवडाभर डब्यातल्या भाजी पोळीवरच दुपारच्या जेवणाचा आनंद मानावा लागतो. अशा लोकांना सुट्टीचा रविवार, सुट्टी, सणवार अशा वेळी दुपारचे व्यवस्थित पानभर जेवण केले की त्या पाठोपाठ येणारी सुस्ती, अनिवार्य झोप ह्या गोष्टी अगदी टाळायच्या म्हटल्या तरी टाळता येत नाहीत.
ही वास्तविकता लक्षात घेऊनच शतपावलीच्या सोप्या उपायाबरोबरच आपल्याला आणखी एक छानसा सल्ला दिला जातो. तो म्हणजे जेवल्यावर प्रथम शतपावली घाला आणि मग झोपण्याचा विचार करा. देहाला येणारी सुस्ती, जडावलेले डोळे, पेंगुळलेले शरीर ह्यांना आराम देण्यासाठी तुम्ही झोप घ्या. पण ती कशी आणि किती घ्यायची तर तुमची ही दुपारची झोप म्हणजे एक छानशी छोटी डुलकी अर्थातच वामकुक्षी असायला हवी.
आता ही वामकुक्षी म्हणजे काय? ती कशी घ्यायची ह्या संदर्भात जे योग्य असे मार्गदर्शन केले जाते. जो मोलाचा सल्ला दिला जातो त्यात असे सांगितलेले आहे की अनेकांना दुपारची झोप अनावर होते त्यामुळे ती घ्यावी पण ती कशी ?
तर जेवणानंतर शतपावली घालून झाली की झोपेसाठी डाव्या कुशीवर आडवे व्हावे. आपल्या डाव्या हाताची डोक्याखाली उशी करावी. डाव्या हाताची उशी डोक्याखाली घेऊन डाव्या बाजूस वळून झोपणे याला “वामकुक्षी’ घेणे असे म्हणतात. या शतपावलीचे किंवा छोट्याशाच वामकुक्षीचे फायदे कोणते? यासंदर्भात असे सांगता येईल की याचे प्रामुख्याने खालील फायदे आहेत.
शतपावलीचे फायदे
शतपावली घालत असताना पोटातील पाचकरसाचे प्रमाण वाढते.
त्यामुऴे अन्न पचनक्रिया जलद होण्यास मदत मिळते.
सतत अभ्यास करणाऱ्या मुलांनी मधूनच उठून हा शतपावलीचा व्यायाम केला तर त्यांना जी शारीरिक आणि बौद्धिक विश्रांती मिळते, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यास मदत होते.
दुपारच्या छोट्या वामकुक्षीचे मोठे फायदे हे असे सांगितले जातात
यामुळे खाल्लेल्या अन्नाच्या पचनास मदत होते.
पचनक्रिया सुधारून अपचनाचा त्रास दूर होतो.
आलष्स्स न वाढता शरीर ताजेतवाने आणि अधिक कार्यक्षम होते.
स्मरण शक्तीचा विकास होतो.
रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांना हा त्रास कमी करण्यास याची मदत होते.
काही प्रमाणात हृदयविकारावरही हे उपाय चांगले परिणामकारक ठरतात.
संध्याकाळचे खाणे
साधारणपणे संध्याकाळच्या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्या गोष्टी समाविष्ट असतात त्या म्हणजे संध्याकाळचा चहा नाष्टा आणि मग मस्तपैकी फिरायला जाणे. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ह्या दोन्ही मधली दरी भरून काढण्याचे काम हे संध्याकाळच्या चहा नाष्ट्याचे असते.
दुपारची झोप झाली किंवा कामावरुन दमून भागून आल्यावर चहाचा एक कप प्यायल्या शिवाय कशी पुढच्या कोणत्याच कामाला गती येत नाही, चहा म्हटला कि त्या सोबत, खारी बिस्किटे, बॅड, तसेच आवडी नुसार वेगवेगळे पदार्थ हे संध्याकाळच्या खाण्यसाठी आवर्जून तयार केले जातात. हा अस ाचहा नाष्टा झाला कि मग असतो तो फेरफटका.
संध्याकाळचा फेरफटका म्हणजेच चालणे. हा सुद्धा एक दैनदिन व्यायामाचाच प्रकार आहे. चालणे हा एक अत्यंत साधा सोपा बिन खर्चाचा आणि कोणालाही करता येण्यासारखा व्यायाम प्रकार आहे. चालायचे कसे ह्याचीसुद्धा एक पद्धत ठरलेली आहे. चालताना डोके, मान पाठ ही एका रेषेत सरळ असावी, दोन्ही पायातील अंतर सारखे असावे, चालण्याची गती एकसारखी ठेवावी, चालताना दोन्ही हात मोकळे ठेवावेत. ते सारख्या प्रमाणात मागे व्हायला हवेत. एका चालण्याच्या व्यायामात अनेक हालचालींचा समावेश असल्याने ते अवयव आणि स्नायू ह्यांना व्यायाम घडतो आणि ते अधिक कार्यक्षम बनतात.
– मंजिरी गोखले