आसुुखाची झोप ही माणसाच्या शरीराची आणि त्याच्या मानसिक प्रसन्नतेची ही नितांत गरजेची बाब आहे. झोप ही एक खरं म्हणजे देवाने माणसाला दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे. आता झोपेला देणगी म्हणावे लागते कारण योग्य वेळी घेतलेली आणि आलेली झोप हीच आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासाला पूरक असते.
शूऽऽऽ बोलू नका आवाज करू नका, बाळ झोपलंय, असे जेव्हा आई सांगते ना तेव्हा त्या शांत झोपेतूनच बाळाची खरी वाढ होणार आहे, बाळ बाळसं धरणार आहे, हे सुज्ञ मातेस चांगलेच माहीत असते. तसेच कोणाचीही झोपमोड करू नये, हा तर आपला एक शिष्टाचारही आहे.
दिवसा झोपणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही असे सांगितले जाते. दिवसा घेतलेली झोप ही अगदी अल्पकालिन म्हणजेच डुलकीच्या स्वरूपाचीच असावी. दिवसा जास्त झोपणे वा झोप येणे हे अनारोग्याचे लक्षण आहे. दिवसाच्या झोपेपेक्षा रात्रीची सुखाची झोप ही आपल्याला आपली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी उत्साह, ताजेतवानेपणा क्रियाशक्ती कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असते.
रात्री लवकर निजावे आणि सुखाची शांत झोप घेऊन सकाळी लवकर उठावे हा तर आरोग्याचा महामंत्रच आहे हे तर आपण सारेजण चांगल्या प्रकारेच जाणतो. त्यामुळेच आवश्यक असणारी सुुखाची आणि ती सुद्धा रात्रीची झोप मिळणे ह्यासाठी खरं तर प्रत्येकाचाच आटापिटाही असतो. ती गरजही असते आणि हक्क ही; परंतु अनेकदा असे लक्षात येते की, आपणच आपली सुखाची झोप मोडून घेण्यास कारणीभूत ठतत असतो.
सुुखाची झोप न येण्याची कारणे- खरं तर आपल्याला हवी असणारी सुखाची झोप ही येत मात्र नाही असं का व्हावं? ह्याचा विचार करायला लागले की असे लक्षात येते की-
साधारणपणे जेवणाची वेळ आणि रात्रीची झोप ह्यामध्ये किमान तासाभराचे तरी अंतर असायला हवे. पण अनेक वेळा या ना त्या कारणाने, दिरंगाईने, आपल्या जेवणाच्या वेळेत झालेला बदल आपल्या झोपेवर परिणाम करते.
रात्री फार जास्त जेवण झाले तर करपट ढेकरा येणे, पोटास तडस लागणे, अस्वस्थ वाटणे, प्रसंगी निजले वा आडवे झाले असता घशाकडे येणे, ह्याने जशी झोप लागत नाही तसेच राग रुसवा, भांडण वा अन्य काही कारणांनी फारच कमी खाल्ले असताना किंवा उपाशीच झोपले असताना शांत आणि सुखाची झोप येत नाही.
जेवणात जास्त तेलकट, तूपकट, जळजळीत पदार्थ खाल्ले तर छाती घशात जलजळ होते परिणामी झोप येत नाही.
झोपेची वेळ टळून गेली तर झोप येत नाही. मुलांचा गोंगाट, टीव्हीचा आवाज, उशिरापर्यंत चालणाऱ्या मालिका, पाहिलेले भयानक प्रसंग ही सुद्धा झोप न येण्याची कारणे आहेत. झोपेच्या खोलीतील प्रकाश योजना ही सुद्धा झोप न येणाचे कारण ठरू शकते.
शारीरिक कारणाबरोबरच मानसिक स्वास्थ्य, चिंता, काळजी, टेन्शन, एखाद्या गोष्टीची भीती, मानसिक ताणतणाव यासारख्या गोष्टीही झोप न लागण्यास किंवा ती उडविण्यास कारणीभूत ठरत असतात.
झोप नीट न येणे वा लागणे ह्याकरिता जागेतला बदल, सोबत, एकटेपणाची भीती, डोक्याखालच्या उशीची उंची, अंथरुणाची उंच सखलता, कॉट, जमीन, सोफा यासारख्या गोष्टीत झालेला बदल अशी कारणे असू शकतात.
वास्तविक सुखाची शांत झोप ही प्रत्येकालाच मिळायला हवी. त्यासाठी प्रत्येकानेच काही गोष्टीची योग्य ती खबरदारी बाळगणे आवश्यक असते. तसेच काही उपाययोजना कराणेही गरजेचे असते. या संदर्भात काही अनुभवी व्यक्तींकडून जो
सल्ला दिला जातो तो असा-
- शक्यतो तुमच्या झोपेची जागा बदलू नका.
- विनाकारण झोपेस उशीर करू नका. उगाच जागरण करणे प्रयत्नपूर्वक टाळा.
- स्वत: झोपायला जाताना इतरांना शुभ रात्रीचा संदेश द्या आणि घ्या.
- तुमच्या खोलीतील प्रकाश व्यवस्था नीट सांभाळा.
- आवश्यकता असेल, सवय असेल तर नातवंडे जोदीदार ह्यांची सोबत घ्या.
- झोप लागावी म्हणून झोपण्याआधी देवास प्रार्थना करा.
- सवयीनुसार थोडेसे वाचन करा.
- हरिपाठाचे वाचन, पठण, मनन आणि तुमच्या लाडक्या उपास्य देवतेचे नामस्मरण करा.
- लहान मुलांना झोप लागावी म्हणून त्यांना अंगाई गीते म्हणा किंवा छान छान गोष्टी सांगा.
- त्यांना छोटी पड पड कुडी, किंवा अस्तिक अस्तिक ह्यासारखी छोटी स्तोत्रे आणि प्रार्थना शिकवा.
- त्यांना भीती वाटेल, ती दचकून जागी होतील अशा गोष्टी सांगू नका दाखवू नका, खोटी भीती दाखवू नका.
- जेष्ठांना आपण त्यांच्या जवळच हाकेच्या अंतरावरच आहोत असा दिलासा द्या.
- इतरांची झोपमोड तुमच्याकडून होणार नाही किंवा तुमची कोणी झोपमोड करणार नाही याची काळजी घ्या. लक्षात राहू
- द्या की आजची सुखाची झोप हीच तुमच्या उद्याच्या अधिक कार्यक्षमतेची गुरुकिल्ली आहे तेव्हा तुम्हीही सुखाने झोपा आणि इतरांनाही सुखाची समाधानाची शांत झोप घेऊ द्या.
– मंजिरी गोखले