लहान मुलांना अनेक गोष्टी ह्या स्वत:च्या स्वत: करायच्या असतात. त्यातील एक आवडती गोष्ट म्हणजेच अंघोळ. त्यासाठी मुले ही स्वत:च अंघोळीला जातात. भडा भडा चार तांबे पाणी अंगावर ओतून घेतात आणि “”आई… टॉवेल….” अशी त्यांची गर्जना आपल्या कानावर येते.
त्याबरोबर त्यांची ती मागणी पुरवीत असताना आपण त्यांना म्हणतोसुद्धा की “”काय रे झाली तुझी कावळ्याची अंघोळ एवढ्यात.” कावळ्याची अंघोळ म्हणजे काय? तर कावळा कसा थोडफार पाणी कुठे दिसले तिकडे जातो. त्यात आपले पंख ओले करतो, इकडून तिकडून स्वत:च्या अंगावर थोडेसे पाणी उडवून घेतो आणि आपण छान अंघोळ केली असे त्याला वाटते.
लहान मुलांचीच काय पण काही वेळातर मोठ्या माणसांचीही अशाच प्रकारे झटकन स्नान उरकण्याची सवय असते.
आता या गोष्टी का घडतात तर स्नान किंवा अंघोळ ह्याचे महत्त्व त्यांना नीट समजलेलेच नसते असेच म्हणावे लागेल.
स्नान अर्थात अंघोळ हा आपल्या दैनंदिन आरोग्यदायक कृतीतला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे स्नान करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.
ज्याने त्याने त्याच्या शरीर प्रकृतीला झेपेल असे म्हणजेच गार, गरम, कोमट असे पाणी अंघोळीसाठी वापरावे.
पाण्याची निवड ही ऋतुमानाप्रमाणे करावी, त्यात परिस्थितीनुसार योग्य ते बदल करावेत. प्रथम अंगावर भरपूर पाणी ओतावे. अंगावर पाण्याचा पहिला तांब्या घेत असताना गंगा यमुना सरस्वती ह्या सारख्या पवित्र नद्यांचे स्मरण करावे. हरहर गंगेऽऽ असे म्हणावे.
अंग साबण लावून स्वच्छ घासावे.
हात, पाय, पाठ, डोके, तोंड, मान घासून, भरपूर पाणी घालून स्वच्छ करावे.
हाता पायाची बोटे बेचके नीट स्वच्छ करावेत.
अंघोळीच्या वेळीच नाक, डोळे, जीभ, दात हे सुद्धा नीट स्वच्छ करावेत.
सर्व अंग स्वच्छ झाल्यावर ते थोड्याशा खरखरीत अशा टॉवेलने पुसून कोरडे करावे.
कुटुंबातील प्रत्येकाचा टॉवेल हा स्वतंत्र असावा.
अंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत.
स्नानाने शरीराला तरतरी येते. शारीरिक थकवा दूर होतो. हुशारी वाटते.
शरीरशुद्धी ही आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराला स्नान घालून स्वच्छ निर्मळ करतो तसेच मनालाही विवेकाचा साबण लावून, त्याला संत सदगुरू ह्यांच्या बोधगंगेची अंघोळ घालून स्वच्छ करावे. त्याची शुद्धता, पावित्र्य टिकून राहण्यासाठी स्नानानंतर देवपूजा, स्तोत्रपठण, उपास्य देवतेचे दर्शन, ते शक्य नसेल तर चिंतन आणि नामस्मरण हे अवश्य करावे. देवाकडे दिवसभारातील कार्य कामासाठी शक्ती, बुद्धी आणि शारीरिक व बौद्धिक क्षमता मागाव्यात. आपल्या कर्म कर्तव्यास त्याच्या आशीर्वादाची, कृपेची जोड मागावी. आपल्या निरोगी आणि निरामय आनंदी जीवनासाठी ह्या आणि अशा प्रकारच्या तनामनाच्या मंगल स्नानाची फार निकड असते हे लक्षात ठेवावे.
पोहायला जरूर जा…
पोहण्याकडे सर्वसाधारणपणे छंद म्हणून बघितलं जातं. रिकाम्या वेळेत किंवा वेळ मिळेल तेव्हा लोक पोहायला जातात, पण प्रत्यक्षात नियमित पोहोल्यामुळे बऱ्याच कॅलरी खर्च होऊ शकतात. पोहोण्यामुळे शरीर पीळदार तर होतंच शिवाय वजनही कमी होतं. योग्य पद्धतीने पोहोल्यामुळे धावण्यासारखे लाभ मिळू शकतात. शिवाय गुडघ्याच्या सांध्यांनाही त्रास होत नाही. कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती पोहोण्याचा व्यायाम करू शकतात. पोहोताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी?
व्यायाम कोणताही असला तरी पोषक आहार घ्यायला हवा. व्यायाम आणि पोषक आहार यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. पोहोताना भरपूर ऊर्जा खर्च होते आणि थंड पाण्यामुळे कडकडून भूक लागते. मात्र, यामुळे अतिखाणं होऊ शकतं. हा मोह टाळायला हवा. उगाचच तेलकट पदार्थ, जंक फूडचा मारा करू नका. हिरव्या भाज्या खा. पोहोल्यानंतर प्रोटिन शेक पिता येईल.
पोहोण्याच्या क्रियेत वेगवेगळे स्ट्रोक्स असतात. प्रत्येक स्ट्रोकचे वेगळे फायदे आहेत. मात्र, बटरफ्लाय स्ट्रोक सर्वाधिक लाभदायी ठरतो. या स्ट्रोकमुळे फक्त दहा मिनिटांत जवळपास 150 कॅलरी खर्च होतात. यानंतर फ्रीस्टाईल या स्ट्रोकमुळे तासाला 704 कॅलरी खर्च होतात.
वजन कमी करण्याच्या उद्देशाने पोहायचं असेल तर जरा जास्त प्रयत्न करावे लागतील. पोहोण्याचा वेग अधिक असेल तर जास्त कॅलरी खर्च होतात. त्यामुळे पोहोण्याचा वेग शक्य तितका वाढवा.
शक्यतो सकाळी न्याहरीआधी पोहा. सकाळच्या वेळी पोहोल्यामुळे शरीरातल्या फॅटस्चा सर्वाधिक वापर होईल. ऊर्जा मिळवण्यासाठी या फॅटस्चा वापर होईल आणि तुमचं वजनही कमी होईल.
– मंजिरी गोखले