सुटलेले पोट आणि वाढलेले वजन यामुळे पुष्कळ लोक त्रस्त झालेले दिसतात. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम आणिअनेक प्रयत्न केले, तरी त्यांचा फारसा उपयोग होत नाही.
वाढलेलं पोट आणि वजन कमी करणं फार गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. यामुळे हृदयासंबंधी आजार, स्ट्रोक आणि हाय ब्लड प्रेशरची समस्याही निर्माण होते. तसेच डायबिटीजची शक्यता वाढते आणि कोलेस्ट्रॉलही शरीरात जमा होतं.
वजन कमी कसं केलं जावं? त्यासाठी काय करावं? कमी त्रासाचा आणि सहजसाध्य उपाय कोणता याचा विचार केला, तर आपल्या आहारामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतील अशा पदार्थांचा समावेश करणे हा सर्वात सोपा सहजसाध्य मार्ग. त्या दृष्टीने कलिंगड, काकडी इत्यादी फळं खाणे उपयुक्त. सध्या उन्हाळा असल्यामुळे यांचा मोसम आहे. काकडी ज्यूस यात अधिक फायदेशीर ठरतो.
काकडीचा ज्यूस तयार करण्यासाठी एक काकडी, थोडा लिंबाचा रस, एक चिमूट काळं मीठ, एक चिमूट काळे मिरे, थोडा पुदीना टाकून केल्यास हा ज्यूस टेस्टीही होईल. रोज सकाळी हा ज्यूस प्यावा.
काकडीच्या ज्यूसमध्ये सोडियम नसतं आणि काकडी नैसर्गिक रूपाने डाययुरेटिक असते. यामुळे शरीरातील विषारी तत्त्व आणि फॅट सेल्स काकडी बाहेर काढते. ब्लॉटिंग होण्यापासूनही बचाव होतो. जर तुम्हाला भूक लागली तर दोन काकड्या कापून खाव्यात. याने तुमची भूक शांत होईल. काकडीमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. याने शरीराला पोषण मिळतं.
काकडीचा ज्यूस प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म सुधारतं. मेटाबॉलिज्म योग्य राहिल्याने पचनक्रिया चांगली राहते. काकडीच्या ज्यूसमध्ये जराही फॅट नसतं आणि त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही हा हेल्दी ज्यूस सेवन करू शकता. चांगल्या परिणामासाठी या ज्यूसचा रोजच्या आहारात समावेश करा.