निद्रानाश किंवा झोपेत मध्येच व्यत्यय येणे ही आजकाल खूपच सामान्य समस्या झाली आहे. निद्रानाश म्हणजे, झोप येतच नाही किंवा आली तरी शांत झोप लागत नाही. नॅशनल इन्स्टिटयूटस् ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, एकूण सामान्य लोकसंख्येपैकी 22 टक्के लोक झोपेच्या समस्या असल्याची तक्रार करतात आणि 45 टक्के रुग्णांना निद्रानाश झाल्याचे निदान झाल्यानंतर दिवसभरातही कोणतेही कार्य करताना अडचणी येत असल्याचे दिसून येते.
– डॉ. एस. एल. शहाणे
निद्रानाश ही समस्या प्रौढ, वृद्ध किंवा लहान मुले कुणामध्येही आढळून येते. वाढत्या वयानुसार, झोपेच्या चुकीच्या सवयी, दुखणी-वेदना, वैद्यकीय परिस्थिती, औषधे किंवा ताण यामुळे निद्रानाशाचे प्रमाण वाढत जाते. कौटुंबिक वैद्यकीय इतिहासाचाही प्रभाव यावर मोठ्या प्रमाणात पडतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार बळावण्याच्या शक्यता अधिक असून, मासिक पाळी, गर्भारपण, रजोनिवृत्तीचा काळ या सगळ्यात होणाऱ्या संप्रेरक बदलामुळे महिलांना हा त्रास अधिक होतो.
रुग्णाची लक्षणे व आजारामागची कारणे यावर या आजाराचे उपचार अवलंबून असतात. झोपेच्या गोळ्या हा प्राथमिक उपचार नसून, बिहेविअरल थेरपी, स्लीप हायजिन आदी पद्धतींचा अवलंब प्रथमोपचारासाठी केला जातो. वेळेवर झोपी जाणे आणि झोपेचे नियमित वेळापत्रक पाळणे फारच महत्त्वाचे असते. त्याचबरोबर, नियमित व्यायाम करणे, कॅफेनचे सेवन टाळणे, दिवसाही मध्येच डुलकी घेणे, ताण येऊ न देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.
झोपेच्या गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते. विशेषत: यकृत वा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी तर या गोळ्या अधिक धोकादायक ठरू शकतात. झोपेच्या गोळ्या घेतल्याने आपल्याला झोप लवकर लागू शकते किंवा दीर्घकाळ झोप शांत लागू शकते. पण, या गोळ्यांचे धोके आणि फायदे व्यक्तीपरत्वे बदलू शकतात.
झोपेच्या गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम :
नैराश्य, थकवा, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणे, लक्ष केंद्रित करताना त्रास होणे, मूड नसणे
प्रचंड डोकेदुखी पोटाचे (गॅस्ट्रोइन्टेस्टिनल) आजार (उदाहरणार्थ, अतिसार किंवा अन्नावरील वासना उडणे)
दीर्घकालीन गुंगी (ड्राऊझिनेस) (झोपेतच राहण्यासाठी मदत करणारी औषधे घेतल्याने असे होते.)
काही ठरावीक पदार्थाची ऍलर्जी येणे झोपेतील वागणुकीत बदल होणे (आपण पूर्ण जागे नसताना वाहन चालवणे किंवा खाणे) दिवसा स्मृतिभ्रंश होणे किंवा काम करताना अडचणी येणे.
गोळ्या घेताना घ्यायची काळजी :
गरोदर महिला व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी झोपेच्या गोळ्या असुरक्षित ठरू शकतात.
रात्रीच्या वेळी पडण्याची शक्यता या गोळ्यांमुळे वाढते आणि परिणामी प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये गुंगीतच पडल्याने जखमा होण्याची भीती असते. रक्तदाब कमी होणे, मूत्रपिंडाचे विकार, अनियमित हृदयाचे ठोके किंवा अन्य आजारपण
काही ठरावीक झोपेच्या गोळ्यांची नशा येऊ शकते, त्याचे व्यसनात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे, औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
जर तुम्हाला खरोखर चांगली झोप हवी असेल आणि ती तुम्हाला मिळत नसेल, तरीही झोपेच्या गोळ्या हा त्यावरचा चांगला उपाय नक्कीच नाही. तरीही, झोपेच्या गोळ्या अधिक सुरक्षितपणे कशा घ्याव्यात, यासाठी थोडे सल्ले पुढीलप्रमाणे :
वैद्यकीय तपासणी करून घ्या :
झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे, बऱ्याचदा तपासण्यांतीच डॉक्टरांना आपल्या निद्रानाशाचे कारण समजू शकते.
झोपण्यासाठी अंथरुणात जाण्यापूर्वी फार काळ झोपेच्या गोळ्या घेऊ नका:
दिवसभराची सर्व कामे पूर्ण करून, अंथरुणात झोपण्यासाठी जाईपर्यंत झोपेच्या गोळ्या घेऊ नका.
तुम्हाला योग्य तितका वेळ झोप मिळू शकेल, अशाच वेळी झोपेच्या गोळ्या घ्या :
तुम्हाला किमान 6 ते 8 तास झोप मिळू शकेल, याची खात्री असेल, तेव्हाच झोपेच्या गोळ्या घ्या. लहानशी डुलकी हवी असल्यास, झोपेच्या गोळ्या घेऊ नका.(उदाहरणार्थ प्रवास करताना)
दुष्परिणामांचा विचार करा :
दिवसा आपण गुंगीत असल्यासारखे वाटले किंवा अन्य दुष्परिणामांची जाणीव झाली, तर आपल्या गोळ्या, औषधे बदलण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
अति मद्यपान टाळा :
झोपेच्या गोळ्या आणि मद्य कधीही एकत्र घेऊ नका, हे लक्षात असू द्या. अल्कोहोल किंवा मद्यामुळे गोळ्यांचा सेडेटिव्ह परिणाम वाढू शकतो. परिणामी, तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही विचलित होऊ शकता. हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास, श्वसनाचा आजार होऊ शकतो किंवा आपण बेशुद्ध पडू शकतो. इतकेच नव्हे, तर अल्कोहोल सेवनामुळे खरेतर निद्रानाश बळावू शकतो. त्यामुळे अल्कोहोलसेवनाबाबत स्वत:स एक मर्यादा आखून घ्या.
डॉक्टरांनी दिल्यानुसारच झोपेच्या गोळ्या घ्या :
काही झोपेच्या गोळ्या अल्पकालीन वापरासाठीच असतात. डॉक्टरांना सांगितल्याशिवाय अधिक काळ ही औषधे घेऊ नयेत. सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितल्यानुसार गोळ्या घेतल्यावर, आपल्या झोपेवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणखी अतिरिक्त गोळ्या घेऊ नका.
गोळ्या घेणे काळजीपूर्वक थांबवा :
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गोळ्यांचे वेळापत्रक ठरवा. काही गोळ्या-औषधे कालांतराने बंद करायची असतात. आपल्याला थोडय़ाच काळापुरता, तात्पुरता निद्रानाशाचा आजार असू शकतो, हे समजून घेणे आवश्यक असते. आपण गोळ्या घेणे थांबवल्यानंतरही काही काळ हा त्रास होऊ शकतो, हेही ध्यानात घ्यायला हवे.
40% डॉक्टर झोपेच्या गोळ्या घेतात :
डॉक्टरांवरील कामाचा ताण आणि ते स्वत:ला देत असलेला वेळ या संदर्भात अलीकडेच एक
सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 40% महिला आणि 60% पुरुष डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी असे दिसून आले की, 40 वर्षाहून अधिक वय असलेले डॉक्टर झोपेच्या गोळ्या नियमित घेतात, तर 40 वर्षाखालील वयोगटातील व्यक्ती क्वचित कधीतरी झोपेच्या गोळ्या घेतात. 45 ते 50 या वयोगटातील डॉक्टरांवर कामाचे जास्त ओझे असते आणि त्यांना नैराश्य येते.
जनरल फिजिशिअन्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयविकारतज्ज्ञ, मधुमेहतज्ज्ञ यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यांचा प्रतिसाद पाहून धक्कादायक माहिती ही मिळाली की, जवळपास सगळेच डॉक्टर शांत झोपेसाठी किमान आठवडय़ातून पाच दिवस झोपेच्या गोळ्या घेतात. त्यांना अनेकदा तीव्र डोकेदुखी होते. त्यांच्यावर नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा आणि लोकांवर उपचार करण्याचा दबाव असतो. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे दिवसातील दोन वेळचा आहार टाळला जातो. काही काळाने असे आठवडय़ातून तीन वेळा होऊ लागते.
या सर्वेक्षणात बैठय़ा जीवन शैलीविषयीही प्रश्न विचारण्यात आले होते. काम, भावनिक चढ-उतार, स्वत:साठी वेळ काढणे या सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या डॉक्टरांनाही भेडसावत असतात. एवढेच नव्हे तर एखाद्या दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जाणेही त्यांना शक्य होत नाही. त्यांच्या दैनंदिन आयुष्यापासून मोकळा वेळ मिळवणे त्यांना शक्य होत नाही. कोणतेही काम त्यांना काटेकोरपणेच करावे लागते. त्यात जराही ढिलाई करून चालत नाही.
आठवड्यातील 3-4 तरी दिवस डॉक्टरांना शांत झोप मिळत नाही. दोन दिवस त्यांना खिन्न आणि उदास वाटत असते. आठवड्यातून तीन दिवस ते कामाशी भावनिकदृष्ट्या गुंतलेले राहतात. अशा तणावपूर्ण आयुष्यामुळे हृद संरोध (कार्डिऍक अरेस्ट) आणि इतर आजार जडण्याची शक्यता असते. हे केवळ काही मुद्दे आहेत. या व्यतिरिक्त इतर अनेक समस्यांना डॉक्टर सामोरे जातात. तुमच्या आयुष्यावर तणावाचा किती परिणाम होतो, हे डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिसादावरून दिसून येते. तणावामुळे तुमच्या मनाप्रमाणेच शरीरावरही परिणाम होतो. शरीरातील 40 हून अधिक अवयवांवर तणावाचा परिणाम होतो. त्यामुळे तुमचे दिसणे, भावना आणि वागणूक या तीनही घटकांवर परिणाम होतो. डॉक्टरसुद्धा झोपेच्या गोळ्या घेतात, हे धक्कादायक आहे.