आजकाल जागोजागी पसरलेल्या कचऱ्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसणारा घटक म्हणजे प्लॅस्टिक. एकतर प्लॅस्टिकचे विघटन होत नाही व हा प्लॅस्टिकचा कचरा आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे आवरण असलेले खाद्यपदार्थ वापरणे बंद करायला हवे तसेच प्लॅस्टिकचे विघटनदेखील योग्य मार्गाने करायला हवे.
डॉ. एस. एल. शहाणे
आज सार्वजनिक ठिकाणी बस, ट्रेन, इमारती, कार्यालये, उद्यान, रस्ते या ठिकाणी आपल्याला अस्वच्छतेचे साम्राज्य दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेटची थोटके, खाद्यपदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्याकडील नद्या व नाले या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होत आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवी. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतात.
सार्वजनिक ठिकाणी कचरा न फेकणे, न थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. घरातील व सोसायटीतील कचऱ्याची योग्य त्या ठिकाणी ओला – सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजे. जमेल तशी व तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे व इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवे. केंद्र शासनाने आणलेली स्वच्छ भारत संकल्पना देशाला अधिक समृद्ध व सुंदर बनवणारी असून यासाठी आपला सर्वाचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहे.
तसेच शासनाच्या माध्यमातून आज अनेक आरोग्य सेवा व योजना गरीब, गरजू लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर योजनांची व्यापक प्रसिद्धी व प्रचार होणे गरजेचे आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या आरोग्य सेवा पोहोचतील. लोकांच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे आजार जन्म घेत असून त्यांवरील उपचार पद्धती व खर्चाची व्याप्तीदेखील वाढत आहे.
आपल्या घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता वैयक्तिक योगदानातून कशी होईल याचा विचार प्रत्येकाने करणे व त्यायोगे स्वच्छतेतून समृद्धीकडेफफ ही संकल्पना मूर्तरूपात येणे अपेक्षित आहे. अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाऱ्या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे स्वच्छतेतून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना यांसारख्या योजनांमध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटविण्यात येत आहे.
पर्यावरण, मानवी आरोग्य व जैवतंत्रज्ञान :
सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करण्यासाठी आणि घन कार्बनी पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अलीकडील काळात अतिसूक्ष्म जैवतंत्रज्ञान वापरले जाते. आधुनिक जैवतंत्रज्ञानामध्ये जैव औषध पुनर्निर्मिती, जैव कीटकनाशके, जैवखते आणि पर्यावरणावर लक्ष ठेवणारी जैवसंवेदके यांचा समावेश होतो…
जैवतंत्रज्ञान ही आधुनिक विज्ञानातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेची गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती झाली असून, ती मानवजातीला फायदेशीर ठरत आहे. जैवतंत्रज्ञानाने सजीवांमधील जैविक तत्त्वे आणि जैविक प्रक्रिया यांचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. दुधापासून दही, चीजसारखे पदार्थ तयार करणे, किण्वन प्रक्रियेने पाव तयार करणे किंवा मळीपासून मद्यार्क तयार करणे या सर्व जैवतांत्रिक क्रिया आहेत. मात्र, या पारंपरिक जैवतांत्रिक क्रिया आधुनिक जैवतंत्रज्ञानात समाविष्ट होत नाहीत. कारण आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर आधारलेले आहे. या जैवतंत्रज्ञानाचा वापर विविध रोगांवरील प्रतिजैविके तयार करण्यासाठी होतो, तसेच सजीवांमधील आनुवंशिक गुणधर्म बदलण्याचे तंत्रज्ञानसुद्धा आधुनिक जैवतंत्रज्ञानातील जनुकीय अभियांत्रिकी या शाखेत आहे. त्यामुळे क्रांतीकारी बदल घडवून आणण्याची क्षमता आधुनिक जैवतंत्रज्ञानात आहे.
आरोग्य आणि जैवतंत्रज्ञान
रोगनिदान आणि रोग उपचार या मानवी आरोग्याशी निगडीत दोन प्रमुख बाबी आहेत. रोगनिदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर तो रोग बरा करणे शक्य होते. जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित झालेल्या नव्या साधनांमुळे आता एखाद्या व्यक्तीचे आजारपण ठरविण्यात त्या व्यक्तीच्या जनुकांची भूमिका कोणती आहे, हे बघण्याची संधी मिळणार आहे. याद्वारे मधुमेह आणि हृदयरोग यांचे निदान त्यांची शारीरिक लक्षणे दिसण्यापूर्वीच करणे शक्य आहे. मूल मातेच्या उदरात असतानाच त्याच्यामध्ये असणाऱ्या जनुकीय दोषांचा मागोवा घेणेही शक्य झाले आहे. रोगोपचार हा मानवी आरोग्याचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी अनेकविध औषधे वापरली जात आहेत. उदा. मधुमेह या विकारात बाहेरून इन्शुलीन देणे.
मानवी शरीराअंतर्गत स्वादुपिंड ही ग्रंथी असते, ज्यामध्ये अल्फा, गॅमा, बीटा आणि डेल्टा या चार पेशी असतात. या चार पेशींपैकी बीटा या पेशीमध्ये इन्शुलीन हे संप्रेरक तयार होत असते, जे शरीरातील साखर आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापराचे नियमन करीत असते. मात्र, मधुमेह या विकारामध्ये मानवी शरीरातील बीटा पेशी अकार्यक्षम होतात. त्याचा विपरीत परिणाम इन्शुलीन तयार होण्याच्या प्रक्रियेवर होतो. परिणामी, शरीरातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी बाहेरून इन्शुलीन द्यावे लागते. पूर्वी हे इन्शुलीन घोड्यासारख्या प्राण्यांच्या यकृतापासून मिळविले जात असे. परिणामी इन्शुलीनची उपलब्धता कमी होती, त्यामुळे ते अत्यंत महाग होते. मात्र, जीवाणूंच्या रचनेत बदल घडवून आणता येतो आणि असे जीवाणू मानवाला आवश्यक असणारी प्रथिनयुक्त संप्रेरके बनवू शकतात हे जैवतंत्रज्ञानानाने दाखवून दिले आहे. आज हे तंत्रज्ञान वापरून विविध रोगांना प्रतिबंध करण्यासाठी तोंडाने घ्यावयाच्या लसी (डोस), इन्शुलीन आणि तत्सम प्रथिनयुक्त संप्रेरकांवर आधारित बरीचशी औषधे निर्माण केली जात आहेत.
पर्यावरण आणि मुलांचे आरोग्य
आता सध्याच्या जगात पर्यावरण हा अतिशय ज्वलंत विषय झाला आहे. याचं खरं कारण आता आपण म्हणजे माणसाने केलेल्या पर्यावरण घातक कृत्यांमुळे आता पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने आणि आता त्याचा आपल्याला त्रास होऊ लागल्याने ही जागृती आली असावी, नाही का? आलीये आणि यायलाही हवी. कारण याचा आपल्या पुढील पिढीवर फार मोठा परिणाम होणार आहे.
प्लॅस्टिक हा तर सगळ्या बाबतीत अतिशय प्रकर्षाने आढळणारा प्रकार आहे. अहो हे प्लॅस्टिक कुठे नाही? सगळी कडे आहे अगदी लहान मुलांच्या खाण्यापिण्यापासून ते खेळण्यापर्यंत सर्वदूर या प्लॅस्टिक चा संचार आहे. पण हे खरंच चांगलं आहे का? तर नाही. आपण स्वस्त म्हणा किंवा पटकन मिळणारे आहे म्हणा किंवा दिसायला आकर्षक आहे म्हणा, कारण काहीही असो याचा वापर आपण विचार न करता करतोय आणि यांनी हानी पोचती आहे हे नक्की.
आपण मुलांना दात येताना जे बाजारात मिळतं ते तिदर देतो तिथून अगदी याची सुरुवात होते पहा.
आता का नाही वापरायचं, काय होतं बरं?
प्लॅस्टिक बनवताना वाईट रसायनांचा वापर होतो. आणि नंतरही ही रसायने त्यात राहतात. आणि आतल्या अन्न पदार्थात मिसळून कॅन्सर सारखे रोग निर्माण करतात. अनेक घातक रसायने आपल्या शरिरातील हार्मोनची जागा घेतात आणि त्याची शरीरात कमतरता निर्माण होऊन वेगळे रोग निर्माण होतात. हा प्रकार विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत जास्त होतो. कारण या रसायनाचा परिणाम वाढीच्या वयात जास्त वाईट होतो. गर्भात असताना जर या प्लॅस्टिक च्या रसायनांचा मारा झाला तर गर्भाला देखील धोका निर्माण होऊ शकतो.
आता आपण जर विचार केला तर मुलांचा डबा, बाटली, चमचे, ताटल्या हल्ली सगळं प्लॅस्टिक चं असतं. आणि त्यात गरम पदर्थ जर आपण दिले तर हा धोका अजून आपण वाढवतो. आणि आपण जे त्यांना देतो तेच त्यांना आवडत आणि बरोबर वाटू लागतं. पॅक फूड, पार्सल फूड हा प्रकार अत्यंत सर्रास वापरला जातो आणि त्यात ज्या प्लॅस्टिक डब्याचा व पिशवी चा वापर होतो तो अत्यंत धोकादायक असतो. यात तर चक्क गरम पदार्थ या प्लॅस्टिक डब्यातून आणि पिशवीतून आणले जातात. प्लॅस्टिक जर गरम झाले तर त्यातून अन्नात वाईट रसायनं मिसळण्याची शक्यता व प्रमाण दुपटी पेक्षा जास्त होते.
आता या सगळ्यावर काय काय करता येईल?
मुलांना डबा स्टील चा वापरावा, पाण्याची बाटली प्लॅस्टिकची नसावी. बिसलरी च्या बाटल्यांचा पुनर्वापर टाळावा. त्या अतिशय हनिकारक असतात. गरम अन्न प्लॅस्टिकच्या डब्यात देऊ नये. पॅक फूड ची सवय मुलांना लागणार नाही याकडे कटाक्ष असावा.
अन्न पदार्थ देताना बांबू, माती, काच, मेटल, वॅक्स पेपर, फॉईल या पासून बनवलेल्या भांड्यांचा वापर करावा.
या सर्वांनी आपण मुलांच्या पोटात ही रसायने जाऊ नयेत याची काळजी घेऊ शकतो. आणि मुलांचं भवितव्य आणि आरोग्य सुरक्षित करू शकतो. या साठी घरातल्या मोठ्याना या सगळ्याची सवय असणे गरजेचे आहे. मुलांना या प्लॅस्टिक चे अपाय आपण समजावून सांगितले की, आपोआप त्यांना हे न वापरण्याची लहानपणापासून सवय लागेल.