हिवाळ्याचा महिना तसा डॉक्टरांच्या सुट्टीचा महिना. या दिवसांत दवाखान्यात साथीचे रोगी फारसे येत नसल्याने दवाखान्यात रुग्णांची गर्दी नसते. त्यामुळे बरेचसे डॉक्टर्स आपल्या सहाय्यक किंवा बदली डॉक्टरांवर दवाखाना सोपवून फिरायला जातात. नेमकं याच काळात दमा, संधिवात, त्वचाविकारांसारखे मोजकेच रोग डोकं वर काढतात. अशा वेळी बळावलेल्या आजारांमुळे रुग्णांच्या जीवावर बेतू नये यासाठी पुढील उपचार करावेत.
डॉ. जयदीप महाजन
पावसाळा संपतानाच वातावरणात थोडासाही गारवा पडल्यास काहींना थंडी वाजते आणि जास्त गारवा पडल्यास दमा, संधिवात, त्वचारोग यांसारखे आजार डोकं वर काढतात. हे आजार प्राथमिक अवस्थेत असताना त्यांच्यावर योग्य ते उपाय करावेत.
दमा : थंडीच्या दिवसांत वातावरणातल्या थंडाव्यामुळे हवा लवकर वर जात नाही. त्यामुळे हवेत धुळीचे कण, धूळ तसेच हवेतून पसरणाऱ्या विविध रोगांचे जंतू वाढतात. ते श्वासावाटे फुफ्फुसात प्रवेश करतात. आधीच वातावरणातील कोरडेपणामुळे श्वसनवाहिन्यांना कोरडेपणा येतो. त्यामुळे त्या आकुंचन पावतात.
आकुंचलेल्या श्वसनवाहिन्यांत रोगजंतू शिरल्यामुळे दम्याच्या रुग्णांना जास्तच त्रास होतो. फुफ्फुसांत कफाचे प्रमाण वाढते. बरंच खोकल्यावर कफ पडतो. श्वासोच्छ्वासाच्या वेळी शिट्टी वाजवल्यासारखा आवाज येतो. तोंड सुकते. बोलणं कठीण होते. अशा वेळी तेलाने छातीला मसाज (मालीश) करून शेकण्याचा उपाय केल्यास रुग्णाला आराम मिळतो.
- अळशीचे तेल किंवा मोहरीच्या तेलात मीठ विरघळवून त्याने छाती-पाठीवर मालीश करून तेल जिरवावं. गरम पाणी बाटलीत घेऊन शेकावं.
- तिळाच्या तेलात 1 ते 2 चमचे मीठ घालून प्यावं. त्यानंतर गरम पाणी प्यावं.
- ग्लासभर गरम दुधात एक ते दोन चमचे ज्येष्ठमध, तूप आणि साखर घालून दूध घोट घोटभर प्यावं.
- सतत गरम पाणी प्यावं. आलं आणि रसायनविरहित गुळाचा चहा करून प्यावा. जास्त चहा पिऊ नये.
- सितोपलादी चूर्ण किंवा तालिसादी चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावं.
थंड वातावरणात दमा बळावतोच. शिवाय दम्याचे निदान झाले नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्या व्यक्तीवर आणि कुटुंबावर प्रचंड ताण येतो. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या दैनंदिन क्रियांवर मर्यादा येतात. त्यामुळे धाप लागणे, छाती आखडणे किंवा छातीमधील वेदना, खोकला किंवा घरघर, उच्छ्वास सोडताना छातीमध्ये घरघर होणे वा शिट्टीसारखा आवाज होणे आणि सर्दी किंवा फ्लुसारख्या श्वासांच्या विषाणूमुळे येणारा खोकला वा उबळ या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
या लक्षणांकडे वेळेवर लक्ष द्या आणि वेळेवर उपचार करा. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दमा होण्याची शक्यता असते हे तुम्हाला माहीत आहे का? या संदर्भात झालेल्या अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे की, दमा आणि स्थूलपणा यांचा परस्परसंबंध आहे.
वाढते वजन ठरतेय घातक दमा हा एक दीर्घकालीन आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2019 साली 2.1 अब्जांहून अधिक प्रौढ म्हणजेच 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते. यापैकी 27 कोटी व्यक्ती स्थूल होत्या.
30-40 वयोगटांतील 12 कोटी मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा ती मुले स्थूल गटात मोडत होती. ही निश्चितच चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे रक्तदाब वाढतो आणि धाप लागते तसेच परिणामी दम्याची लागण होऊ शकते. दमा होण्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण आहे, असे अनेक संशोधनाअंती दिसून आले आहे.
सडपातळ बांधा असलेल्या प्रौढांच्या तुलनेने स्थूल व्यक्तीमध्ये दम्याचे प्रमाण अधिक असते आणि स्थूलपणामुळे मुले व प्रौढांना दमा होण्याची शक्यता अनुक्रमे 5 ते 10 पटीने वाढते. लहानपणी होणाऱ्या दम्यासाठी स्थूलपणा हे महत्त्वाचे कारण असते आणि त्यामुळे औषधांना प्रतिसाद कमी मिळतो.
या वयोगटातील रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम होतो. स्थूलपणा आणि दमा असेल, तर दम्याची तीव्रता वाढलेली असते, दमा नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि दम्याचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे स्थूलपणामुळे दम्याचे निदान करणे कठीण जाते.
सामान्य वजन असलेल्या मुलांच्या तुलनेने प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या किंवा स्थूल मुलांना दमा होण्याची शक्यता अधिक असते. या मागचे कारण असे आहे की, अतिरिक्त वजनामुळे छाती व पोटाच्या भागातील वाढलेल्या वजनामुळे फुप्फुसे आवळली जातात आणि श्वास घेणे कठीण जाते. चरबीयुक्त उतीमुळे सूज निर्माण करणारे घटक तयार होतात आणि त्यांचा फुप्फुसांवर परिणाम होतो आणि अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे की, याची परिणती दम्यामध्ये होते.
स्थूल व्यक्ती अधिक औषधे घेतात, त्यांच्यातील लक्षणे अधिक तीव्र असतात आणि वजन प्रमाणात असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत आपल्या दम्यावर नियंत्रण मिळविण्यास कमी सक्षम असतात. दमा आणि प्रमाणापेक्षा जास्त बीएमआय असलेल्या व्यक्ती कमी बीएमआय असलेल्या व्यक्तींसारखा औषधांना प्रतिसाद देत नाहीत.
संधिवात : थंडीत मसाजला (मालीश) फार महत्त्व आहे. या दिवसांत येणारे सणही असे असतात की, त्या निमित्ताने तेलकट-तुपकट, गोड-धोड पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे वाताचा प्रकोप होत नाही. थंडीत सांध्याजवळचे स्नायू ताठरतात. त्यामुळे बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहणाऱ्यांचे सांधे हालचाल करताना आणि जिना चढता-उतरताना दुखतात.
बोटांची पेरं दुखतात. चाळीशी नंतरच्या माणसांच्या सांध्यातला श्लेष्मल वंगणासारखा पदार्थ कमी होतो. कार्टीलेज झिजलं असल्यास सांधे दुखू लागतात. ही सांधेदुखी संधिगत वात म्हणून ओळखली जाते. ज्यांना मुळात संधिवात आहे, त्यांची सांधेदुखी अजूनच वाढते.
अशा रुग्णांनी सांध्यांना महानारायण तेल किंवा पंचगुण तेलाने मसाज करावा. सांधे शेकावेत. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली जानुबस्तीसारखे आयुर्वेदी बस्तीउपचार किंवा पिचू उपचारपद्धती करून घ्यावी.
याशिवाय योगराज गुग्गुळ 250 ते 500 मि.ग्रॅ इतक्या प्रमाणात घ्यावा. 30 मि.ली. महारास्नादी काढ्यात तेवढंच पाणी घालून दिवसातून तीन वेळा मिश्रण प्यावं. रात्री झोपताना एक चमचा खोबरेल तेलात लिंबू रसाचे 4 ते 5 थेंब मिसळून मिश्रण प्यावं. या मिश्रणावर गरम पाणी प्याल्यास चटकन आराम मिळतो.
ऱ्हुमॅटॉइड संधिवाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही एक ऑटोइम्यून प्रकारची अवस्था आहे. यात शरीराची रोगप्रतिकारकयंत्रणा चुकीने सांध्यांवरच हल्ला चढवते, यातून दाह निर्माण होतो, परिणामी सांध्यांमध्ये तसेच आसपासच्या भागावर सूज येते व वेदना होतात. आपल्याला बरेचदा असे वाटते की, संधिवात हा वाढत्या वयासोबत होतो, मध्यम वयात प्रवेश केल्यानंतर हा त्रास सुरू होतो.
मात्र, तरुणांमध्ये संधिवाताचे निदान होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. तरुणांमध्ये एकाच वेळी अनेक सांध्यांना हा विकार जडल्याचे दिसून येत आहे. याला ज्युव्हेनाइल ऱ्हुमॅटॉइड संधिवात असे म्हणतात. ऱ्हुमॅटॉइड संधिवात होणे कोणत्याही वयात आव्हानात्मकच ठरते. पण, तरुण तसेच पौगंडावस्थेतील रुग्णांना यामुळे वयस्करांच्या तुलनेत खूप अधिक सहन करावे लागते.
ऱ्हुमॅटॉइड संधिवाताची सर्वप्रथम जाणवणारी लक्षणे म्हणजे हाताची बोटे, पायाची बोटे, मनगटे आदी छोट्या सांध्यांमध्ये वेदना व ताठरपणा जाणवणे. अनेकदा बऱ्याच सांध्यांमध्ये एकाचवेळी वेदना होतात. या वेदना हिवाळ्यात किंवा झोपून उठल्यावर वाढतात आणि काही मिनिटे हालचाल केल्यानंतर कमी होतात.
ऱ्हुमॅटॉइड संधिवाताचे निदान झाले तरीही आशा सोडू नका.
क जीवनसत्व, ई जीवनसत्व, आवश्यक चरबीयुक्त आम्ले (फॅटी ऍसिड्स) आणि ऍण्टिऑक्सिडंट्स यांनी समृद्ध आहार घेतल्यामुळे या विकारावर नियंत्रण मिळवता येते हे सिद्ध झाले आहे.
या आजाराच्या व्यवस्थापनासाठी टिप्स : सांध्यात होणारी कोणतीही वेदना म्हणजे ऱ्हुमॅटॉइड संधिवात नव्हे! सांध्यांतील वेदनेचे कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय मदत घ्या. अचूक निदानासाठी अनेकदा सीआरपी, ईएसआर, आरए फॅक्टर, युरिक ऍसिड, ऍण्टी सीसीपी या चाचण्या आवश्यक ठरतात. अधिक तीव्र लक्षणे असल्यास एक्स-रेची गरजही भासते.
अलीकडील काळात झालेल्या प्रादुर्भावानेही (इन्फेक्शन) सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. कारण, यात प्रतिजैविक (ऍण्टिजेनिक) साम्य आढळते.
प्रतिजैविक जैवसाम्यात, रोगकारक घटकांना मारण्यासाठी निर्माण झालेली प्रतिद्रव्ये (ऍण्टिजेन्स) सायनोव्हिअल (सांध्यांच्या हालचालींसाठी आवश्यक असा द्रव स्त्रवणाऱ्या) ऊतींवरच हल्ला चढवतात. सोप्या शब्दांत सांगायचे तर, प्रतिद्रव्ये ही तुमच्या शरीराने जीवाणू किंवा विषाणूंसारख्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी निर्माण केलेले सैनिक असतात.
मात्र, सांध्यांचे कोश (कॅप्सुल्स) काहीवेळा या रोगकारक घटकांच्या कोशांसारखेच भासतात. त्यामुळे तुमच्या शरीराने तयार केलेले हे सैनिक तुमच्याच सांध्यावर ते गुन्हेगार आहेत असे समजून हल्ला चढवतात. यालाच ऑटोइम्यून विकार असे म्हटले जाते.
ऱ्हुमॅटॉइड संधिवात बरा होण्याचा कालावधी रुग्णानुसार बदलणारा आहे. काही रुग्णांमध्ये थोडा काळ औषधे घेऊन हा विकार आटोक्यात येतो, तर काहींना दीर्घकाळ, सातत्याने औषधे घ्यावी लागतात.
त्वचेचे विकार: या दिवसांत घाम कमी येतो. त्वचेतून नेहमी पाण्यासारखा (स्वेट) आणि तेलकट (सेबम) असा दोन प्रकारचे घाम उत्सर्जित होतात. पण थंडीमुळे लघवीला जास्त होतं आणि घाम कमी येतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचा कोरडी पडते. सुरकुतते. त्वचेवर बारीक भेगा पडतात. त्यामुळे खाज सुटते.
दंड, मांड्या, गुढघ्याखालचा पायाचा भाग, पोट या ठिकाणी असणाऱ्या त्वचेवर जास्त खाज येते. सतत खाजवल्यामुळे तिथली त्वचा लाल पडते. नख लागून जखमाही होतात. त्यात जिवाणूंचा संसर्ग झाल्यास गळवं येतात. कधी कधी नागिणीसारखे रोगही झालेले बघायला मिळतात. हे होऊ नये म्हणून दिवाळीला करतो त्याप्रमाणे अभ्यंगस्नान करावं.
पायाची खासकरून टाचेची त्वचा शरीरातील इतर अवयवांच्या त्वचेपेक्षा जाड असते. थंडीमुळे फाटून त्यात भेगा पडतात. अशा वेळी आंघोळीला घेतो त्याप्रमाणे गरम पाणी घेऊन त्यात पाय बुडवून बसावं. म्हणजे तिथली त्वचा नरम होते.
त्यानंतर टॉवेलने घासून टाचेला कोकमतेल लावावं. कोकमतेल, गाईचं तूप, ज्येष्ठमध तेल, मधमाशांच्या पोळ्यातील मेण (बी वॅक्स) एकत्र गरम करून मलमाइतकं दाट मिश्रण तयार करून ते लावावं. या उपायांनी टाचांच्या भेगा भरून त्या नरम राहतात.