भारतात एकीकडे केले जाणारे उपवास, तर दुसरीकडे सणासुदीच्या कालावधीत गोडधोड खाद्यपदार्थांवर मारलेला ताव अशा दोन्ही गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. विशेषत: मधुमेहींना या काळात आपल्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देत रक्तातील साखरेची पातळीमध्ये समतोल साधणे आवश्यक असते.
असे केले तरच मधुमेहींना सण-उत्सवाचा खरा आनंद लुटता येणे शक्य होते. टाईप 2 या प्रकारच्या मधुमेहामध्ये जीवनशैलीतील बदल हा उपचारांसाठी प्राथमिक घटक असतो. तसेच, उपवास करणे हा देखील जीवनशैलीतील बदल ठरतो. योग्य पद्धतीने उपवास केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक फायदे प्रदान करू शकतात.
डॉ. प्रदीप गाडगे
सणासुदीच्या दिवशी आपल्यासमोर अनेक खाण्याचे पदार्थ असतात आणि शक्यतो आपण मोह आवरू शकत नाही. यावेळी रुग्णांनी आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. सातत्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी तपासून पाहावी. मुख्य म्हणजे वेळेवर औषधे घ्यावीत. जर तुम्हाला औषधांची वेळ बदलावी असं वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. जर तुम्ही इन्सुलिनवर असाल, तर डॉक्टरांना विचारून तुमच्या जेवणाच्या वेळेनुसार इन्सुलिनचा डोस घ्यावा.
उपवासादरम्यान शरीर ग्लुकोजचा साठा वापरते. त्यानंतर ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते. हा कालावधी तासांहून अधिक असल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे उच्च-कमी रक्तशर्करा (हायपरग्लासेमिया, हायपोग्लासेमिया), शरीरात किटोन्स व ऍसिडचे प्रमाण वाढणे, पाणी कमी होणे आदी आरोग्य समस्या उद्भवतात.
त्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य स्वरूपाचा विखंडित उपवास केल्यास मधुमेही रुग्णांचे वजन, रक्तातील ग्लुकोज, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. त्यामुळे उपवास करताना व सोडताना खाण्याचे आरोग्यकारक पर्याय निवडावेत, ग्लुकोमीटरद्वारे नियमित साखरेची पातळी तपासावी, उपवास काळात शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असते. या काळात दैनंदिन जीवनातील हालचाली करण्यास हरकत नसते.
मात्र, मध्यम ते कठीण प्रकारचा व्यायाम, हालचाली यांच्या वेळा बदलणे आवश्यक असते. औषधाशिवाय मधुमेहविषयक काळजी घेत असताना मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन करणे, हा महत्त्वाचा घटक ठरतो. हे चांगल्याप्रकारे ग्लायसेमिक नियंत्रणासह उपचारपद्धती कितपत लागू होते, हे तपासण्याची संधी देतात, ताणतणावही कमी करतात.
मधुमेहींना उपवास करायचा असेल, तर मधुमेहासंदर्भातील आणि उपवासासंदर्भातील सल्ले महत्त्वपूर्ण ठरतात. यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्य समस्या म्हणजे हायपोग्लासेमिया, हायपरग्लासेमिया, डिहायड्रेशन आणि चयापचयात डायबेटिक केटो ऍसिडोसिससारखी गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होणे.
उपवासादरम्यान शरीरातील व्यवस्थांवर खूप ताण येतो आणि सलग किती काळ उपवास केला जातो, यावर हा ताण अवलंबून असतो. आपण उपवास करतो तेव्हा शरीर ग्लुकोजचा साठवलेला स्रोत वापरते आणि नंतर ऊर्जेचा स्रोत निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे विभाजन सुरू होते. उपवासादरम्यान शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी उपवासामुळे खूप खालावण्याची शक्यता असते.
मधुमेहाचा मूत्रपिंडावर कसा परिणाम होतो?
मूत्रपिंडाच्या चिवट विकारांपैकी (सीकेडी) 35 टक्के विकारांना मधुमेह जबाबदार असतो आणि मूत्रपिंडाच्या चिवट रोगांमागील प्रमुख कारणांमध्येही मधुमेहाचा समावेश होतो. शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन निर्माण करू शकत नाही किंवा इन्सुलिन कार्यक्षमतेने वापरू शकत नाही, अशी अवस्था म्हणजे मधुमेह होय.
त्यामुळे निरोगातील साखरेची (ग्लुकोज) पातळी योग्य राखणे कठीण होऊन जाते. मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर त्यामुळे सीकेडीशिवाय अन्य समस्याही निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, डोळ्यांचे विकार, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पायांचे आजार आदी. मधुमेहामुळे होणारा मूत्रपिंडाचा विकार असेल, तर या दोहोंवर नियंत्रण ठेवणे आणि मधुमेह व मूत्रपिंडे दोन्हींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
हे केल्यास निरोगी आयुष्य जगले जाऊ शकते. मधुमेहाच्या साइड इफेक्ट्समुळे मूत्रपिंडांतील रक्तवाहिन्यांची हानी होते व त्या कमकुवत होतात. नुकसानग्रस्त रक्तवाहिन्यांमुळे मूत्रपिंडांचे कार्य नीट होऊ शकत नाही, तसेच मूत्रपिंडांनी रक्तातील विषारी द्रव्ये तसेच टाकाऊ पदार्थ ज्या पद्धतीने वेगळे करणे आवश्यक असते, त्याप्रमाणे ते होऊ शकत नाही.
मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित झाले नाही, तर त्याची परिणती मूत्रपिंडांच्या विकारात होते आणि अखेरीस मूत्रपिंडांचे कार्य बंद पडू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ लागतो आणि उच्च रक्तदाब हेही सीकेडीमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.
मधुमेहामुळे शरीरातील नसांचेही नुकसान होते आणि त्यामुळे मूत्राशय (ब्लॅडर) नीट रिकामे होत नाही. जड झालेले मूत्राशय आणि त्यामुळे येणाऱ्या दाबामुळे मूत्रपिंडांना जखमा होऊ शकतात. मूत्राशयात मूत्र दीर्घकाळ साचून राहिले, तर साखरेची पातळी उच्च असलेल्या त्या मूत्रात जीवाणूंची वाढ होऊन प्रादुर्भाव होऊ शकतो.
मूत्रपिंडाच्या विकाराची लक्षणे
- वारंवार तहान लागणे
- पुन:पुन्हा लघवीला जावे लागणे
- उच्च रक्तदाब
- अचानक वजन कमी होणे
- लघवीमध्ये केटोनीज/प्रथिनांचे अस्तित्व
- थकवा येणे
- सकाळी मळमळ होऊन उलट्या
- अशक्तपणा व फिकेपणा
डायलिसिस व डायबेटिस समजून घेणे :
मधुमेहामुळे होणाऱ्या मूत्रपिंड विकारावर उपचार म्हणून कोणत्या प्रकारचे डायलिसिस घेतले जाते, यावर उपचारांचे मधुमेहावर काय थेट परिणाम होतील हे अवलंबून आहे.
हेमोडायलिसिस आणि डायबेटिस :
डायलिसिस उपचारांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर काहीही परिणाम होणार नाही. हेमोडायलिसिस उपचारांदरम्यान रुग्णाला रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होत असतील, तर ते अपेक्षितच आहे, कारण दिनक्रम बदलला जातो. रुग्णाला आहाराबद्दल किंवा मधुमेह नियंत्रणात राखण्याबद्दल काही शंका असतील, तर डॉक्टरांकडून त्यांचे निरसन करून घेणे फायदेशीर.
पेरिटोनिअल डायलिसिस आणि मधुमेह :
पेरिटोनिअल डायलिसिस (पीडी) घेत असल्यास, रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. कारण, या प्रकारच्या डायलिसिससाठी वापरल्या जाणाऱ्या डायलिसेटमध्ये डेक्स्ट्रोज नावाचा घटक असू शकतो. रुग्णाच्या पीडी सोल्युशनमधील डेक्स्ट्रोज रक्तातील अतिरिक्त द्रवपदार्थ काढून टाकण्यात मदत करते, पण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढवते. त्यात विविध स्ट्रेंग्थ्सच्या डायलिसेटमध्ये डेक्स्ट्रोजचे प्रमाण वेगवेगळे असते. पेरिटोनिअल डायलिसिस घेणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांचा इन्सुलिनचा डोस कदाचित वाढवावा लागतो.
जखमांकडे दुर्लक्ष नको
ऍम्प्युटेशन म्हणजे अपघात वा वैद्यकीय परिस्थिती किंवा शस्त्रक्रियेने अवयव कापणे. मॅलिग्नन्सी किंवा गॅंगरिन उद्भवलेल्या अवयवाला होणाऱ्या वेदना किंवा आजाराची वाढत जाण्याची क्रिया नियंत्रणात आणण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. 80% ट्रॉमॅटिक ऍम्प्युटेशनसाठी मधुमेह कारणीभूत असतो.
हा आजार होण्याला अथेरोस्क्लेरॉसिस किंवा दीर्घकाळापासून असलेला आर्ट्रीअल ऑक्लुसिव्ह डिसीज (व्यायाम करताना किंवा आराम करताना रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे रक्तवाहिन्या निमुळत्या होणे) हे त्याचे मूळ कारण असते. बहुतेक ऍम्प्युटेशन्स पायासारख्या टोकाकडील अवयवांची होतात.
मधुमेह असलेल्या 60 ते 70 टक्के रुग्णांमध्ये डायबेटिक न्यूरोपथी विकसित होते. वाढलेले वय, प्रमाणाबाहेर वाढलेले वजन आणि ज्यांना 25 वर्षांहून अधिक काळ मधुमेह आहे त्यांना न्यूरोपथीचा आणि ऍम्प्युटेशनचा धोका अधिक असतो. मधुमेह नियंत्रणात हलगर्जीपणा, असाधारण कोलेस्ट्रॉल पातळी आणि उच्च रक्तदाब यामुळे सुद्धा हा धोका वाढतो. धूम्रपानामुळे ही जोखीम कैक पटींनी वाढते.
मधुमेहामुळे कराव्या लागणाऱ्या ऍम्प्युटेशनसाठी डायबेटिक फूट अल्सर हे सर्वाधिक आढळणारे कारण असते. मधुमेहींना डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे (मज्जातंतू निकामी होणे) जखमांची आणि पायाला झालेल्या अल्सरची जाणीव होत नाही. हे अल्सर काही वेळा बरे होत नाहीत. परिणामी, गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो. अनियंत्रित मधुमेहामुळे मज्जातंतूंची कार्यक्षमता कमी होते आणि संवेदनाही कमी होते.
ज्या जखमांकडे (अगदी छोट्या स्वरूपाच्या) लक्षही जाणार नाही किंवा वेदनाही होणार नाही, अशा जखमांमुळेही अल्सर, संसर्ग होऊ शकतो. तसेच ऊती मृत (गॅंगरिन) होऊ शकतात. तळपायाला फोड आल्यामुळे त्या व्यक्तीची चाल बदलू शकते. तुम्ही फोड आलेल्या भागाला जपण्याचा प्रयतक् करत असल्यामुळे तुमच्या चालीत फरक पडू शकतो.
ज्यांना हे जाणवत नाही, ते असे करत नाहीत. ते अगदी सहजपणे त्या फोडावर चालतील, जणू काही तिथे फोड आलेलाच नाही. तो फोड फुटू शकतो, त्याला संसर्ग होऊ शकतो आणि त्याला फूट अल्सर होऊ शकतो. हा अल्सर थेट हाडांपर्यंत पोहोचू शकतो आणि संपूर्ण पायाला संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. परिणामी ऍम्प्युटेशन करावे लागू शकते.
एखादा अवयव कापावा लागणे, ही दुर्दैवी परिस्थिती असते आणि काही वेळा ऍम्प्युटेशन करावे लागणे अपरिहार्य असते. ऍम्प्युटेशनमुळे शरीराची ढबच बदलून जाते, त्याचप्रमाणे इतर अनेक हालचालींवर, विविध कृतींमध्ये सहभागी होण्यावर आणि राहणीमानाच्या दर्जावर त्याचा परिणाम होतो. ऍम्प्युटेशनमुळे रुग्णाला नैराश्य, खिन्नता, सामाजिक अवघडलेपण आणि शरीराच्या रचनेविषयी औदासीन्य येऊ शकते.
ऍम्प्युटेशनमुळे जीवनशैली बदलावी लागते. उपजीविकेच्या स्रोतावर थोडाफार किंवा गंभीर परिणाम होतो. दुस-या शब्दांत सांगायचे झाले, तर ऍम्प्युटेशनचा त्या व्यक्तीवर मानसिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतो. रुग्णाचे वय, लिंग आणि शिक्षण लक्षात घेत त्या रुग्णाला मानसिकदृष्टया तडजोड करण्यास तयार करण्यासाठी अनेक घटक शोधून काढण्यात आले आहेत.
ऍम्प्युटेशननंतरही मधुमेहावरील उपचार सुरू ठेवावे लागतात. ज्या व्यक्तींचे एक ऍम्प्युटेशन झाले आहे, त्यांना दुसरे ऍम्प्युटेशन करावे लागण्याचा धोका असतो. सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवणे आणि तंबाखूसेवन टाळणे यामुळे मधुमेहाशी संबंधित अतिरिक्त गुंतागुंतीला सामोरे जावे लागणार नाही.
हिवाळ्यातली त्वचेची काळजी
मधुमेहाचा शरीरातील प्रत्येक भागावर परिणाम होऊ शकतो. त्यात त्वचेचाही समावेश आहे. मधुमेह असलेल्या एक तृतियांश व्यक्तींना त्वचाविकार असतात किंवा होऊ शकतात. जेव्हा शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते.
कारण तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखर घालवण्यासाठी शरीर त्या पाण्याचे लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर तुमच्या हाता-पायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी झाल्यास ती लालसर होते, त्यामुळे त्वचेवर फोड येतात. त्वचेला भेगा पडू शकतात आणि सालपटं निघू शकतात. या भेगांमधून जंतू तुमच्या शरीरात शिरू शकतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. कोरडी त्वचा ही बहुधा खाजरी असते.
त्या ठिकाणी खाजवल्यामुळे त्वचेमध्ये फट पडून संसर्ग होतो. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली तर बहुतेक त्वचाविकारांना प्रतिबंध घातला जाऊ शकतो वा त्यावर सहज उपचार करता येऊ शकतात. मधुमेहामुळे तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्हाला सहज इजा होऊ शकते. त्याने संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते.
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि ती निरोगी राहावी यासाठीच्या काही टिप्स :
1. तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवा. ज्यांच्या शरीरात ग्लुकोजची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यांची त्वचा कोरडी असते.
2. अति गरम पाण्याने आंघोळ करू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर बबल बाथ टाळा. मॉइश्चरायझिंग साबणाची मदत होऊ शकेल. त्यानंतर चांगले स्कीन लोशन लावा. पण पायाच्या बोटांमध्ये लोशन नका लावू. कारण त्यात बुरशी वाढू शकेल.
3. त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरडया किंवा खाज-या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.
4. त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे आणि मलम लावा. निजंर्तुक कापसाने छोट्या जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्टरची भेट घ्या.
5. थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.
6. तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.