Tuesday, April 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमच्या मुलाला ‘हा’ आजार तर नाहीना ? असेल तर वेळेत करा उपचार

by प्रभात वृत्तसेवा
January 14, 2021
in आरोग्य वार्ता
A A
तुमच्या मुलाला ‘हा’ आजार तर नाहीना ? असेल तर वेळेत करा उपचार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

न्यूमोनिया

 न्यूमोनिया हा श्‍वसन संस्थेचा आजार आहे. न्यूमोनिया हा जंतूमुळे पसरणारा आजार आहे. न्यूमोनिया फुफ्फुसाच्या काही भागातच होतो. या जंतूमुळे श्‍वासनलिकेला व फुफ्फुसाला सूज येते त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. न्यूमोनिया हा अचानक येणारा कमी कालावधीचा तीव्र आजार आहे व उपचार न केल्यास माणूस मरू शकतो.

न्यूमोनिया हा आजार कोणताही होऊ शकतो. पण पाच वर्षाखालील मुलांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण जास्त आढळते व भारतामध्ये बरीच मुले या आजाराने दगावतात.

लक्षणे – पाच वर्षाखालील मुला-मुलीमध्ये छाती उडते व त्याचबरोबर ताप असल्यास न्यूमोनियाची शक्‍यता जास्त असते. बोटाने छातीवर वाजवून बघितल्यास फुफ्फुसाच्या सुजलेल्या भागावर ठप्प असा आवाज येतो. लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो. आईचे दूध नीट ओढता येत नाही.

उपचार – न्यूमोनिया हा गंभीर आजार असल्यामुळे योग्य त्या डॉक्‍टरांकडून उपचार होणे आवश्‍यक असते. वरीलपैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्‍टरांकडे जावे. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होऊन तीव्रता (गंभीरता) कमी होऊ शकते.

जुलाब

जुलाबाचे मुख्य कारण पोटात विषारी जीवाणू जाणे हेच असते. अस्वच्छता आणि दूषित पाणी यामुळे हे जीवाणू पोटात जातात. बाळ खाली पडलेली खेळणी किंवा इतर काही वस्तू तोंडात घालते. यामुळे खालची घाण पोटात जाते व बाळाला जुलाब होऊ लागतात. काही लोक दाताचे जुलाब म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण दात येण्याचा व जुलाबाचा काहीही संबंध नसतो. अशा जुलाबातून शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

बाळाची काळजी – अतिसार म्हणजे जुलाब होणे. जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ द्यावेत. शहाळ्याचे पाणी द्यावे. फळांचा ताजा रस द्यावा. भाताची कांजी, भाताची पेज, भाज्यांचे सुप, वरण असे पदार्थ द्यावेत. अंगावरचे दूध चालू ठेवावे. सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बाळाला जल संजीवनी द्यावी. एवढे करून फरक न पडल्यास डॉक्‍टरांना दाखवावे.

जल संजीवनी – अतिसारावर उपयोगी पडणारे हे एक पेय आहे. एक लिटर उकळून गार केलेले पाणी घेऊन त्यात आठ चमचे साखर, चार चिमटी मीठ आणि चवीपुरते लिंबू हे सर्व एकत्र करून घ्यावे.ही जल संजीवनी शरीराच्या बहरत पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते.

गोवर

गोवर हा लहान मुलांमध्ये आढळणारा, लागण होणारा आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठते. निरोगी मुलांना याचा फारसा त्रास होत नाही पण मूल जर कुपोषित असेल तर गोवरामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात व मृत्यूही येऊ शकतो.

लक्षणे – डोळे खूप लाल होणे, सर्दी, बारीक ताप, खोकला तसेच तोंडावर, गालावर लालसर ठिपके येतात व पुरळ येते. हे ठिपके म्हणजेच गोवर ओळखण्याचे हमखास लक्षण आहे. ताप हळूहळू वाढत जातो व पूर्ण अंगभर कानाच्या मागे चेहरा, मान, छाती, पोट याप्रमाणे पुरळ येते व शेवटी हातापायावर पसरते पण कधीकधी पुरळ हातापायावर यायच्या आधीच गोवर कमी होतो. गोवराचे पुरळ ज्याप्रमाणे येते. त्याचप्रमाणे म्हणजे वरून खाली नाहीसे होते.

तोंडातील पुरळामुळे भूक मंदावते. खोकला मात्र थोडे दिवस टिकतो. ताप उतरून नंतर पुन्हा आला किंवा पुरळ पायापर्यंत गेल्यावरसुद्धा ताप कमी झाला नाही तर त्यातूनच पुढे न्यूमोनिया किंवा इतर आजार होऊ शकतात.

उपचार – गोवरची लस देणे हा प्रतिबंधक उपाय आहे. ही लस सरकारी दवाखान्यात मिळते. ही लस मूल 9 महिन्यांचे असतांना देतात. लस टोचल्यावर थोडा ताप, अंग लाल होते व पुरळ येते. गोवर झाल्यास त्वरित डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने औषधोपचार घ्यावेत.

कांजण्या

कांजण्या हा लहान मुलांचाच आजार आहे. कांजण्याचे जंतू श्‍वासावाटे शरीरात प्रवेश करतात. अंदाजे दोन आठवड्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे – आजाराच्या सुरुवातीला थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. नंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ येते. हे छाती, पोट यावर जास्त दिसते. पुरळ सुरुवातीला लालसर असते. मग त्यात पाणी भरते. पू होतो आणि नंतर खपली धरते. हे सर्व पाच दिवसांत होते. हे पुरळ एका पाठोपाठ एक असे दोन तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर दिसते. खपली धरायला सुरुवात झाली की आजार संपत आला असे समजावे.

उपचार – प्रतिबंधक लस देता येते. परंतु ही लस सरकारी लसीकरणाच्या कार्यक्रमात मिळत नाही. ही खाजगी डॉक्‍टरकडून विकत घेऊन द्यावी लागते.

मुडदूस

फ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये दिसणारा आजार म्हणजे मुडदूस होय. हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी फ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे हाडे ठिसूळ व मऊ बनतात.

लक्षणे –

  • कपाळ पुढे आलेले दिसते.
  • विकास हळूहळू होत असतो.
  • सांध्यांच्या बाजूच्या हाडांची टोक फुगतात.
  • सांधे सुजल्यासारखे दिसतात.
  • छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो.
  • पोट मोठे दिसते.
  • टाळू नीट भरलेली दिसून येत नाही.

उपचार – बाळाला कोवळ्या उन्हात 10-15 मिनिटे ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भागते. कारण त्वचा/कातडी सूर्यप्रकाशाच्या मदतीने ड जीवनसत्व तयार करते. भरपूर दूध, माशाचे तेल, अंडी, मांस इत्यादी गोष्टी खाव्यात/खायला द्याव्यात.

बाळदमा

मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही दमा होऊ शकतो. याला बाळदमा म्हणतात. यासाठी पोट उडणे, डबा, इत्यादी नावेही आहेत. बाळदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी दम लागण्याचा आजार दिसल्यास न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजा. सहा महिन्यांनंतर येणारा दमाही दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो.

मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकांत (आई, वडील, भाऊ, बहीण,काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ.) दम्याचा विकार असल्यास त्या बाळाचा दमा कायमचा विकार होण्याची शक्‍यता असते. मात्र बाळदमा कोणत्या प्रकारचा आहे हे आधी ठरवणे अवघड आहे.

कारणे – पन्नास टक्‍के बाळदम्यांमध्ये आनुवंशिकता हे कारण असते. वावडे, विषाणुदाह, राग-दु:ख, इत्यादी भावना यांमुळे अशा मुलांना दम्याची सुरुवात होऊ शकते. आनुवंशिक नसणारा बाळदमाही वावडे (धूळ, परागकण, दमट हवा) किंवा फुफ्फुसाच्या विषाणुदाहामुळे होऊ शकतो.

दम्यामध्ये श्‍वासनलिका अरुंद होणे, आतल्या आवरणाला सूज येणे आणि चिकट पाझराने बेडका तयार होणे या तीन प्रमुख प्रक्रियांमुळे हवेचा मार्ग अरुंद होतो. यामुळे श्‍वसनास जास्त श्रम लागतात. यामुळे धाप लागणे, श्‍वास वेगाने चालणे, खोकला, इत्यादी लक्षणे दिसतात. ताप असल्यास जिवाणूदाह हे तापाचे कारण असू शकेल.
दम्याची तीव्रता कमी-जास्त असू शकते.

रोगनिदान – बाळदम्यात धाप, दम लागणे, जड खोकला ही मुख्य लक्षणे असतात.
थोडा ताप असू शकतो पण खूप ताप असेल तर न्यूमोनियाची शक्‍यता लक्षात ठेवावी.
धाप-दम लागण्याचा त्रास वारंवार होण्यावरून बाळदम्याचे निदान निश्‍चित करता येते. न्यूमोनियातही दम्यासारखा त्रास होतो हे लक्षात ठेवा.

उपचार – उलटी करवणे हा घरगुती आयुर्वेदिक उपाय ब-याच वेळा उपयोगी पडतो. यासाठी वेखंड मधात उगाळून त्याचे चाटण दिल्यास उलटी होते. त्यातून चिकट स्त्राव पडून जातात आणि दमा कमी होतो. याने काही फरक न पडल्यास सालमाल (औषध किंवा गोळी) औषध चांगले उपयोगी पडते.

या औषधांनी श्‍वासनलिका रुंद, मोकळ्या होतात. यामुळे श्‍वसन सोपे होते.
ताप खूप असल्यास पॅमॉल आणि जंतुविरोधी कोझाल, ऍमॉक्‍सी ही औषधे चालू करावीत.

मात्र अशा उपायांनी बाळदमा बरा होत नसेल तर वरील उपचार देऊन डॉक्‍टरकडे पाठवून द्यावे. रुग्णालयात यासाठी औषधी वाफारा दिला जातो. याने ताबडतोब आराम पडतो. विषाणूंमुळे येणाऱ्या सर्दीतापानेही बाळदमा सुरू होऊ शकतो. पावसाळी किंवा हिवाळी हवेत बाळदमा जास्त आढळतो.

लक्षणे आणि चिन्हे –

  • बालकाला सर्दी, शिंका अशा त्रासाने सुरुवात होते.
  • यानंतर श्वास घेणे अवघड होऊन छातीचा आवाज यायला लागतो.
  • श्वसन उथळ आणि जलद होते, नाकपुड्या फुलतात.
  • मूल मोठे असेल तर छाती दाटल्याचे सांगते.
  • खोकल्याची मधून मधून उबळ येते.
  • श्‍वास सोडताना शिट्टीसारखा आवाज येतो.
  • बाळदमा अधून-मधून येतो. मात्र दरम्यान मुलाची तब्येत ठीकठाक असते.
  • लहान वयाची बालके बाळदम्याच्या श्‍वसनाच्या त्रासाने रडतात.
  • दम लागल्याने पोट उडताना (हाबके मारताना) दिसते.
  • जास्त त्रास असल्यास ओठ आणि हाताची त्वचा निळसर दिसते.
  • न्यूमोनियात जसा सुरुवातीपासून ताप असतो तसा बाळदम्यात नसतो. पण ताप 2-3दिवसांनी येऊ शकतो.

प्राथमिक आणि वैद्यकीय उपचार – बाळदम्याचा पहिलाच प्रसंग असेल तर बाळाला ताबडतोब डॉक्‍टरांकडे न्या. डॉक्‍टर तातडीक उपचार करतील तसेच घरी घेण्यासाठी औषधे सांगतील. बाळदम्यात सामान्यपणे इंजेक्‍शन आणि सलाईनची गरज नसते. श्‍वसनमार्गातून औषध योग्य ठिकाणी बरोबर पोहोचते. तोंडाने घ्यायच्या गोळ्यादेखील श्‍वासमार्ग मोकळा ठेवायला मदत करतात. तातडीक उपचारांमध्ये तीन स्वरूपात औषधे मिळतात.

अ) 100 डोसचे फवारे असलेला स्प्रे. या स्प्रेतून दर वेळी ठरावीक मात्रेत औषध बाहेर येते. फवाऱ्याचा खटका दाबणे आणि श्वास घेणे एकाच वेळी करावे लागते. बालकांना हे जमत नसल्याने स्पेसरचा उपयोग करावा लागतो. आपले डॉक्‍टर आपल्याला याबद्दल सांगतील. हे औषध घरीपण वापरता येते.

ब) रोटाहेलर या प्रकारात औषधाच्या कॅपशूलमध्ये पावडर असते. हा प्रकार जास्त स्वस्त पडतो.

क) रुग्णालय किंवा दवाखान्यात नेब्यूलायझर वापरतात.
घरी उपचार घ्यायचा असला तरी आपल्या डॉक्‍टरांना फोनवर कळवावे हे चांगले.

काही तपासण्या – बाळदमा कोणत्या पदार्थाच्या वावड्यामुळे येतो हे शोधण्यासाठी वावडे तपासणी करावी. छातीचा क्षयरोग किंवा न्यूमोनिया आहे/नाही हे तपासण्यासाठी छातीचा एक्‍स-रे लागू शकेल. दमा 5 वर्षांनंतर टिकला तर फुफ्फुसांची क्षमता तपासावी लागते. यासाठी पी.एफ.टेस्ट. करतात.

प्रतिबंध – ऋतूमानाप्रमाणे बाळदमा कमी-जास्त होतो. यासाठी थंडी-पावसात काळजी घ्या. ऊबदार कपडे चांगले. अशा बालकांना सर्दीताप झालेल्या व्यक्तीपासून शक्‍यतो दूर ठेवा. वावड्याचे कारण मिळाल्यास दमा टाळण्यासाठी प्रयत्न करता येतो. वाढत्या हवा प्रदूषणामुळे बाळदमा वाढत आहे. धूळ आणि प्रदूषण यापासून अशा बाळांना शक्‍यतो सुरक्षित ठेवा. बाळदम्याची लक्षणे, चिन्हे दिसताच डॉक्‍टरांशी संपर्क करायला पाहिजे.

विशेष सूचना – बाळदमा हा बराच काळ चालणारा आणि कमी-जास्त होणारा आजार आहे. याला कायमचा नाही पण तात्पुरता उपाय आहे. पालकांना या आजाराची आणि उपचारांची नीट माहिती पाहिजे. यामुळे विनाकारण मनस्ताप, चुकीची आशा-निराशा, उगाचच भीती किंवा डॉक्‍टर बदलत राहणे या गोष्टींना आळा बसेल.

आपल्या बालकाच्या आजाराबद्दल बालवाडीच्या शिक्षिकांना सांगून ठेवा. तसेच प्रथमोपचाराची औषधे आणि आपला फोन नंबर देऊन ठेवा. 5 वर्षं वयानंतर बहुतेक बालकांचा दमा आपोआप थांबतो.

मात्र काहींना यानंतरही दमा चालूच राहतो. श्‍वसनोपचार म्हणजे निरनिराळे सोपे प्राणायाम मुलांना शिकवा. फुगा फुगवण्याचा व्यायामही चांगला आहे. मुलाला त्याचा नेहमीचा खेळ खेळू द्या. खेळामुळे श्वसनमार्ग मोकळा आणि निरोगी राहतो. पण सोबतच्या बॅगमध्ये औषधे ठेवायला पाहिजे. अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दमा असूनही यशस्वी झाले. पालकांनी निराश न होता योग्य काळजी घ्यावी. कुडमुडे वैद्य किंवा भोंदू डॉक्‍टरांचा सल्ला-उपचार घेऊ नका. ही मंडळी बऱ्याच वेळेला स्टेरॉईड औषधांचा अतिरेक करतात.

– डॉ. एस. एल. शहाणे

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcoffeecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRAmaharshtra
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar