पाठदुखी आणि सायटिका या अत्यंत सामान्यपणे आढळणाऱ्या आरोग्य समस्या आहेत. किंबहुना सर्दीनंतर हेच आजार सर्वाधिक प्रमाणात आढळतात.असे म्हणात की, जगभरातील 40% लोकांना आयुष्यात एकदा तरी पाठीच्या खालच्या भागाच्या आणि पायांच्या दुखण्याला (सायटिका) सामोरे जावे लागते. बहुतेक रुग्णांमध्ये या वेदना कमी कालावधीसाठी असतात आणि औषधे व काही काळ आराम करून यावर उपचार कता येतात. पण काही रुग्णांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यातील नसा सुजतात आणि त्यांचा दाह होतो आणि काही वेळा आकुंचन पावतात. त्यामुळे पायांना बधीरपणा येतो आणि अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत हालचाल करणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होऊन जाते.
डॉ. आनंद कवी
स्लीप डिस्क किंवा मणक्याचे
स्खलन म्हणजे काय?
आपला पाठीचा कणा पाठीच्या कण्याच्या हाडांनी तयार झालेला आहे आणि पाठीचा कणा व मज्जातंतूंच्या आवागमनासाठी तो एक संरक्षक नळी तयार करतो. पाठीच्या कण्याची हाडे मणक्यांनी विभक्त झालेली असतात. मणके हे उशांसारखे किंवा शॉक ऍबसॉर्बिंग पॅड्ससारखे काम करतात. जेव्हा हे मणके फाटतात तेव्हा जेलीसारखे न्यूक्लेअस त्यांच्यातून मोकेळे होते आणि ते पाठीच्या कण्याच्या नसांना स्पर्श करते. त्यामुळे प्रचंड वेदना होतात आणि या नसांच्या मार्गातील पायाच्या भागात लहरी उत्पन्न होतात. या वेदनेचा संबंध पायांच्या बधीरपणाशी किंवा अशक्तपणाशी असू शकतो.
यावर उपचार कसे करतात?
पाठीच्या कण्याचे सर्जन कदाचित शस्त्रक्रिया करण्यास सांगतील या भीतीने आणि पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेच्या भीतीने बहुतेक रुग्ण सेल्फ-मेडिकेशन (स्वतःच्या विचाराने औषधे घेणे), योगासने, फिजिओथेरपी आणि इतर उपचारांचा अवलंब करतात. नसांना आलेली सूज आणि दाह कमी झाल्यामुळे त्यांच्यापैकी काहींना दिलासा मिळतो. पण हा दिलासा केवळ तात्पुरता असतो आणि काही रुग्णांची परिस्थिती अधिक गंभीर होते आणि त्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असते आणि काही रुग्ण तर डॉक्टरकडे येण्यास इतका विलंब लावतात की, तोपर्यंत नसांचे कायमस्वरूपी नुकसान झालेले असते.
डॉक्टर नेहमीच अशा रुग्णाची सखोल तपासणी करतो आणि वेदनेचे मूळ कारण शोधतो. वेदना कशामुळे उत्पन्न होत आहे याचा तपास करतो, वेदना सतत का होत आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते का आणि कशी, आणि जर शस्त्रक्रिया आवश्यक असेल तर सुरक्षित पर्याय कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. शस्त्रक्रिया करून उपचार करायचे की, नॉन-सर्जिकल म्हणजे शस्त्रक्रिया न करता उपचार करायचे हे ठरविण्याचा अधिकार अर्थातच रुग्णाचा असतो.
उपचारांचे नियोजन कसे केले जाते?
सखोल मूल्यमापन आणि एमआरआय स्कॅन केल्यानंतर आम्ही उपचारांचे नियोजन करतो. समस्येचे गांभीर्य लक्षात घेत सुरुवातीला औषधांनी व विश्रांतीची शिफारस करून उपचार करण्यात येतात आणि सौम्य प्रकरणांमध्ये व्यायाम सुचविण्यात येतात. मध्यम स्वरुपाच्या वेदना होत असतील तर नर्व्ह इंजेक्शन्स किंवा स्पायनल इंजेक्शन्स देण्यात येतात आणि पारंपरिक उपचारांना दाद न देणाऱ्या किंवा रचनात्मक बदल करणे आवश्यक असलेल्या काही रुग्णांवर लोकल अनेस्थेशिया देऊन टाकेरहीत एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येते.
लोकल अनेस्थेशिया देऊन पाठीच्या टाकेरहीत शस्त्रक्रिया म्हणजे काय?
पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियेत एक क्रांती घडवून आणणारी ही एक दिवसाची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत, प्रभावित मणक्यापर्यंत बाजूने स्नायूू व ऊती फुगवून एण्डोस्कोप घालण्यात येतो. या प्रक्रियेत पाठीच्या कण्याची नैसर्गिक रचना व स्थैर्याचे संवर्धन करण्यात येते. कारण या प्रक्रियेत स्नायू व हाडे कापली जात नाहीत.
ही टाकेरहीत शस्त्रक्रिया आहे :
त्वचेला केला जाणारा छेद अत्यंत छोटा (5-8 मिमी) असतो. तो नैसर्गिकपणे बुजतो आणि रक्तसुद्धा वाहून जात नाही.
एण्डोस्कोप आणि लेझर :
एण्डोस्कोपमुळे आतील भागाची परिस्थिती व्यवस्थित कळते. त्यामुळे बाहेर आलेला, स्खलन झालेला किंवा हर्निया झालेला मणक्याचा भाग काढून टाकणे शक्य होते. त्याचप्रमाणे गंभीर स्वरुपाचे स्खलन आणि अस्थैर्य किंवा स्क्रू किंवा रॉड यामुळे होणारे फ्युजन टाळले जाते. लेझर आणि रेडियो फ्रिक्वेन्सी उपकरणे कठोर ऊतींना निमुळती करतात आणि नसांना दाबणाऱ्या हाडांच्या अतिरिक्त वाढीसाठी वापरली जातात. त्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये जशी हाडे कापावी लागतात, तसे न करता या भागांपर्यंत पोहोचता येते.
लोकल अनेस्थेशिया देऊन जागृतावस्थेत
असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया :
या तंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही शस्त्रक्रिया रुग्णाला जागृतावस्थेत ठेवून करण्यात येते. त्यामुळे रुग्ण त्याला होणाऱ्या वेदनेबद्दलचा मौल्यवान अभिप्राय देतो, जेणेकरून ही शस्त्रक्रिया सुरक्षित होते आणि वेदना निर्माण करणाऱ्या ऊतीला लक्ष्य करता येते आणि पाठीच्या कण्यातील नाजूक भागांना टाळता येते. संपूर्ण वा पाठीच्या कण्याला अनेस्थेशिया देऊन केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये हे शक्य नसते.
त्यामुळे मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार किंवा श्वासाचे विकार असलेल्या आणि प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या व्यक्तींसाठीही ही सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. अशा प्रकारचे आजार असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे तसे कठीणच असते.
एक दिवसाची शस्त्रक्रिया :
ही शस्त्रक्रिया टाकेरहीत आणि लोकल अनेस्थेशिया देऊन करण्यात येत असल्याने वेदनांपासून लगेचच दिलासा मिळतो आणि ते वेगाने मिळतो. अनेक रुग्ण शस्त्रक्रियेच्या दिवशीच आपल्या पायावर चालत जातात. अर्थात, हे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर अवलंबून असते. या शस्त्रक्रियेमध्ये आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागत नाही आणि हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस वास्तव्य करावे लागत नाही, युरिनरी कॅथेटर्सची आवश्यकता नसते, दीर्घकालीन इंजेक्शन्स किंवा तीव्र मात्रेची अँटिबायोटिक्स घ्यावी लागत नाहीत. यासाठी फॉलो-अप ड्रेसिंगचीही गरज नसते. या सगळ्यामुळे ही शस्त्रक्रिया वाजवी खर्चात होते आणि परवडणारी असते.
तुमच्यावर शस्त्रक्रिया करायला हवी का:
1. तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल किंवा ती वेदना तुमच्या पायांपर्यंत जात असेल.
2. मांडीत, गुडघ्यात वेदना होत असतील.
3. मांडी घालून बसणे कठीण जात असेल किंवा पाय ताठ करण्याची गरज भासत असेल.
4. टाचेत वेदना होत असेल किंवा सकाळी उठताना वेदना होत असतील.
5. पायात किंवा पोटऱ्यांमध्ये वेदना होऊन झोपमोड होत असेल किंवा पायात गोळे येत असतील.
6. पाठदुखी किंवा कुशीवर वळल्यामुळे झोप व्यवस्थित होत नसेल.
7. थंड हवामान सहन होत नसेल किंवा पंख्याखाली झोप येत नसेल.
8. उभे राहिल्यामुळे किंवा चालल्यामुळे पायात गोळे येत असतील किंवा पाय दुखत असतील.
9. बधीरपणा किंवा मुंग्या येणे, तळव्यांची आग होणे.
10. पाय, पाऊल किंवा पायाच्या बोटांमध्ये अशक्तपणा किंवा पादत्राणे पायातून निसटत असतील.
11. मूत्रासंबंधित किंवा मलविसर्जनाच्या समस्या.
12. तुम्ही एमआरआय चाचणी केली असेल किंवा स्पायनल वा एपिड्युरल इंजेक्शन घेतले असेल.
13.तुम्हाला पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल.
14. तुमच्या पाठीच्या मणक्यांचे स्खलन झाले असेल.
15.गंभीर स्वरुपाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य चाचण्या, निदान आणि उपचार करवून घ्या.
16. सर्व प्रकारचे मणक्यांचे स्खलन, हर्निएशन्स, सूज, असाधारण बाक, असाधारण वाढ, अस्थिबंधांचा संकोच झाल्यास टाकेरहीत एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येते.
17. पाठीची शस्त्रक्रिया करूनही दिलासा न मिळालेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते.
सॉफ्टवेअर इंजिनीअरचे प्रकरण :
अलीकडेच अमेरिकेत काम करणाऱ्या एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअरला स्लीप डिस्कचा गंभीर स्वरुपाचा त्रास झाला. त्याला पाठीत प्रचंड वेदना होत होत्या, पायात बधीरपणा होता व अशक्तपणाही होता. अमेकितील शल्यविशारदाने त्याला पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करून पाठीच्या कण्यात स्क्रू आणि रॉड बसविण्याचा सल्ला दिला आणि या शस्त्रक्रियेमध्ये असलेली जोखीमही समजावून सांगितली. हे समजल्यावर तो प्रचंड घाबरला. त्याने अमेरिकेतील डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन भारतात येण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याची सखोल तपासणी करण्यात आली आणि त्याच्यावर टाकेरहीत एण्डोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. त्याच संध्याकाळी तो वेदनारहीत चालू शकत होता. घरी महिनाभर विश्रांती घेतल्यावर तो अमेरिकेत परतला आणि काम करू लागला.
आणखी काही गोष्टी पाठदुखीविषयी…
पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी एवढे बेफिकीर राहतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर तिचा त्रास जास्त होतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ सणकन भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड पुकारल्याचे लक्षात येते.
डोकेदुखीचे निश्चित कारण अजून शोधता आलेले नाही. पाठदुखीचे मात्र तसे नाही. पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो. हे दुखणे म्हणजे शरीराने दिलेली धोक्याची सूचना असते. ती वेळीच ओळखली तर पुढचा त्रास वाचतो. मात्र अनेकदा या सूचनेलाच दुखणे समजून दुर्लक्ष केले जाते. पाठदुखी होण्यासाठी अनेक घटना कारणीभूत ठरतात. शरीराला जड जाणारे ओझे, सतत खाली वाकत राहणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे.. मात्र या कारणांपेक्षाही कार्यालयातील खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय अधिक कारणीभूत ठरते. म्हणजे सहजसाध्य पद्धतीने बदलू शकणारी सवय न बदलल्याने अनेकांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. वाढलेले वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होण्यासारखे जडलेले आजार, शारीरिक काम यामुळे पाठदुखी वाढते.
पाठदुखीसाठी शारीरिक कारणांसोबतच मानसिक कारणेही जबाबदार असतात. मनावरील ताण, रोजच्या आयुष्यातील तणाव हेदेखील पाठदुखीला आमंत्रण देतात. मनाचा आणि पाठीचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र मनावरील ताणामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर परिणाम होतो, असे लक्षात आले आहे. कार्यालयातील कामाचा ताण, अस्वस्थता यामुळे पाठदुखी होत असेल तर शरीरासोबत मनाचेही आरोग्य जपणे गरजेचे आहे.
पाठदुखी होण्यामागे काही वेळा गंभीर कारणेही असतात. मणक्याला फ्रॅक्चर झाल्यास, स्लिप डिस्क, संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. ओटीपोटात सूज आल्याने स्त्रियांना पाठदुखी होते. अशा गंभीर कारणांवेळी थेट डॉक्टरकडे जायला हवे. मात्र रोजच्या चुकीच्या सवयींमुळे पाठीचा खालचा भाग दुखत असेल तर घरच्या घरी उपाय करता येतात. मात्र वेळीच उपचार केले नाहीत आणि हे दुखणे मांडया, पाय, पावले येथपर्यंत पोहोचले की वैद्यकीय उपचारांची गरज पडते. मात्र एक्स रे, सीटी स्कॅन, महागडे उपचार येथपर्यंत पोहोचायचे नसेल तर काही अयोग्य सवयी जरूर बदला.
… आणि हेही करून पहा बरं!
सकाळी उठून बसताच वा सतत कार्यालयात बसून काम करताना पाठ दुखते का? जर हीच समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलाव्या लागतील. नाही तर ही समस्या दीर्घकाळ तुमची पाठ सोडणार नाही. पाठदुखीची मुख्य कारणे ओळखून ती दूर करण्याची वा आपल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. नसता ही समस्या कायमस्वरूपी राहू शकते. जाणून घेऊया प्रत्यक्षात असे का होते आणि पीडित आपल्या पातळीवर कोणते उपाय अवलंबून या पीडेपासून मुक्तता मिळवू शकतो.
संगीत ऐका : तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण मात्र हे खरे आहे की, विश्रांती व सुगम संगीत पाठदुखीपासून सुटका करू शकते. हा एक शांत उपचार आहे. एका संशोधनात आढळले की, जे लोक लागोपाठ तीन आठवडे दररोज 25 मिनिटे संगीत ऐकत होते, त्यांची पाठदुखी 40 टक्क्यांनी कमी झाली. संगीतामुळे वेदनेकडे पीडिताचे दुर्लक्ष होते.
सकाळच्या वेदना : रात्रीच्या वेळी पाठीत अतिरिक्त फ्लुइड गोळा होतो, जो डिस्कच्या आतमध्ये गळत राहतो. डिस्क प्रत्यक्षात एका प्रकारच्या स्पंजी कुशनसारखी असते, जी पाठीच्या कण्यामध्ये 24 सांध्यांना पृथक करते वा त्यांच्यामध्ये असते. अशात व्यक्ती सकाळी उठल्यानंतर झुकते तेव्हा त्या संग्रहित फ्लुइडमुळे पाठीच्या कण्यावर दबाव येऊ लागतो. परिणामी व्यक्तीला वेदना होतात. जे लोक सकाळी एकदम झुकत नाहीत, त्यांना वेदना कमी होतात. सकाळी पलंगावरून जमिनीवर पाय ठेवताना कंबर एकदम वा जास्त झुकणार नाही, याची काळजी घ्यावी.
हीट रॅप्स : पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ब्रुफेनसारख्या वेदनाशामक औषधांचे सेवन बिलकूल करू नका. न्यू जर्सी मेडिकल स्कूलच्या संशोधकांच्या मते, पाठदुखीने पीडित असलेले जे लोक नियमितरीत्या हीट रॅप्सचा (गरम पट्टी) वापर करतात, त्यांच्या वेदना 25 टक्के कमी होतात. हीट रॅप्समुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि उतींची लवचीकता वाढते. (डॉ. आनंद कवी हे एण्डोस्कोपिक स्पाइन सर्जरीमध्ये तज्ज्ञ आहेत)