आपल्याला हृदयातील स्नायूंची कार्यपद्धती जाणून घ्यावी लागेल. हे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. त्यामुळे जेव्हा स्नायू आकुंचित होण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा आम्ही त्याला सिस्टॉलिक फेल्युअर असे म्हणतो आणि जेव्हा स्नायू प्रसरण पावण्याला अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याला डायास्टॉलिक फेल्युअर असे म्हणतात.
कारणे :
हृदय कार्यक्षीण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे, उच्च रक्तदाब, हृदयातील झडपेला इजा होणे, हृदयाच्या स्नायूंमध्ये असाधारण कण साचणे, फुफ्फुसातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन (संरोध) ही कारणे असू शकतात. यापैकी काही आजार बरे करता येऊ शकतात आणि काही प्रकारांमध्ये प्रकृती पूर्ववत होणे शक्य नाही. त्यामुळे हृदय निकामी होण्यासाठीचे नक्की कारण शोधून काढण्यासाठी आम्हाला पुढील चाचण्या करण्याची आवश्यकता असते.
लक्षणे :
लक्षणांचा विचार करता हृदय अचानक बंद पडण्याच्या क्रियेला आम्ही ऍक्युट हार्ट फेल्युअर म्हणतो. या परिस्थितीत तुम्ही काही तासांपूर्वीपर्यंत सामान्य असता आणि त्यानंतर तुम्हाला धाप लागते, हृदयाचे ठोके धडधडतात, श्वास अडकतो, खोकला येतो. पायाला सूज येते. तुम्हाला थकवा येतो किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. हृदयविकाराचा झटका आला असेल तर छातीत दुखते. छातीत दुखत असेल, घेरी येत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा धडधडत असतील, अचानक व खूप धाप लागत असेल आणि गुलाबी रंगाचा फेसयुक्त कफ बाहेर पडत असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे.
हृदय बंद पडण्याच्या सौम्य प्रकारांना क्रॉनिक म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला ऍक्युट हृदय कार्यक्षीणतेची नाटयमय लक्षणे जाणवत नाहीत, पण तरीही हृदयक्रिया क्षीण होत असते तेव्हा तुमच्या शरीरात हळूवारपणे काही बदल होत असतात. काही दिवस तुम्हाला फार बरे वाटत असेल, तर काही दिवस अशक्तपणा जाणवत असेल आणि थकवा येत असेल. तुमचे वजनही वाढेल. वैद्यकीय भाषेत तुमच्या शरीरात पाणी साठत जाईल. आपल्या शरीरात नक्की काय बदल होतोय हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरची भेट घ्या.
उपचार :
हृदय कार्यक्षीणतेच्या बहुतेक कारणांवर उपचार करता येऊ शकतात. त्यांच्यापैकी काही बरे केले जाऊ शकतात, तर काही लक्षणे बरी करता येऊ शकत नाहीत. पण, औषधांच्या माध्यमांतून त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. काही लक्षणे मात्र, औषधांनी नियंत्रित करता येत नाहीत. कमाल प्रमाणात औषधे घेऊनही हदय कार्यक्षीणतेची परिस्थिती बिकट होत जाते आणि तुम्हाला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते.
हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही रुग्णांना वर्षातून दोन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते. आता डॉक्टर्स या रुग्णांना एक आशेचा किरण दाखवू शकतात. गेल्या दोन दशकांमध्ये हृदय कार्यक्षीणतेवरील उपचारांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. हृदय कार्यक्षीणतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांनुसार या उपचारांची आखणी करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करून तुमच्या हृदयाच्या डाव्या कप्प्यांची सूज कमी करून त्यावर उपचार करू शकतो, तुमच्या हृदयाच्या झडपांवर उपचार करू शकतो. हृदय प्रत्यारोपण ही एक क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तब्बल वर्षांपर्यंत परिणाम पाहायला मिळतात. हृदय कार्यक्षीणतेवर उपचार करण्यासाठी लहान आकाराचे मोटर पंपसुद्धा उपलब्ध आहेत.
या पंपांना एलवॅड्स (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर असिस्ट डिव्हाइसेस) म्हणतात. हे अत्यंत लहान आकाराचे मोटर पंप हृदयाच्या डाव्या बाजूला असतात आणि रक्ताभिसरण सुरू ठेवतात. ही अत्यंत उत्साहाची बाब आहे आणि गेल्या दशकात उत्तर अमेरिकेतील अनेक केंद्रांनी परिणामांमध्ये सुधारणा झाल्याची नोंद केली आहे. उत्तर अमेरिकेत होतो, दर आठवडयाला अशा प्रकारची 10 ते 12 यंत्रे दर आठवडयाला बसवली जायची. ही उपकरणे उत्कृष्ट काम करतात आणि जेव्हा औषधांचा परिणाम होईनासा होतो, तेव्हा या उपकरणांमुळे आयुर्मान वाढण्यास मदत होते.
हृदय कार्यक्षीणता या आजाराचे आयुष्यभर व्यवस्थापन करावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने हृदय कार्यक्षीणतेसाठी अनेक नवी व्यवस्थापन उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. उपचारांनंतर हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि हृदय सशक्त होते. उपचारांमुळे तुमचे आयुर्मान वाढते आणि अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी होते.
जगात हृदयरोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. ज्यांना हृदयरोग होतो, अशा लोकांपैकी 1/4 लोक हे 30 ते 50 वयोगटातील आहेत. दळणवळणातील झालेल्या आमूलाग्र बदलामुळे जग अगदी जवळ येऊ लागले आहे.
मोबाईल, संगणक, वाहने माणसांचे अविभाज्य घटक बनले आहे. ते मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. या कारणास्तव स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी चिंता, काळजी, अनावश्यक विचार, प्रापंचिक प्रश्न याचा परिणाम राहणीमानावर तर होतोच; परंतु शारीरिकदृष्टया होताना दिसतो. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1 कोटी 80 लाख लोक हे हृदय विकाराने मृत्युमुखी पडतात. भारतातील एकूण मृत्यूपैकी 25 टक्के मृत्यू हृदयरोगाने होत असतात, असे सरकारी सर्व्हेत दिसून आलेले आहे.
आपल्या रक्तवाहिन्यांवर रक्ताचा जो दाब पडतो, त्याला (ब्लड प्रेशर) रक्तदाब असे म्हणतात. हाय ब्लड प्रेशर व लो ब्लड प्रेशर हे प्रकार त्यात असतात. हृदय आकुंचन पावताना डाव्या धमनीतून ज्या प्रेशरने रक्त पुढे फेकले जाते, त्यामुळे (सिस्टोलिक प्रेशर) संकोचकालिक रक्तदाब तयार होतो. हृदयाच्या दोन आकुंचनामधील काळात धमन्यांमध्ये रक्तदाब असतो. त्याला (डायस्टोलिक प्रेशर) विश्रामकालिक रक्तदाब म्हणतात. साधारण स्थितीत स्वस्थ माणसाचे स्त्री-पुरुष ब्लड प्रेशर 80/120 मिली मीटर असते. जर का कुणाचे ब्लड प्रेशर सिस्टोलिक 140 व डायस्टोलिक 90 पेक्षा जास्त असेल, तर ते उच्च रक्तदाबाच्या (हाय ब्लड प्रेशर) श्रेणीत मोडते. याची माहिती असणे जरुरीचे आहे. आरंभी सुरुवातीच्या काळात रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाही.
रक्तदाबाचे पहिले लक्षण सकाळी झोपून उठल्यानंतर डोके व मानेच्या मागील भागात वेदना जाणवते. ब्लड प्रेशरच्या रुग्णांना डोकेदुखी, चक्कर येणे, कमी दिसू लागणे, झोप न येणे, निद्रा नाश, मूत्रपिंड निकामी होणे व हृदयरोग इत्यादी. हृदयरोगाच्या माणसांनी दर दोन-तीन महिन्यांनी लिपिड प्रोफाईल करून ब्लड तपासणी करावी. त्याचबरोबर सीरम, युरिक ऍसिड, सीरम क्रीएटिन करणे आवश्यक आहे.
ईसीपी किंवा आवश्यकतेनुसार टुडी ऐको करून खात्री करून घ्यावी. (डायबेटीज) मधुमेह असेल, तर फास्टिंग ब्लड शुगर, जेवणानंतरचे ब्लड शुगर नियमित तीन महिन्यांनी करावी. यात आहार, विहार व औषधोपचार याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. भोजनात मिठावर नियंत्रण असावे. धमनीत क्षाराचे प्रमाण वाढून रक्तप्रवाह सुरळीत होत नाही व (हार्ट ऍटॅक) हृदयरोगग्रस्त व्हावे लागते. वजन अधिक असेल तर खाण्यातील सिक्ग्ध पदार्थ यांना आवर घालावा.
मिठाई, जास्त फॅट असलेले सायीचे दूध घेऊ नये. दुधातील मलई खाऊ नये. ज्या पदार्थात मीठाचे प्रमाण अधिक असते असे लोणचे, चटणी, पापड खाणे टाळावे. फास्ट फूडचे पदार्थ हानीकारकच असतात. इतकी सारी आहाराची काळजी घेताना मानसिक ताणतणाव यापासून दूर राहावे. नियमित अर्धा तास तरी व्यायाम करावा. वेगाने चालण्याचा प्रयत्न करावा. चालणे हा व्यायाम मोकळ्या जागेत व वाहनांच्या प्रदूषणमुक्तीत असावा.
अर्थात यात सातत्य असावे. ब्लड प्रेशरकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. सध्याच्या दैनंदिन स्थितीत वयाच्या विशीतच हृदयरोगी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्लडप्रेशर व मधुमेह हे दोन आजार (सायलेंट किलर) लपलेले आजार आहेत जे अचानक अडचणीत आणून घातक ठरतात. (कोरोनरी बायपास) हृदय शस्त्रक्रियेची वेळ आणू नका.
-डॉ. एस. एल. शहाणे