स्किझोफ्रिनिया या आजाराला मराठीमध्ये छिन्नमनस्कता असे संबोधले जाते, तर ग्रीक नामावलीनुसार याला स्किझोफ्रिनिया असे म्हणतात. “स्किझो’ म्हणजे दुभंगलेले मन अथवा व्यक्तित्व होय. स्किझोफ्रिनिया हा मानसिक आजारांमधील सर्वात गंभीर आजार मानला जातो. हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नाही. मात्र, हा आजार गोळ्या औषधांनी कंट्रोलमध्ये ठेवता येतो. स्किझोफ्रेनिया हा एक गुंतागुंतीचा तीव्र स्वरूपाचा मानसिक आजार आहे. समाजात या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना वेगळ्या नजरेने बघितले जाते व त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. स्किझोफ्रेनिया या आजारात व्यक्तीचा वास्तवाकडे बघण्याच्या, भावना व्यक्त करण्याच्या, विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
डॉ. विजय कुलकर्णी
स्किझोफ्रिनिया हा आजार प्रामुख्याने आपल्या मेंदूमधील डोपामाईन या रसायनाच्या होणाऱ्या कमी-जास्त प्रमाणामुळे होतो. या आजाराची लक्षणे ही वयाच्या 16 ते 18 वर्षांनंतर साधारणतः दिसून येतात. स्किझोफ्रिनिया या आजाराची पाळेमुळे ही जन्मतःच कोठेतरी रुजलेली असतात; परंतु या आजाराची लक्षणे ही एखाद्या निमित्तमात्र प्रसंगानंतर दिसून येतात. परंतु हे आजाराचे मूळ कारण नसून ही आजाराची लक्षणे दिसून येण्याचे एक निमित्त ठरते.
स्किझोफ्रिनियाची लक्षणे –
विभ्रम :
बाह्य उद्दीपकाच्या अनुपस्थितीत रुग्ण व्यक्तीला उद्दीपकाचा वास्तव अनुभव येतो. दृश्य, श्राव्य, गंध, स्पर्श, रुची व दैहिक इत्यादी सर्वच प्रकारचे विभ्रमनुभव रुग्णाला जाणवतात. स्किझोफ्रिनिया असलेल्या रुग्णात विशेषतः श्राव्य अनुभव व्यापक प्रमाणात आढळतात. दृष्य विभ्रनानुभवात रुग्णाला प्रत्यक्षात उपस्थित नसलेल्या व्यक्ती, वस्तू दिसतात. काल्पनिक व्यक्तींशी ते संवाद साधतात, तर श्राव्य अनुभवात रुग्णाला धमकीचे आवाज ऐकू येतात.
भ्रांती :
वास्तवाचा कोणताही आधार नसलेल्या अनेकविध चुकीच्या समजुती (भ्रांती) स्किझोफ्रिनियाच्या रुग्णात आढळतात. अनुभवाला येणाऱ्या भ्रांती या स्थिर स्वरूपाच्या असतात व भ्रांती अनुभवतात त्यांना कोणतीही विसंगती जाणवत नाही. उदा. इतर व्यक्ती, अगदी नातेवाईक, शेजारी आपल्या वाईटावर टपलेले आहेत, ते आपल्याविरुद्ध कट-कारस्थान करीत आहेत, तसेच मी कोणी महान व्यक्ती आहे, इत्यादी. स्किझोफ्रिनिया असलेल्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या अनेक असत्य परंतु ठाम समजुती असतात.
स्किझोफ्रिनियाचे प्रकार –
विसंघटित स्किझोफ्रिनिया :
विसंघटित छिन्नमनस्क रुग्णांचे आचार, विचार आणि भावनांमध्ये खऱ्या अर्थाने विसंघटन झालेले दिसून येते; याचबरोबर अपरिपक्व-बालसदृश वर्तन, विचार, भाषा संप्रेषण इ. प्रक्रियेतील दोष, वास्तवतेशी संबंध दुरावणे, भावनिक बिघाड इ. लक्षणे दिसून येतात.
काष्ठवत स्नायू जडताजन्य स्किझोफ्रिनिया :
या प्रकारामध्ये रुग्णांचे शरीर पूर्णतः ताठर होते व रुग्ण ज्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत तासनतास तर कधी दिवसेंदिवस उभा किंवा बसून राहतो. कोणत्याही स्थितीतील रुग्ण साथ देत नाही. जडावस्थेची स्थिती काही आठवाद्यांपर्यंत देखील टिकते, त्यामुळे या स्थितीत रुग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते.
संभ्रनतीजन्य स्किझोफ्रिनिया :
या प्रकारच्या रुग्णात आत्मछळाच्या अथवा महानतेच्या भ्रांती प्रामुख्याने आढळतात. या प्रकारच्या रुग्णात आढळणाऱ्या भ्रांती सुस्थित व दीर्घकाळ टीकणाऱ्या असतात. रुग्णांमध्ये हा प्रकार सर्वाधिक दिसून येतो.
अवर्गीकृत स्किझोफ्रिनिया :
जेव्हा रुग्णात स्किझोफ्रिनियाची भ्रांती, विभ्रम, असंबद्ध संभाषण, असंघटित विचार, विलक्षण वर्तन, भावनिक बधिरता, औदासीन्य ही प्रमुख लक्षणे, वैशिष्ट्ये आढळतात; परंतु लक्षणांच्या बदलत्या स्वरूपामुळे छिन्नमनस्कतेच्या कोणत्याही एका प्रकारात रुग्णाचे वर्णन करता येत नाही. अशा संमिश्र लक्षणे दर्शविणाऱ्या अवस्थांचे स्किझोफ्रिनियाप्रकारात वर्गीकरण केले जाते.
कोणत्याही व्यक्तीमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे जर 6 अथवा 6 महिन्यांहून अधिक काळ आढळून येत असल्यास त्या व्यक्तीस ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जाणे गरजेचे असते. हा आजार कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रुग्ण व्यक्तीस औषधोपचार व समुपदेशन दोहोंची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे रुग्णाला पुढील प्रकारची लक्षणे दिसून येतात.
स्किझोफ्रेनिया ह्या आजारात दोन प्रकारची लक्षणे असतात –
पॉझिटीव्ह लक्षणे , निगेटिव्ह लक्षणे, पॉझिटीव्ह लक्षणे
पॉझिटीव्ह लक्षणे म्हणजे सकारात्मक लक्षणे नव्हे; तर ह्याचा अर्थ नसलेल्या अनुभवांचा किंवा वागण्याचा समावेश. ह्या लक्षणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भास होतात. उदाहरणार्थ आवाजाचे, दिसण्याचे, स्पर्शाचे, चवीचे किंवा वासाचे. दुसरे प्रमुख लक्षण म्हणजे भ्रम होणे. कोणी आपल्या वाईटावर आहे, पत्नीच्या चारित्र्याचा संशय, लोक आपल्याबद्दल बोलत आहेत, आपल्यावर कोणी लक्ष ठेवत आहे, करणी करत आहे, कोणीतरी आपल्यावर नियंत्रण ठेवत आहे किंवा मारायला येणार आहे !
ह्या अवस्थेत रुग्ण वास्तवापासून दूर जातो. त्याला वास्तव आणि भ्रम ह्यातील अंतर कळेनासे होते. भास व गैरसमज यामुळे पेशंटच्या वागण्यात बदल दिसून येतात. त्यामुळे तो चिडचिडा होतो, एकट्यात पुटपुटतांना दिसतो, हातवारे करतो, कारण नसतांना भांडतो, किंवा काही पेशंट घाबरून जातात, लपून राहतात, एकलकोंडे होतात, रडत राहतात.
निगेटिव्ह मनोविकाराची लक्षणे :
ज्या भावना व कार्यक्षमता सामान्य व्यक्तीमध्ये असतात त्यांचा अभाव होणे. त्यांची भावना अनुभवण्याची व व्यक्त करण्याची क्षमता कमी होते, हालचाली मंदावतात, चेहरा मठ्ठ होतो, बोलणे कमी होते. स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता कमी होते. आजारामध्ये पेशंट जसाजसा गुरफटत जातो तसे त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. स्वच्छता कमी होते. विचारांमध्ये सुसूत्रतेचा आणि तार्किकतेचा अभाव जाणवतो. विचार व कृतिची सांगड घालता येत नाही. ह्यामुळे रुग्णाचे बोलणे, वागणे विक्षिप्त स्वरूपाचे असते.
उदाहरणार्थ, विचारलेल्या प्रश्नांची वेगळीच उत्तरे देणे, पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसणे, नको तेव्हा हसणे. या आजाराच्या काही रुग्णांमध्ये आकलन क्षमता कमी होते त्यामुळे कामावर लक्ष लागणे कमी होते, विसर पडणे अश्या समस्या येतात. कॅटॅटोनिया या प्रकारामध्ये रुग्ण अगदी पुतळ्यासारखे होतात, तासंतास एकाच जागी जसेच्या तसे स्तब्ध राहतात, एकटक बघतात.
सर्वच रुग्णांना वरील सर्वच लक्षणे असतात असे नाही, नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीवरून व पेशंटच्या वागण्या बोलण्याच्या निरीक्षणावरून मानसोपचार तज्ज्ञ या आजाराचे निदान करतात. रक्त किंवा मेंदूच्या कोणत्याच तपासणीतून या आजाराचे निदान करता येऊ शकत नाही. हा आजार मेंदूतील डोपामिन नावाच्या रसायनाच्या बिघाडामुळे होतो. हा आजार होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. जनुकीय संवेदलशीलता व तणावपूर्ण घटना. दोन्ही सोबत आल्यानंतरच ह्या आजाराची सुरुवात होते. ह्या आजाराची औषधे डोपामिन नियंत्रित करण्यास मदत करतात व आजाराचे लक्षणे कमी होतात. मानसोपचार तज्ञ डॉक्टर, पेशंटची आजाराची लक्षणे व शारीरिक परिस्थिति यानुसार औषधांची निवड करतात.
लवकरात लवकर उपचार, घरच्यांची साथ, पेशंटची समजून घेण्याची तयारी यामुळे पेशंट लवकर बरा होतो. उपचाराला उशीर, कमी वयात झालेला आजार, औषधे नियमित न घेणे, समजून घेण्याची तयारी नसणे, घरच्या व्यक्तीचे चुकीचे वागणे यामुळे आजार पूर्णपणे बरा होत नाही.
गंभीर आजार असूनसुद्धा घरच्यांनी साथ दिल्यामुळे पेशंट बरा झाल्याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे राहुल. राहुल एक चांगल्या कुटुंबातील मुलगा. वडील फिझिशिअन, आई, धाकटा भाऊ आणि तो. बारावीला खूप चांगले मार्क पडले. त्याच्याकडून सर्वांना खूप अपेक्षा. त्याने इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली. पण कॉलेज सुरु झाले तसेच याला त्रास सुरु झाला. तो चिडचिड करायचा, एकटा बसायचा, कोणाशीही बोलत नसे, स्वतःशीच हसायचा, आंघोळ करत नसे. आई मागे लागली की, तो तिला मारायचा. वडील परदेशात नोकरी निमित्त असत. त्याला घरात ठेवणं अशक्य व्हायला लागलं.
वडील सुट्टीवर आले आणि उपचारासाठी त्याला भरती केलं. पण आपला मुलगा असा आहे ही गोष्ट त्यांना सहन होत नसे. त्यांना अपराध्यासारखा वाटायला लागल. भावनेच्या भरात ते त्याची प्रत्येक मागणी पुरवीत असत. तो औषध घेणार नाही म्हणाला की, ते ऐकत. घ्यायची म्हणलं की, लागलीच देत. त्याचे उपचार त्याच्या मर्जीने होत असत! शेवटी कितीही प्रेम असले तरी थोड कठोर पण होणं गरजेचं आहे. त्याला योग्य असा पाठिंबा न मिळाल्याने त्याचा आजार आणखीन बळावत गेला. ते अजूनच खचून गेले.
शेवटी त्यांना खूप दिवस काऊन्सेलिंग केल्यावर ते सावरले. सर्व कुटुंबाला एकत्र येऊन राहुलच्या उपचारामध्ये भाग घेण्यास प्रेरित केले. ही जवाबदारी वाटली गेल्यामुळे त्यांना त्या परिस्थितीचा सामना करायला सोपे झाले. ते आळीपाळीने त्याची जबाबदारी घ्यायला लागले. साहजिकच त्याच्यात बदल व्हायला लागला. तो शांत झाला, मिळून मिसळून राहायला लागला, गप्पा गोष्टी करू लागला. एखादी छोटीशी नोकरी करण्याचा पण त्याने विचार केला आहे. त्याच्या याही निर्णयाला घरच्यांचा पाठींबा आहे.
- पेशंटशी वागताना काय काळजी घ्यावी?
- पतो स्वत: त्रासात आहे हे समजून घ्यावे
- पलवकरात लवकर औषधोपचार सुरू करावे
- पऔषधे स्वत: पेशंटला द्यावी.
- पपेशंट चिडला असेल तर स्वत: शांत रहावे
- पभास खरे किंवा खोटे आहे म्हणण्यापेक्षा त्याला त्रास होतो आहे व आपण त्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करू असे समजवावे.
- पलक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी कराव्यात.
- पएका वेळेस एकानेच बोलावे. वाक्य सोपी व सुटसुटीत ठेवावी.
- पशक्यतो न ओरडता, न टीका करता बसून बोलावे
- परुग्णाने केलेल्या दोषारोपांचे वाईट वाटून घेऊ नये
- पत्याच्यावर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या सोपवून योग्य तेव्हा कौतुक करावे व प्रोत्साहन द्यावे
- पअंधश्रद्धेला बळी पडू नये
- पलोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करावे. उपचारास उशीर झाल्यास आजार नियंत्रणा बाहेर जाऊ शकतो.
हे समजून घ्या :
प स्किझोफ्रेनियाचे पेशंट हे धोकादायक नसतात. बहुतांश रुग्ण सामान्यपणे काम करू शकतात. बऱ्याचवेळ सांगितल्याशिवाय त्याना काही आजार आहे असे कळत पण नाही. हा आजार कोणालाही होऊ शकतो, समाजात असे अनेक प्रसिद्ध व्यक्ती, डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक आहेत ज्यांना हा आजार आहे.
प शंभरातील एका व्यक्तिला हा आजार असतोच.