नुकताच जागतिक महिला दिन संपन्न झाला. अनेक क्षेत्रातील महिलांना वेगवेगळ्या व्यासपेठ्यांवर गौरवण्यातही आले. मात्र, आपण खरेच स्त्रियांना दररोज जर सन्मान देत असू, तर वेगळा महिला दिन साजरा करण्याचे गरज तरी आहे का, हा प्रश्न मात्र कोणाला पडत नाही. याचाच अर्थ आपण स्त्रियांना दैनंदिन जीवनात योग्यस तो मान देत नाही, असाच होतो.
8 मार्च जागतिक महिला दिन स्त्रियांचा सन्मान करण्याचा दिवस. स्त्री म्हणजे शक्ती. स्त्री म्हणजे देवीचं रूप. मनात आलं आणि तिनी ठरवलं, तर तिला हवं ते ती करू शकते. सध्याच्या या युगात जवळपास प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, लढून यश मिळवतीये. तिचा सन्मान झालाच पाहिजे. पण फक्त या एकाच दिवशी? असं का?
पूर्वी स्त्रियांना खूपच कमी लेखलं जायचं, त्यांना काही कळणार नाही, त्यांना काही जमणार नाही, त्यांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे, कर्तृत्वाचे काम फक्त पुरुषांनीच करावे. किंवा कर्तृत्व फक्त पुरुषच गाजवू शकतात असे एक ना अनेक आरोप करू स्त्रियांना घरातच बसवलं गेलं. पण अनेक महिलांनी या पुरुषप्रधान सत्तेच्या विरुद्ध पोहत, आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि आता संपूर्ण जगात चित्र पालटलं अनेक स्त्रियांनी एकमेकीकडे पहात उंच भरारी घेतली आणि एक-एक क्षेत्र करत त्या सर्वच क्षेत्रात धडाडीने काम करताना दिसत आहेत. मोठमोठी आव्हानं सहज पेलताना आणि यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहेत. स्त्रिया हे सर्व करत असल्या तरी आपल्या समाजातल्या घाणेरड्या पुरुष वृत्तीमुळे त्या अजूनही सुरक्षित होऊ शकलेल्या नाहीत.
पुरुषांच्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या, त्यांच्या मनातल्या विकृत वासनेच्या त्या आजही शिकार ठरत आहेत. आजही हजारो अल्पवयीन, मोठ्या मुलींना हा पुरुषांच्या विकृतीमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. आपली स्वप्नं मोडावी लागली आहेत. अनेक घरे, स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत. पण तरी स्त्रीमागे हटलेली नाही.
आपल्या समाजातली ही घाणेरडी वृत्ती दूर करायची असेल. स्त्रीचा खरंच सन्मान करायला शिकवायचं असेल तर त्याची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून होणे फार गरजेचे आहे. प्रत्येक घरातल्या मोठ्यांनी आपल्या घरातील मुला-मुलींना एकमेकांचा सन्मान करण्याचे धडे मुलांना लहानपणापासूनच द्यायला हवेत. घरातल्या स्त्रीकडे त्यांना आदराने पहायला शिकवले पाहिजे. स्त्री कमकुवत नसून, मनोरंजनाचे साधन नसून आपल्या इच्छा भागवणारी नसून ती एक शक्ती आहे. हे बाळकडूच त्यांना मिलायला हवे. हे सोपे किंवा सहज होणारे बदल नाहीत हे मान्य असले तरी हे अशक्य नाही. असे आपण निश्चित म्हणू शकलो. मुलं वयात आली की त्यांना विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणारच हा निसर्ग नियम आहे.
तो आपण बदलू शकत नाही. पण या वयात येण्याच्या वेळातच जर आपण त्यांच्या मनात स्त्री, तिचे शरीर तिची ताकद याबबात सकारात्मक विचार दृढ करू शकलो तर निदान रोज घडणाऱ्या घाणेरड्या घटनांमधील काही घटना तरी टाळता येतील. घरातल्या आणि आसपासच्या महिलांकडे आदराने पाहायला शिकवले तर निदान त्यांच्या पुढे जाऊन निर्माण होणाऱ्या वासना तरी टाळता येतील.
आपण हा प्रयत्न केला तरी समाज मात्र सगळे विकृत आणि घाणेरडे शिकवणारा एक मोठा भाग आहे. तो आपण आयुष्यतून बाजूला काढू शकत नाही. समाज आणि मिडीया या दोन्हीवर आपले नियंत्रण नाही पण या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या देशात प्रत्येकजण स्वतःपुरते काही नियम, अटी घालू शकतो.
प्रत्येक पुरुषाने स्वतःपुरते जरी इतके ठरवले की, बलात्कारासारख्या घाणेरड्या कृत्यात मी सहभागी होणार नाही. मी कोणाकडे वाकड्या, सुडाच्या, वासनेच्या नजरेतून पाहणार नाही. तरी अनेक विकृत घटना टळू शकतात. या स्त्री दिनाच्या निमित्ताने सर्वच पुरुषांना आव्हान करावेसे वाटते की स्त्रिया मनोरंजनाचे साधन नाहीत. त्यांचे शरीर तुमच्या वासना पूर्ण करण्यासाठी नाही तर त्यांची ताकद समाजातील निखळत चाललेले चाक सांभाळणारी आहे. स्त्री-पुरुष समानता जपणारी आहे. स्त्रीचा गर्भ मारून टाकणे आणि स्त्रियांवरचे अत्याचार यामुळेच स्त्रियांची संख्या कमी होत चालली आहे.
समाज नीट चालायला हवा असेल, पूर्वांपार चालता अलेली विवाह संस्था टिकायला हवी असेल. स्त्री-पुरुष ही समाजाची दोन्ही चाकं समान पुढे जायला हवी असतील तर आपल्या समाजातील ही विकृत मनोवृत्ती मुळासकट उपटून काढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे केवळ 8 मार्चला स्त्री शक्तीचा सन्मान करण्यापेक्षा तो कायमस्वरूपी, आयुष्यभर करण्याचा निश्चय करा.
– मानसी तांबे-चांदोरीकर