आई तू जरा बावळट आहेस का? तुला एवढं पण नाही जमत. आण इकडं मी बाबांकडून करून घेतो,’ केतनच्या बाबांनी हे वाक्य ऐकलं आणि ते केतनला खूप रागावले. अवघ्या 3 वर्षांच्या आपल्या मुलाने त्याच्या आईला “बावळट’ म्हणावे हे त्यांना अजिबात सहन झाले नाही. बिचाऱ्या केतननी त्यासाठी एक-दोन फटकेही खाल्ले. आपलं नक्की काय चुकलं हेच त्याला कळलं नाही, पण बाबांच्या मात्र लक्षात आलं, की काय घडलंय.
खरं तर या साऱ्या प्रकारात छोट्या केतनची चूक नव्हतीच केतनच्या घरातच त्याच्या मोठ्या बहिणीकडून आणि कधी कधी बाबांकडून “बावळट’ हा शब्द वापरला जायचा. केतननी म्हणूनच तो शब्द वापरला. या शब्दाचा नक्की अर्थ त्यालाही माहीत नव्हता, पण काही चुकलं की बावळट म्हणतात. हे त्याला कळलं होतं. हे लक्षात आल्यावर वडिलांनी प्रथम स्वतः हा शब्द न वापरण्याचे ठरवले व त्यांच्या ताईलाही हे समजावून सांगितले. बिचारा केतन. त्याने मधल्यामध्ये उगाच बोलणी खाल्ली.
पालक मित्रांनो, असे काही प्रसंग तुमच्याही अनुभवाला येत असतील ना? प्रामुख्याने ज्यांची मुलं छोटी आहेत. छोटी म्हणजे 1 वर्ष ते 9-10 वर्षांपर्यंत यामागचं खरं कारण जाणून घेऊया. मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हापासून ते साधारण 9-10 वर्षांपर्यंत मुलं सर्वाधिक गोष्टी या निरीक्षणातून शिकत असतात.
तान्हं बाळ रांगणे, उभं राहणं, चालणं, बोलणं सगळं सगळं निरीक्षणातून शिकत असतं. ते शाळेत जायला लागेपर्यंत म्हणजे साधारण दोन-अडीच वर्ष त्याचं कुटुंब हेच त्याचं जग असतं. म्हणजे त्याचे आई, वडील, भावंडं, आजी, आजोबा जे कोणी असेल तेवढंच त्याचं विश्व असतं. त्यामुळे अर्थातच प्रत्येक गोष्ट ते याच सदस्यांची पाहून, ऐकून शिकत असतं.
या पहिल्या विश्वात त्यांना जे शिकायला, अनुभवायला मिळतं त्यावरच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया तयार होत असतो. कारण पहिल्या 9-10 वर्षांतच आपल्या मेंदूची सगळ्यात जास्त म्हणजे अंदाजे 70 ते 80% विकास होतो आणि तोही खूप वेगाने.
जर या विकासात सुरुवातीलाच त्याला असे अनुभव मिळाले तर त्यांचा विकास त्याच पद्धतीने होतो. म्हणूनच तर असं म्हणतात की, एखादा गुन्हेगार हा अट्टल गुन्हेगार का झाला याची पाळंमुळं खणून काढली तर ती त्याच्या बालपणात सापडतात.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातली पहिली 9 ते 10 वर्षे यासाठीच खूप महत्त्वाची असतात. या वयात जर मुलांना खूप वाईट अनुभव जसे सतत मारहाण, शिक्षा, रागावणे, अपशब्दांचा वापर करणे, त्यांना सतत कमी लेखणे, दुर्लक्ष करणे, त्यांना वेळ न देणे असे अनुभव आले तर अशी मुले पुढे जाऊन मित्र, निर्णय क्षमता नसणारी, आपली मते नसणारी, मित्र-मैत्रिणी नसणारी, एकलकोंडी अशी होत जातात.
नंतर ही मुलं कितीही मोठी झाली तर समस्या सोडवणे यांना जमत नाही. यांना सतत दुसऱ्याच्या आधाराची, मदतीची गरज भासतच राहते, पण या उलट मुलांना घरात चांगले वातावरण मिळाले, पालकांनी मुलांना चांगला वेळ दिला, चांगल्या-वाईटाची ओळख करून दिली, त्यांना वेगवेगळे अनुभव दिले, त्यांच्याशी भरपूर संवाद साधला, त्यांचे विचार, भावना व्यक्त करण्यास मदत केली, बक्षीस-शिक्षा तंत्राचा योग्य वापर केला, अतिलाड न करता त्यांना प्रेमाचे, आनंदाचे, हसते-खेळते वातावरण उपलब्ध करून दिले तर अशी मुले आयुष्याकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहू शकतात. त्यांच्याकडे निर्णय क्षमता, समस्या सोडवणे, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहणे, कोणत्याही अडचणीत कणखरपणे उभे राहणे या क्षमता आपोआप विकसित होतात. कारण त्यांचा मेंदू सकारात्मक क्षमता घेऊन विकसित झालेला असतो.
म्हणूनच असेल कदाचित मोठी माणसं नेहमी म्हणतात की ‘आई-बाबा होणे सोपे नाही’ खरंच चांगले पालक होण्यासाठी हे कष्ट घेण्याला मुलांना जास्तीत जास्त चांगले अनुभव द्यायला पर्याय नाही आणि हे करत असताना प्रत्येक मुल हे वेगळेच असते हेही महत्त्वाचे विसरून चालणार नाही. पालक मित्रहो, तुम्हाला जर तुमच्या मुलाला देशाचा एक नागरिक आणि एक सुंदर व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती बनवायचे असेल तर त्याच्या आयुष्यातली ही सुरुवातीची वर्ष गमावू नका, काम आणि पैसा यांच्या मागे धावण्याच्या नादात त्यांना दुर्लक्षित करू नका, त्यांना खूप वेळ देण्यापेक्षा जो वेळ देताय तो जास्तीत जास्त चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करा.
असं म्हणतात ना, की प्रत्येक मुल मातीचा गोळा असतं. तुम्ही त्याला जो आकार द्याल तसं ते घडतं. मग या आपल्या मातीच्या गोळ्याला असा आकार या सुरुवातीच्या काळातच द्या की नंतर चिंता करण्याची वेळच येणार नाही. बालमानसशास्त्र हे अशाच संकल्पनांवर आधारित असून बालकाच्या विकासाच्या टप्प्यात खूप कळजी घ्यावी लागते, हे केतनच्या या उदाहरणावरून सहजच स्पष्ट होते. मुले मोठ्यांचे अनुकरण करत असतात, पण घरातल्या मोठ्यांना ते सहजपणे उमगत नसते. मग कधीतरी असे केतनसारखे हे अनुकरण जनरेसमोर येते. म्हणून आपण आधी काळजी घ्या आणि मगच आपल्या लहानग्यांकडून नीट वागण्याची अपेक्षा करा.
पुढील काही लेखांमध्ये आपण या विषयांवरील केसेसदेखील पाहू. पण सध्या आपल्या मुलांबरोबरचा वेळ सकारात्मक आणि छान घालवुया.
– मानसी तांबे-चांदोरीकर