1) “काय तुझी कटकट आहे गं! मला काय माझे व्याप कमी आहेत का? म्हणून तुझं ऐकून घेत बसू. तुझं तु बघ.’
2) “कसा रे सोहम तू असा वेंधळा आज परीक्षा आहे. कुठे ठेवलंस तुझं हॉल तिकीट. आता मी हॉल तिकीट शोधू, घरातलं काम करू की ऑफिसला जाऊ? किती टेन्शन देता रे!’
असे एक ना अनेक संवाद आपल्याला प्रत्येक घरातून ऐकू येत असतात. “टेन्शन’ हा शब्द तर प्रत्येकाच्या तोंडी असतोच. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कसलं ना कसलं टेन्शन असतंच. खरंच आजच्या आपल्या धकाधकीच्या, धावपळीच्या, स्पर्धेच्या जगाचा विचार केला तर तर घरी, ऑफिसमध्ये नात्यांमध्ये सतत किती तणावाखाली आपण जगत असतो नाही. कारण आपल्याला प्रत्येकच आघाडीवर लढायचं असतं आणि टिकायचंही असतं.
एकाचवेळी एवढ्या दगडांवर पाय ठेवायचे, म्हणजे अगदी तारेवरची कसरत असते आणि ती प्रत्येकाला करावीच लागते. ही कसरत करताना एका जरी गोष्टीवरचा पाय निसटला तर मग मात्र खूप ताणाला सामोरं जावं लागतं. मग ते ऑफिस असो की घर.
या प्रत्येक गोष्टीतला ताण सांभाळून, तोल ढासळू न देता लढणं हे कौशल्य आत्मसात करावंच लागतं. हेही एक मोठं टेंशन नाही का हो मंडळी?
आपल्या सध्याच्या आयुष्यात खरंच प्रत्येक क्षेत्रात खूप स्पर्धा असतात. ज्यांना आपल्याला सामोरं जावंच लागतं. हे सामोरं जाताना धीर खचू न देणं हे दुसरं आव्हान. पण आपण जर हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न केला तर येणाऱ्या ताणावर निश्चित नियंत्रण मिळवू शकतो. जर वेळेचं नियोजन केलं, कोणता वेळ नक्की कोणाला, कधी आणि किती द्यायचा हे आपल्याला ठरवता यायला हवं.
म्हणजे सकाळचा वेळ स्वतःला, नंतरचा वेळ ऑफिस किंवा कामांना आणि संध्याकाळचा निदान थोडा वेळ तरी आपल्या कुटुंबाला, आपल्या जवळच्या व्यक्तींना. अशी थोडी वेळेची ढोबळ विभागणी केली तर कदाचित आपला ताण कमी होऊ शकतो.
अर्थात ही विभागणी प्रत्येकाने आपली आपण आपल्या वेळेनुसार करावी आता तुम्ही म्हणाल हे काय इतकं सोपं आहे का? असं ठरवलं आणि झाली विभागणी असं होतं का? खरंय तुमचं! असं ठरवलं आणि झालं इतक हे सोपं नाही. पण असं सोपं नाही तसंच ते अशक्यही नाही. सुरुवातीला अवघड जाईल कदाचित; पण नंतर हळूहळू जमेल. जर सगळ्याच आघाड्यांवर लढायचं आहे तर एवढं तर करावंच लागेल.
मित्र-मैत्रिणींनो फक्त पैशांच्या प्रतिष्ठेच्या मागे मागे धावण्यात काय अर्थ आहे. मिळवलेला पैसा प्रतिष्ठा याचा उपभोगही योग्य तो घेता यायला हवा ना? नाहीतर इकडे पैसा कमवायचा आणि तिकडे गोळ्या, औषध, डॉक्टर यावर गमवायचा. मग काय अर्थ उरला?
या ताणतणावामुळेच माणसाचं आयुष्यमान कमी कमी होत चाललं आहे. 25-30 वर्षांच्या तरुणांना हृदय विकाराचे अगदी तीव्र झटके आल्याच्या बातम्या सर्रास ऐकायला यायला लागल्यात. वेगवेगळे दुर्धर आजार लहान लहान वयात जडताना दिसायला लागलेत. पैसा, प्रतिष्ठा या बदल्यात आपल्याला नक्की काय हवंय याचाच विचार कोणी करत नाहीत.
खूप ताण घेऊन खूप काम करून. खूप पैसा मिळवला आणि दुर्दैवाने अचानक आयुष्यच संपून गेलं तर?
पैसा कमावला आणि कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडला तर?
एखादी व्यक्त डिप्रेशनची पेशंट झाली तर?
काय अर्थ आहे पैशाला आणि अशा आयुष्याला?
मित्र-मैत्रिणींनो खरंच स्वतःला एकदा वेळ द्या?
आपल्याला नक्की किती आणि काय साध्य करायचंय ते ठरवा. त्यासाठी छोट्या-छोट्या ध्येय्यांपासून सुरुवात करा. कितीही ताण असला तरी स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या आवडी निवडी जपा, स्वतःचे छंद जोपासा, नाती जपा नाहीतर आपल्याला मिळालेलं आयुष्य असंच वाया जाईल. उतारवयात मागे वळून पाहताना मात्र मग असं वाटेल की ताण-तणावात घालवलेल्या आयुष्यात स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं. आणि मग पश्चाताप करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरणार नाही.
– मानसी तांबे-चांदोरीकर