अर्जुनला घेऊन त्याचा मित्र भेटायला आला. त्याने स्वतःची व अर्जुनची ओळख करून दिली. अर्जुना मित्र म्हणजे समीर आणि अर्जुन स्वतः दोघं एका आय.टी. कंपनीत काम करत होते. दोघांची बरीच जुनी मैत्री होती. दोघं एकमेकांचे अगदी घट्ट मित्र होते. सुदैवाने त्यांना नोकरीही एकाच कंपनीत मिळाली.
“अर्जुन तसाही पहिल्यापासून शांत मुलगा आहे. कधी कोणाशी स्वतःहून वाद घालणार नाही; चिडणार नाही. कंपनीतही एक चांगला काम करणारा प्रामाणिक मुलगा म्हणून त्याचा सत्कार झाला आहे. आम्ही दोघं एकमेकांचे खूप चांगले आणि जवळचे मित्र आहोत. त्याला कंपनीकडून दोन महिन्यांच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आहे.
“खरं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अशी संधी आमच्या कंपनीत फारच थोड्याजणांना मिळाली आहे. त्याला या कामासाठी दोन-तीन महिन्यांनी जायचं आहे. पण हा म्हणतो की मी काही अमेरिकेला जाणार नाही. मी अमेरिकेला गेलो तर इथे खूप समस्या निर्माण होतील. मी खूप समजावलं, पण हा माझं काही ऐकत नाही. म्हणून याला तुमच्याकडे घेऊन आलोय.’
एवढं बोलून समीर थांबला. मग पर्यायानं अर्जुनशी संवाद साधण्यास सुरुवात केली. अर्जुन या संधीचा लाभ घेण्यास का तयार नाही हे जाणून घेण्याच्या दृष्टीने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण तो फारसा मोकळेपणाने बोलला नाही. त्याला स्वतःची समस्या सांगताना अवघडल्यासारखे होत असावे. त्यामुळेच तो या सत्रात फारसा बोलला नाही. त्यामुळे पुढील सत्र निश्चित करून त्या सत्रात त्याचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
या सत्रात अर्जुनने स्वतःची समस्या सांगितली. अर्जुनच्या घरात त्याची आई व बायको यांचे अजिबात पटत नव्हते. आईचा स्वभाव खूपच तापट असल्याने आई सतत त्याच्या पत्नीला बोलायची, रागवायची त्यामुळे दोघींमध्ये सतत वाद व्हायचे. अर्जुनच्या बायकोचा स्वभावही आधी शांत होता पण आता या सततच्या वाद-विवादांमुळे तिचा स्वभावदेखील चिडचिडा झाला होता. ती पण अर्जुनच्या आईबरोबर वाद घालायची. त्यांचं हे सततच बोलणं तिला अजिबात सहन होत नव्हतं. त्यामुळे तीही त्यांना तोडून बोलायची, उलट उत्तर द्यायची. या कारणामुळे घरात सतत गंभीर वातावरण असायचे.
ऑफिसमधून दररोज अर्जुन घरी पोचला की त्याला हेच दृष्य पाहायला मिळायचे. रोज घरी गेलं की त्याला या तणावपूर्ण वातावरणाला सामोरे जावे लागायचे. दोघींना शांत करावे लागायचे. असे करत तो कसेबसे रोज दिवस ढकलत होता. आपण अमेरिकेला गेलो तर ही समस्या अधिक गंभीर होईल आणि हाताबाहेर जाईल अशी भीती त्याला सतत वाटत होती. म्हणूनच तो जाण्यासाठी तयार नव्हता. आपला संसार मोडेल अशी भीती त्याला वाटत होती.
अर्जुनशी बोलताना व इतर माहिती घेताना असं लक्षात आलं की अर्जुनच्या आईला कामात कोणी मदतीला आलेलं लुडबूड केलेली आवडत नव्हती. त्याबाबतीत ती कोणाचंही ऐकत नव्हती आणि अर्जुनच्या बायकोला त्याच्यासाठी काहीतरी करायचं असायचं.
याच कारणांवरून, स्वच्छतेवरून, घरातल्या इतर कारणांवरून त्यांच्यात वाद व्हायचे. असं असलं तरी अर्जुनची बायको शांत व समजूतदार होती. त्यामुळे तिला पुढील सत्रात भेटायचे ठरले. ठरल्याप्रमाणे ती भेटायला आलीदेखील! तिच्याशी संवाद साधल्यावर आणखी काही समस्या लक्षात आल्या. या समस्या कशा सोडवता येतील; अर्जुनच्या पत्नीने वागण्यात कोणते बदल करावेत, म्हणजे घरातील वाद टाळता येतील याबाबत चर्चा झाली.
अर्जुनच्या आईचा स्वभाव या वयात बदलणं खूपच अवघड होतं. त्यामुळे हे बदल अर्जुन व त्याच्या पत्नीने करण्याचेच त्या दोघांनी स्वतःहून ठरवलं. ठरल्याप्रमाणे अर्जुनच्या पत्नीने खूपच चांगले प्रयत्न केले त्यामुळे अर्जुनच्या आईच्या स्वभावातही हळूहळू आपोआप थोडा का होईना पण बदलला. त्यामुळे दोघींमधील वाद थोडे कमी झाले.
त्यानंतर अर्जुनने अमेरिकेला जाण्याचा आपला निर्णय दोघींना सांगितला. दोघींनाही त्याचा हा निर्णय खूप आवडला आणि तो आनंदाने अमेरिकेला गेला. दोघींमधील वादविवाद कमी झाल्याने त्याही दोघी आनंदाने राहिल्या. त्यामुळे अर्जुनच्या मनातली भीती दूर झाली व तिघेही आनंदी झाले.
– मानसी तांबे चांदोरीकर