“प्रेम!’ हा शब्द उच्चारला की आपल्याला मनात पहिलं काय येतं हो? “एक मुलगा आणि एक मुलगी.’ खरं ना? हीच आपली पहिली प्रतिक्रिया किंवा विचार असतो. एक मुलगा-मुलगी एकत्र चालत, गाडीवरून जाताना दिसले की मनात येणारा पहिला विचार हाच असतो आणि आपण याला “लफडं’ असं नाव देतो आणि मोकळे होतो. याशिवाय कोणताच विचार आपण करत नाही किंवा करू शकत नाही.
अर्थात यात सर्वस्वी दोष आपलाच आहे असं म्हणून चालणार नाही कारण बदलत चाललेला समाज, संस्कृती हे याला कारणीभूत आहेत. पाश्चात्य संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवर, तरुणाईवर पडलेला विचित्र आणि अपुरा, अयोग्य प्रभाव ही या मागची प्रमुख कारणं! या साऱ्यामुळे प्रेमाची त्याच्या संकुचित, घाणेरडी होत चालली आहे. जी भावना अखंड जग व्यापणारी आहे त्याचा आता प्रत्येकजण फक्त स्वतःपुरता विचार करू लागला आहे. त्यामुळेच ही व्याख्या संकुचित होत चालली आहे.
खरं सांगा मित्र-मैत्रिणींनो “प्रेम’ असा शब्द ऐकल्यावर ऊर्जा, उत्साह, आनंद, समाधान हे शब्द आपल्या मनात तरी येतात का? खरंतर जशी “राग’ ही भावना प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्तच प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातली अविभाज्य भावना आहे. प्रेमाशिवाय कोणाचंच आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. पण त्याचा संकुचित अर्थ घेऊ नका. आयुष्यात आपण क्षणाक्षणाला प्रेम अनुभवत असतो. लहान बाळावर आईचं, नवरा-बायकोचं एकमेकांवर असणारं, आजीचं नातवंडांवर असणारं, बहीण-भावाचं एकमेकांवर असणारं, मित्र-मैत्रिणींचं एकमेकांवर असणार, काहींचं तर प्राणी-पक्ष्यांवरही असणारं हे प्रेमच असतं ना? या सर्व नात्यांना बांधून ठेवणारी एक मजबूत भावना म्हणजे प्रेमच ना? की या भावनेला काही वेगळं नाव द्यायचं? नाही ना. या प्रेमावरच तर अख्खं जग चालतं.
खरंच हे प्रेम खूप ऊर्जा देणारं, लढण्याचं बळ देणारं, आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी बनवणारं असतं. या जगात माझ्यावर प्रेम करणारं कोणी आहे ही भावनाच खूप सुंदर असते. आपल्या आयुष्यातल्या वाईट प्रसंगात उभं राहण्याचं बळही हे प्रेमच असतं. या भावनेचा खरा अर्थ हा आहे, पण सध्या मात्र हे प्रेम निर्मळ कमी आणि डागाळलेलंच जास्त पाहायला मिळतं. निर्मळ प्रेमापेक्षा विकृत प्रेमच आजूबाजूला दिसतं. त्यात प्रेम कमी आणि वासनाच जास्त असते.
खरं तर या प्रेम भावनेला खूप सुंदर कंगोरे आहेत. विश्वास, आपलेपणा, हक्क, अनेक संकटांशी लढण्याचं बळ आपल्याला रोज नव्यानी जगण्याची ऊर्जा हे सारं सारं या प्रेमात असतं. खरंच किती सुंदर भावना आहे ना ही आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी. समुपदेशक म्हणून केसेस हाताळताना खूपदा बऱ्याचशा केसेसमध्ये असं लक्षात येतं की, या प्रेमाच्या अभावामुळेच अनेक भावनेचा अनुभव भरभरून घेता न येण्याने घटस्फोट वाढत चाललेत. नाती दुरावत चाललीयेत. माणसं एकटी पडायला लागलीयेत. निराशेच्या गर्तेत जायला लागलीयेत. प्रत्येकालाच कुठे ना कुठे प्रेमाचा अभाव जाणवतो.
मित्र-मैत्रिणींनो समाजात काय चाललं आहे, ते थोडं बाजूला ठेवून आपण स्वतःपुरता विचार करुया का? म्हणजे समाजाच्या प्रेमाच्या संकल्पनेचा चष्मा लावून फिरण्यापेक्षा आपण प्रेमाचा संकुचित अर्थ न काढता आपल्यापुरतं प्रेमानं जग जिंकता येतं का ते पाहुयात का? म्हणजे आपण कितीही “बिझी’ असलो तरी थोडा वेळ आपल्या कुटुंबाला देऊयात. घरातल्या प्रत्येक सदस्याशी प्रेमाने वागुया. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधुया. आपलं निरपेक्ष प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना जगण्याचं बळ देऊया. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर छान वेळ घालवुया. आपली आवड-निवड जपत स्वतःवरचं प्रेमही बळकट करुया. आपल्याला शक्य असेल तेवढ्यांना आपल्या प्रेमाचा आधार देऊया.
आपलं प्रेम संकुचित राहणार नाही याची काळजी घेऊया. प्रत्येकाने आपल्यापुरतं जरी असं ठरवलं आणि वागलं, तर अनेक समस्या आपोआप सुटतील. अनेक नाती, अनेक मनं पुन्हा नव्याने जुळतील. लांब गेलेली आपली माणसं पुन्हा जवळ येतील. आपलं आयुष्य प्रेमाने उजळून निघेल. जगण्याचा कितीतरी मोठा आत्मविश्वास ते तुम्हा मिळवून देईल, चला तर मग निखळ, निःस्वार्थी, निरपेक्ष प्रेम देण्याचा आज निश्चय करुया.
मानसी तांबे-चांदोरीकर