रुपाली तिच्या नवऱ्यासोबत स्वतःहून भेटायला आली. आल्यावर दोघं बसले व रूपालीने दोघांची ओळख करून दिली. रूपाली आणि तिचा नवरा दोघेही आयटीमध्ये काम करायचे. पण पहिली मुलगी झाल्यावर रूपालीने काही महिने म्हणजे जवळ जवळ वर्षभर नोकरी सोडली होती. त्यानंतर तिने पुन्हा नोकरी सुरू केली. त्यांची पहिली मुलगी 3 वर्षांची झाल्यावर त्यांनी पुन्हा दुसऱ्या मुलाचा विचार केला. त्यांचा दुसरा मुलगा सहा महिन्याचा होता. सध्या तो लहान असल्यामुळे रूपालीनी पुन्हा एक वर्षाची गॅप जॉबमध्ये घेतली होती. रुपालीचा नवरा सकाळी लवकर ऑफिसला जायचा पण त्याला यायला मात्र बराच उशिर व्हायचा. रुपाली त्यांच्या सासू-सासऱ्यांबरोबर रहात असल्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळायची तशी काही काळजी नव्हती.
ते दोघे त्यांच्या मोठ्या मुलीसंदर्भात म्हणजे श्रावणी संदर्भात बोलायला आले होते. “आमची श्रावणी तशी शहाणी आणि शांत आहे. तिला दंगा करायला, गप्पा मारायला खूप आवडतात. तिला आम्ही शाळेत घातलंय. ती रोज घरी आली की खूप गप्पा मारते. कधी कधी तर तिला शांत बसवावं लागतं. खूप गोड आहे. सगळ्यांची फार लाडकी. बाबांबरोबर दंगा करायला तिला फारच म्हणजे पारच आवडतं. पण गेले तीन-चार महिने मात्र श्रावणी फारच वेगळी आणि चिडचिडी झालीये. घरी कोणाशीच नीट वागत नाही. एकटी एकटी बसून असते. तिला कोणाशीच बोलायचं नसतं. तिला काही विचारलं की चिडून उत्तरं देते.
शाळेतही आज-काल ती खूप चिडचिड करायला लागलीये. वर्गात मुलांशी भांडते वस्तू हिसकावून घेते. अशी तक्रार सारखी तिच्या शाळेतून यायला लागलीये. काय करावं आम्हाला काही सुचत नाही. घरी तिच्याशी बोलण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. पण आम्हाला काही समजत नाही. आम्ही शाळेत तिच्या बाईंशीही बोललो. त्यांनीच आम्हाला तिला समुपदेशनासाठी घेऊन जाण्याबाबत सुचवलं. म्हणून आम्ही आलो. तिची घरातली चिडचिड पण खूप वाढत चाललीये. राग आला की वस्तू फेकते. ओरडत ओरडत रडते. बाबांना घट्ट धरून ठेवते.
त्यांना सोडायला अजिबात तयार नसते. बाळाशी खेळायला बोलावलं तर अजिबात खेळत नाही. तिला बाळाजवळ बोलावलं की दोन मिनिट येते आणि निघून जाते. बाळाशी खेळायला तिला फारसं आवडत नाही. हल्ली आजी-आजोबांकडे खूप हट्ट करायला शिकलीये. एखादी वस्तू धिंगाणा घालत आजी-आजोबांना बाळाला घेतलं की तिला नाही आवडत. काय झालंय काही समजत नाही.फफ एवढं बोलून दोघं थांबले.
त्यांच्या बोलण्यातूनच छोट्या श्रावणीच्या समस्येचा अंदाज आला होता. पण तरी इतर काही महत्त्वाची माहिती घेऊन हे सत्र थांबवलं व पुढील सत्रात श्रावणीला घेऊन येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे ते पुढच्या सत्रास श्रावणीला घेऊन आले. छोटीशी श्रावणी खुर्चीवर बसल्यावर तिच्याशी गप्पांच्या स्वरूपात संवाद साधायचा प्रयत्न केला. पण अर्थातच फारशी ओळख नसल्याने ती या सत्रात शांतच होती.
सगळ्या प्रश्नांची उत्तरे ती देत नव्हती. ती घाबरलीही आणि लाजतही होती. त्यामुळे हे सत्र थांबवून पुढच्या सत्राची तारीख निश्चित केली. या सत्रातही श्रावणी फारसं बोलली नाही. त्यामुळे पुढच्या सत्रांमध्ये तिला काही मानसशास्त्रीय चाचण्या दिल्या. ज्यामध्ये चित्रातून तिची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ती त्या चित्रातून लक्षातही आली.
घरात श्रावणी असताना घरातले सगळे म्हणजे आई-बाबा, आजी-आजोबा सगळ्यांनीच तिचे खूप लाड केले. सगळ्यांचं तिच्याकडेच लक्ष असायचं. पण घरात नवीन बाळ आल्यावर मात्र तिच्याकडे दिले. कमी वेळ मिळू लागला. आपल्या प्रेमात आलेल्या वाटेकऱ्याला स्वीकारणं छोट्या श्रावणीला अवघड जात होतं. इतरांनी बाळाला दिलेला वेळ तिला फारसं आवडत नव्हतं आणि राग येत होता. जो हट्टातून, बाबांना धरून ठेवण्यातून आणि इतर वर्तन समस्यातून व्यक्त होत होता.
ही समस्या लक्षात आल्यावर तिच्या आई-वडिलांना याची कल्पना देऊन यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. तिला या बदलाला सामोरे जाण्यासाठी किंवा बाळाला स्वीकारण्यासाठी काय बदल करायचे याबातही त्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केल्यानंतर श्रावणीच्या या समस्या हळूहळू सुटत गेल्या आणि भावाचाही खूप छान प्रकारे स्वीकारलं. (केसमधील नावे बदलली आहेत.)
– मानसी तांबे चांदोरीकर