प्रसंग पहिला –
हॅलो बाबा येताना मला रिमोटची नवीन गाडी आणाल? माझी आत्ताची गाडी मोडली.’
“हो ठीक आहे आणतो.’
प्रसंग दुसरा –
“बाबा, आई उद्या ऑफिसला सुट्टी घ्याल आपण मस्त फिरायला जाऊ. माझा मित्र पण गेलाय. आपण त्याच्यापेक्षा लांब जावुयात.’
“हो ठीक आहे घेतो आम्ही सुट्टी. कुठे जायचं?’
प्रसंग तिसरा-
“आई मला खूप झोप येतीये. माझा अभ्यास तुच करून दे ना गं प्लीज.’
“बरं अभ्यास करून बॅग भरून ठेवते मी.’
प्रसंग चौथा-
“आजी मला ते फ्रिजमधलं मोठं चॉकलेट दे ना खायला.’
“अरे बाळा आता नको खाऊ ते. जेऊन घे ना. ही जेवायची वेळ आहे ना? चॉकले नको खाऊ सारखी. दात बघ किती किडलेत. उद्या खा हवं तर.’
“ए आजी, चॉकलेट देणार नाही म्हणजे काय? मला आताच्या आता चॉकलेट हवंय. मी नाही जेवणार. मला तेच खायचंय. आई बाबा असते तर आता काढून दिलं असतं. तू उगाच लेक्चर देऊ नको. मला फक्त चॉकलेट काढून दे. नाहीतर मी स्टुलवर चढून काढतो.’
छोट्या साईची ही प्रतिक्रिया पाहून धक्काच बसला. तो आपल्याला असं काही उत्तर देईल असं वाटलंच नव्हतं तिला. तिने आपलं त्याला चॉकलेट काढून दिलं त्याला.
या चारही प्रसंगाचं नीट वाचन केल्यावर समस्या लक्षात आली तुमच्या. आज कालच्या मुलांच्या शब्दकोशातून कमी होत चाललेला “नाही’ हा शब्द वरचे तीनही प्रसंग वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की, साईला त्याचे आई-वडील नाही म्हणालेच नाहीत. आपण फक्त उदाहरणादाखल हे प्रसंग पाहिले. पण असे हजारो प्रसंग सतत घडतात ज्यात “नाही’ हा शब्द ऐकावाच लागत नाही. त्याला फक्त आणि फक्त “हो’ हाच शब्द ऐकायला मिळतो. त्यामुळेच तर त्याने आजीला असी अनपेक्षित प्रतिक्रिया दिली ना. कारण ते “नाही’ त्याला स्वीकारताच आलं नाही.
सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये ही समस्या पहायला मिळतीये. आई-बाबा दोघंही नोकरी करतात. त्यांना खूप पैसा कमवायचा असतो. त्यामुळे ते मुलांना अजिबात वेळ देऊ शकत नाहीत. या अपराधी भावनेची भरपाई म्हणून ते मुलांचे अति लाड करतात. मुलं म्हणतील, मागतील ते सगळं त्यांचायासमोर आणून ठेवतात. मुलं म्हणतील तीच पूर्व दिशा असं काहीसं घडत असतं. त्यामुळे मुलांनाही मागितलं की मिळालं, याच गोष्टीची सवय होऊन जाते. “नाही’ हा शब्द त्यांना ऐकावाच लागत नाही आणि या साऱ्यामध्ये चुकून एखाद्या गोष्टीला कोणी “नाही’ म्हणालं की मग विचारायलाच नको. त्यांना राग तिका अनावर होतो की मग व्यक्त होताना, एखादी विचित्र कृती करायलाही ते मागे पुढे पाहात नाहीत. त्यांच्या या प्रतिक्रिया खूपच भयानक असतात.
अगदी आत्महत्या करण्यापर्यंतची कोणतीही प्रतिक्रिया ते देऊ शकतात. तेव्हा मात्र घरातले हादरून जातात. त्यांना काही समजत नाही की नक्की काय झालं? आपलं नक्की काय चुकलं?
पालक मित्रहो, सध्या अशा केसेसची संख्या खूप वाढत चालली आहे. त्यांमुळे समुपदेशक म्हणून असं आवर्जून सांगावंसं वाटतं की तुमच्या मुलांवर ही वेळ यायला नको असेल तर त्यांना “हो’ बरोबर “नाही’ची देखील सवय लावायलाच हवी. ही सवय जर त्यांना नाही लागली तर पुढे आयुष्यात येणाऱ्या अपयशांना, नकारात्मक घटनांना ते सक्षमपणे तोंड देवूच शकणार नाहीत. ऑफिस, वैयक्तिक आयुष्य यात कधीच नकार पचवू शकणार नाहीत. त्यांच्या दुर्दैवाने सं एखादं अपयश आलं तर ती कोलमडून जातील. कदाचित एखादं चुकीचं पाऊल उचलतील. ज्याचा त्रास त्यांना तर होणारचे पण तो तुम्हाला आणि इतरांनाही भोगावा लागू शकतो.
त्यामुळेच मुलांना “नाही’ शिकवा. त्या नाही मागचं कारम त्यांना सांगा. त्यांनी मागितलेली गोष्ट तुम्ही का नाही म्हणताय. ती खरचं तितकी गरजेची, महत्त्वाची आहे का याचा विचार करायला त्यांना प्रवृत्त करा. त्यांना ते समजवा. ज्याचा फायदा तुम्हाला आणि त्यांनाच होणार आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींना, नकारांना तोंड देण्यासाठी ते सक्षम होणार आहेत आणि तुमचाच आदर्श ठेवून ते पुढे जाणारे आहेत. म्हणूनच “तुमच्या मुलाचं आयुष्य सुखी, समादानी, समृद्ध करायचं असेल तर तुम्ही आधी “नाही’ म्हणायला शिका.’
– मानसी तांबे-चांदोरीकर