परवा एका आजोबांशी ओळख झाली. आजोबा खूपच गप्पीष्ट होते. खूप बोलले पूर्वीच्या आमच्या काळात बरं होतं बाबा शिक्षण पूर्ण झालं की मिळेल तिथे नोकरीला लागायचं. बहुतेकदा तर बहुतेकजणांच्या बाबतीत तीच पहिली नोकरी आणि तीच शेवटची नोकरी. म्हणजे एकदा एका ठिकाणी नोकरीला लागलं की, निवृत्त होईपर्यंत तिथेच. नवी नोकरी शोधायची फारशी गरज पडतच नसे. पगार 15 किंवा 20 रुपये. पण तेवढ्या पगारातही महिनाभर आमचं घर चालायचं. क्वचितच कधीतरी उसने पैसे घ्यावे लागायचे. पण नोकरीचा कधी ताण नाही जाणवला आम्हाला उलट नोकरीचं ठिकाण म्हणजे दुसरं घर वाटायचं आम्हाला. खूप छान दिवस होते. ते फार स्वस्ताई होती.
तेव्हा चार-पाच आण्यात 4-5 कुल्फी खायचो आम्ही उन्हाळ्याच्या दिवसात. पण आता त्या 15-20 रुपयांना काही किंमत उरली नाही. साधं भाजी आणायला जावं तर 100 ची नोट कशी संपते कळत नाही. माझा मुलगा एका कंपनीत नोकरी करतो चांगला 30,000 रुपये पगार आहे. पण म्हणतो चांगल्या पगाराची नोकरी शोधायला हवी. एवढ्याशा पगारात भागत नाही. असूनसुद्धा नोकरी करते पण तिचंही तेच म्हणणं. सतत त्या कॉम्प्युटरसमोर बसायचं आणि काम करायचं. सतत आपली संधी जाता कामा नये म्हणून ताण घेऊन बसायचं. आपलं काम सिद्ध करायच्या मागे धावायचं.’
खरच मित्र-मैत्रिणींनो त्या आजोबांच्या बोलण्यात तथ्य होतं. पूर्वी लोकांना नोकरीचा एवढा ताण जाणवत नसे. पण आता? बापरे नोकरी हे केवढं मोठ्ठं ताणाचं कारण आहे. सध्याच्या पिढीवर आधी नोकरी मिळण्याचं टेंशन, मग ती टिकवण्याचं टेंशन, पगार वाढीचं टेंशन, आणि स्वतःला सिद्ध करण्याचं टेंशन खरं ना? आपण या सगळ्यात इतके गुंतत चाललोय. इतके गुंतलोय की आपलं शारीरिक मानसिक संतुलन हरवून बसतोय.
समुपदेशन क्षेत्रात काम करत असताना हा नेहमीच येणारा अनुभव आहे. अनेकजण हा ताण घेऊनच भेटायला येतात. या स्पर्धेच्या युगात आपल्या प्रत्येकाचाच ताण वाढत चाललाय आणि याचा परिणाम मनावर होऊ लागला आहे. प्रत्येकाचेच मानसिक संतुलन थोड्याफार प्रमाणात ढासळू लागले आहे. प्रत्येकचजण कळत न कळत या ताणाचा बळी होतो आहे. मिळणाऱ्या पैशात समाधान मानणं किंवा समायोजन साधणं कित्येकांना शक्य होत नाही. कारण अर्थातच त्यांच्या अपेक्षा उच्च, अती उच्च आहेत. पण त्या अपेक्षांमागे धावताना आपण मानसिक संतुलन बिघडवतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीये.
अशी तणावाखाली वावरणारी लोक “वर्कीहोलीक’ होत चालली आहेत. जेवण, विश्रांती, मनोरंजन, स्वतःसाठी थोडासा का होईना. पण वेळ काढणं या गोष्टींना त्यांच्या जीवनात जागाच नाहीये. फक्त पैसे, प्रसिद्धी यामागे धावतायत, धावतायत आणि धावतायतच. मित्रांनो स्पर्धा करणं वाईट अजिबात नाही. पण जी स्पर्धा आपल्या मानसिक अवस्थेवर, शारीरिक अवस्थेवर आघात करतीये अशी स्पर्धा काय कामाची?
तुम्ही म्हणाल मग काय करायचं? घरीच राहायचं? आहे. त्यात समाधान मानत बसायचं? असं अजिबात नाही. ही स्पर्धा खिलाडू वृत्तीने प्रत्येकाने किमान स्वतःपुरती घेतली तर काय हरकते? स्पर्धेत उतरला असलात तरी स्वतःसाठी देऊन तर बघा. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी छंद जोपासून तर बघा मन कसं प्रसन्न होतं. किती छान हलकं वाटतं. मन शरीर नव्या जोमानी स्पर्धेच्या तयारीला लागतं. मनाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
कारम मन आनंदी तर तुम्ही आनंदी पम मन जर सतत तणावाखाली असेल तर डिप्रेशन, विविध मानसिक आजार यांना आपण निमंत्रण देतो. जसे आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो तसे मन आजारी पडल्यावर कितीजण स्वतःहून समुपदेशकाकडे जातात? फार कमी. कारण त्यांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो तो म्हणजे मी मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलो तर लोक मला वेडा म्हणतील.
पण मित्र-मैत्रिणींनो एक समुपदेशक म्हणून असं सांगावसं वाटलं की तुम्हाला अतिरेकी ताण, भीती, डिप्रेशन असे काहीही सतत जाणवत असेल तर भीती, लाज न बाळगता स्वतः पाऊल पुढे टाकून समुपदेशकाकडे जा मनात साठलेले सर्व नकारात्मक विचार मोकळेपणाने बोला तो तुमच्या समस्येवर तुम्हाला उपाय शोधायला मदत करेल. तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल सुरुवातीला छोटे वाटणारे हे आजार नंतर खरंच गंभीर रूप धारण करतील. त्यामुळे तुमच्या मनाला स्थिर, खंबीर करणं तुमच्याच हातात आहे. मन सुदृढ ठेवायचं की आजारी ते तुम्हीच ठरवायचं ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे.
मानसी तांबे चांदोरीकर