स्मिता आपल्या छोट्या आर्यनला घेऊन स्वतःहून भेटायला आली. आल्यावर तिने आर्यनला खुर्चीत बसवलं आणि मग स्वतः बसली. “मला जरा माझ्या मुलाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. हा माझा मुलगा आर्यन. 5 वर्षांचा आहे. पण खूप वेडा आहे…’ स्मिताचं बोलणं मध्येच थांबवत तिला आर्यनसमोर काहीच न बोलण्याबद्दल सांगितलं, तेव्हा ती त्याला बाहेर बसलेल्या तिच्या पतीकडे सोडून परत आत आली. त्यानंतर प्रथम स्मिताची आवश्यक माहिती घेण्यात आली. स्मिता एका खासगी कंपनीत नोकरी करत होती आणि तिचा नवरा आयटीमध्ये होता. दोघे कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे शाळेतून आल्यावर आर्यनला त्याचे आजी-आजोबा सांभाळायचे.
“दिवसभर आर्यन आजी-आजोबांबरोबरच असतो. त्याचं खाणं-पिणं, अभ्यास, बाहेर घेऊन जाणं सगळं तेच करतात कारण आम्हाला दोघांनाही घरी यायला उशीर होतो. माझा आर्यन ना हल्ली खूपच वेड्यासारखा वागतो. उलट उत्तरं देतो, सांगितलेलं अजिबात ऐकत नाही. त्याला सारखी त्याची आजी-नाहीतर आजोबाच हवे असतात. मी ऑफिसमधून घरी गेल्यावर त्याच्याशी बोलायला गेले तर माझ्याशी नीट बोलतसुद्धा नाही. इतक्या वाईट सवयी लागल्या आहेत त्याला.
त्याने ऐकलं नाही तर मी त्याला फटके देते तर हा लगेच सासूबाईंकडे निघून जातो. त्याला चांगलं वळण नको का लागायला. पण आई लगेच त्याला जवळ घेतात. मग काय त्याच्या दृष्टीने मी वाईट ठरते. दोघांनी नुसतं बिघडवून ठेवलंय त्याला. नुसता लाडावलाय. मला तर वाटतं आम्ही वेगळं राहून त्याला सरळ पाळणाघरात घालावं. बरोबर सवयी लागतील सगळ्या. मी हा निर्णय घेऊ का? हेच विचारायला आली आहे मी. मला निर्णय द्या काय करू ते.’
स्मिता खूपच तावातावनं आणि वैतागून बोलत होती. पण असं एका सत्रात आणि फक्त एकच बाजू ऐकून घेऊन लगेच निर्णय, देता येणार नाही हे स्मिताला समजावून सांगितलं. यानंतर अजून एक-दोन सत्र घेतल्यावर स्मिताला तिच्या सासू-सासऱ्यांना भेटायला घेऊन येण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे दोघेही भेटायला आले. दोघांचे चेहरे अतिशय प्रसन्न व हसतमुख होते. संपूर्ण सत्रात ते अतिशय नम्रपणे बोलले. स्मिताबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारे चर्चा करायला सुरुवात केल्यावर बोलता-बोलता सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आले.
“आम्ही आर्यनला इतका जीव लावतो. त्याला इतक्या चांगल्या सवयी लावल्यात आम्ही आणि स्मिताचा आमच्यावरच विश्वास नाही, हे ऐकून वाईट वाटलं. पण खरं सांगू का आमच्या स्मिताचा स्वभाव खूप तापट आहे. तिला तिच्या मनाविरुद्ध काही झालेलं चालत नाही. आर्यनने जरा ऐकलं नाही की ती लगेच त्याला जोरजोरात मारते, ओरडते. बिचारा कावराबावरा होऊन जातो. आम्ही गोड बोलून, त्याच्या कलाकलानं घेऊन त्याला खूप छान शिस्त लावली आहे. खूप शहाणा आणि हुशार आहे आमचा आर्यन. पण तो तिला खूप घाबरतो. तिच्याशी बोलणं टाळतो. तो चुकला तर तिने त्याला जरूर रागवावं. आमचा विरोध नाही. पण शिस्तीचा प्रत्येक धडा मारून, रागावून नाही ना शिकवता येत. तो लहान आहे अजून. याउपर ती तिचा निर्णय घ्यायला मोकळी आहे.’
आजी-आजोबांबरोबर सत्र झाल्यावर स्मिताच्या नवऱ्याबरोबरही सत्र घेण्यात आले. यात स्मिताच्या वागण्याबाबत नवऱ्यानेही दुजोरा दिला. तोही तिला खूप समजावत असल्याचे सांगितले. यानंतर पुढील सत्रात सर्वांना एकत्र बोलावण्यात आले व चर्चा करण्यात आली. आर्यनला वाढवण्याबाबत घरातील शिस्त लावण्याबाबत, त्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मिताची आर्यनला वाढवण्याची पद्धत चुकते आहे याची अप्रत्यक्षपणे तिला जाणीव करून देण्यात आली. घरातील प्रत्येकाने एकाच पद्धतीने त्याला कसे वाढवावे यात एक वाक्यता कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. आता अवलंबल्या जात असलेल्या पद्धतीचा दूरगामी काय व कसा परिणाम होईल. याची जाणीव करून देण्यात आली.
या सत्रानंतर आपली चूक स्मिताच्या आपोपच लक्षात आली. तिने प्रामाणिकपणे ती मान्य देखील केली. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनीच आर्यनला वाढवण्याच्या प्रयत्नात चांगला सहभाग घेतला आणि त्यामुळे आर्यन पाळणाघरात न जाता आजी-आजोबांबरोबरच राहिला आणि हो अर्थातच घरातली नातीही नव्याने जोडली गेली. ज्याचा आर्यनला वाढवण्यास खूप उपयोग झाला.
मानसी तांबे-चांदोरीकर