परवा सत्रासाठी एक मुलगा, त्याची आई व वडील आले होते. भेटीला येण्यामागील उद्देश त्यांनी सांगितला. समस्येबाबत अगदी सविस्तर माहिती दिली आणि त्यानंतर त्या मुलाच्या आईने विचारले, समुपदेशन म्हणजे नक्की काय करता तुम्ही? कारण आपल्या अडचणींवर सल्ला देणारे बरेच लोक असतात की आपल्या आजूबाजूला. मग समुपदेशनासाठी कशाला यायचं?
खरंच दोस्तहो कदाचित तुमच्या मनातही हा विचार येत असेल ना? की माझ्या आजूबाजूला माझे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आहेतच की मग मी का जायचं समुपदेशनाला. बरोबर आहे तुमचा विचार पण नातेवाईक, पालक यांना तुम्ही सांगितलेल्या समस्येची सखोल जाणीव नसते.
तुम्ही जेवढं सांगाल तेवढीच समस्या त्यांना समजते आणि त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या विचारांनुसार त्यांच्या ग्रहांनुसार किंवा कदाचित पूर्वग्रह दूषित विचारांनुसार ते तुम्हाला सल्ला देतात. जसं की, तु अमुक कर, तु तमुक बोल, आमक्या तमक्याची मदत घे, तु सरळ बोलून टाक. वगैरे वगैरे हा झाला एक भाग आणि दुसरे म्हणजे त्यांच्या सल्ल्यात भावना गुंतलेल्या असतात.
हे सल्ले समस्येचा सखोल, वास्तववादी विचार न करता बरेचदा भावनांवर आधारीत असतात. त्या सल्ल्यांत त्यांच्या कदाचित भावना जास्त काम करत असतात आमि तुमच्याही भावना गुंतलेल्या असतात.
पण तुम्ही जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा समुपदेशनासाठी येता तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे समुपदेशक तुमचा तुम्ही आहात तसा तुमचा स्वीकार करतो. तुमची समस्या ऐकून, विचारून तो अजिबात पूर्वग्रह दूषित होत नाही. उलटं एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून तो त्या समस्येचा सर्वांगाने विचार करतो, त्याची कोणतीही भावना तुमच्या समस्येत गुंतलेली नसते त्यामुळे त्रयस्थ म्हणून तुची समस्या जाणून घेणं त्याला शक्य होतो.
तुम्ही समस्या सांगता तेव्हा तो समस्येचा आणि निरीक्षणातून तुमचा अभ्यास करतो. ही सत्रातरी चर्चा यासाठी फारच उपयोगी पडते. तुमच्या बोलण्यातूनच तुमच्या समस्येचे अनेक धागेदोरे तो शोधून काढतो आणि मग समस्या सोडवण्याच्या दृष्टीने समुपदेशन सुरू करतो.
अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुपदेशक सत्रादरम्यान, समस्येबाबतच्या चर्चेदरम्यान तुम्हाला कोणताच सल्ला देत नाही. समुपदेशन म्हणजे सल्ला नाही. उलट तो चर्चेदरम्यान तुमच्याशी बोलताना वेगवेगळी उपचार तंत्रे वापरून तो तुम्हालाच तुमच्या समस्येच्या मुळांशी, विचारांशी, भावनांशी ओळख करून देतो, त्यांची जाणीव करून देतो आणि तुमचीच समस्या तुम्ही उत्तम प्रकारे, योग्य निर्णय घेऊन कशी सोडवू शकता यासाठी मदत करतो.
समस्येकडे आपला बघण्याचा दृष्टीकोन आणि खरी समस्या यातील फरक ओळखायला शिकवतो. भावना- विचार- वर्तन, या साखळीची तो तुम्हाला ओळख करून देतो. म्हणजे एखाद्या प्रसंगात तुमच्या भावना काय होत्या. त्यातून तुमच्या ऐक्यात कोणकोणते विचार आले आमि त्यामुळे तुमचे वर्तन कसे घडले याची तो तुम्हाला ओळख करून देतो.
समस्येच्या मुळाशी नेऊन ती सोडवण्यासाठी मदत करतो.
क्वचित काही वेळा समस्येच्या तीव्रतेनुसार समस्येबाबत तो समस्या सोडवण्यात प्रत्यक्ष सहभाग घेतो. ते अप्रत्यक्षपणे तुम्हाल समस्येपर्यंत पोहोचवण्याचेच काम अधिक करतो. सल्ल्यामध्ये यातील कुठलीच पायरी येत नसल्याने सल्ला किंवा मार्गदर्शन आणि समुपदेशन यात हाच मोठा फरक असतो.
त्यामुळेच दोस्तहो तुमची एखादी समस्या सोडवण्यास तुम्ही असमर्थ ठरत असाल, तुम्हाला त्यात सतत अपयश येत असेल, भावनिक गुंता जास्त असेल तर इतरांचा सल्ला घेण्यापेक्षा समुपदेशनासाठी जाणे हे जास्त योग्य ठरते. ज्याचा तुम्हालाच समस्या सोडवण्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहोचून तुमची समस्या सहज सोडवू शकता.
याहूनही अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे समुपदेशक पहिल्या सत्रापासूनच तुमची समस्या पूर्णपणे गोपनीय ठेवतो. त्यामुळे ती कोणाला कळेल याचीही भीती उरत नाही. याच सर्व कारणांसाठी सल्ला नाही तर समुपदेशन हा उत्तम उपाय आहे.
– मानसी तांबे-चांदोरीकर