दरवर्षी संक्रांत आली की सगळेच अगदी प्रेमाने तीळगूळ देत तीळगूळ घ्या – गोड बोला म्हणतात. नुकतीच संक्रांत आपण सगळ्यांनीच साजरी केली. पण हे गोड बोलणं केवळ संक्रांतीपुरतंच मर्यादित का? वर्षाचे इतर दिवस? एकमेकांशी रागाने ओरडून बोलण्यास सगळे मोकळे. मग काय सगळीकडे आरडाओरडाच नुसता. गोड बोलणं गायब.
खरंच यातला मजेचा भाग सोडला तर हे सत्य आपण कोणीही नाकारूच शकत नाही की आम्ही आरडाओरडा न करता अगदी गुण्यागोविंदानं राहतो. मला सांगा हा आरडाओरडा येतो कुठून? यामागे कोणती भावना असते? “”राग” बरोबर ना? एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली की आपल्याला लगेच टोकाचा राग येतो. मग ती व्यक्ती लहान असो किंवा मोठी. वयानुसार हा राग व्यक्त करण्याची पद्धत बदलते इतकेच.
आनंद, सुख, समाधान या सगळ्या सकारात्मक भावना, तर राग ही नकारात्मक भावनांची छटा. जी प्रत्येकामध्ये असतेच आणि काही प्रमाणात ती असलीच पाहिजे. काही प्रमाणात असं म्हणण्यामागचं कारण; थोडा राग हा असायलाच हवा तरच इतर भावनांचाही आपण आनंद घेऊ शकतो. एखाद्याला राग येतच नसेल तर त्याचं आयुष्य कसं “प्लेन किंवा मोनोटोनस’ म्हणतो तसं होऊ जाईल ना? तुमचं अस्तित्व, तुमचे विचार, तुमचं कर्तृत्व चार-चौघांत सिद्ध करण्यासाठी, तुमचं व्यक्तिमत्त्व इतरांमध्ये खुलून दिसण्यासाठी हा थोडासा राग कधी कधी किंवा काही विशिष्ट प्रसंगात उपयोगीच पडतो.
पण थोडासाच हा… कारण तो राग जर वाढत गेला, त्याची तीव्रता वाढत केली तर मात्र तुमचं वेगळंच रूप जगासमोर येतं. राग या भावनेचा असा जर सकारात्मक बाजूने विचार केला तर मग राग ही काही पूर्णपणे नकारात्मक भावना ठरत नाही. ती सकारात्मकही होऊ शकते.
पण रागाची तीव्रता वाढायला लागली किंवा एखादा माणूस सतत राग या एकाच भावनेत वावरू, बोलू लागला तर मात्र या भावनेला पूर्णच नकारात्मक रूप मिळून जाते आणि याहीपेक्षा तीव्रतेचा राग आला की मग आपल्या आजूबाजूला घडणारी भांडणं, मारामाऱ्या, खून या आणि यासारख्या अनेक मन होलावून टाकणाऱ्या घटना आपण रोजच ऐकतो, पाहतो. रागाची तीव्रता टोकाला गेली की राग माणसाच्या नियंत्रणात न राहता राग माणसाचा ताबा घेतो आणि मग अशी लाजीरवाणी कृत्य घडतात.
हा राग निर्माण होतो तोच मुळी खुन्नस, जेलसी, इतरांचे चांगले न पहावणे, मी म्हणजे सर्वशक्तिमान अशा नकारात्मक भावनांच्या अनेक छटांमधून या छटा जर आपल्या व्यक्तिमत्त्वात जास्त आतील तर आपला स्वभाव आपोपच तामसी-तापट होत जातो. म्हणूनच सकारात्मक असो वा नकारात्मक दोन्ही भावनांचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असायला हवा. आपल्यामध्ये नकारात्मकता जास्त असेल तर आपण प्रयत्नपूर्वक ते सकारात्मकतेत बदलायला हवेत. तुम्ही इतरांबरोबर स्वतःची करत असलेली तुलना, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न हा खेळीमेळीचा स्पर्धात्मक असायला हवा.
नकारात्मक नाही. कारण सकारात्मक गोष्टी जशा आनंद देऊन जातात. तशा नकारात्मक गोष्टी त्रास देऊन जातात आणि तुम्ही एकदा का हा नकारात्मक गोष्टींच्या चक्रात अडकलात की मग तुम्हाला सारं जगच नकारात्मक दिसायला लागतात. तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर अर्थातच याचा वाईट परिणाम दिसायला लागतो. मग तुमची जवळची, जीवाभावाची माणसंही तुमच्यापासून दुरावतात आणि तुम्ही एकटे पडू लागता आणि अर्थातच साऱ्या सकारात्मक गोष्टी तुमच्या हातून निसटून जातात. जीवनाचा, भरभरून जगण्याचा आनंदच तुम्ही गमावून बसता.
म्हणूनच राग या भावनेला तुमच्या पूर्ण ताब्यात ठेवू शकलात तर ती नकारात्मकच न होता सकारात्मकही होऊ शकते. मित्रहो आनंद प्रेम, सुख, समाधान या भावना जशा प्रत्येकामध्ये असतातच तशी “राग’ आणि इतर नकारात्मक छटा या प्रत्येकात असणारच. त्या मनुष्याच्या मनातून पूर्णपणे काढून नाही टाकता येणार; पण त्यावर छान नियंत्रण मिळवून त्याचा सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही नक्की वापर करू शकता आणि आयुष्याचा संपूर्ण आनंद रोज आणि कोणत्याही वयात घेऊ शकता.
त्यामुळे या मकरसंक्रांतीपासून गोड बोलण्याबरोबरच या नकारात्मक भावना सकारात्मक दृष्टिकोनातूनही घेण्याचा प्रयत्न करून बघा. वर म्हणल्याप्रमाणे रोज आनंद आणि समाधानाने भरलेलं राहिलं. असं म्हणतातच ना की राग कधी, कुठे, किती आणि कसा व्यक्त करायचा याचं गमक जुळलं की आयुष्य सुखकर होतं. मग चला आतापासूनच सुरुवात करुया.
मानसी तांबे-चांदोरीकर