ऍलर्जी हा शब्द अनेकदा कानावर पडतो. कोणाला धुळीची ऍलर्जी असते तर कोणाला दुधाचा त्रास होतो. शेंगदाणे, सोयाबीनची ऍलर्जी असणारेही बरेचजण असतात. कोणत्याही घटकाची ऍलर्जी निर्माण होऊ शकते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या बाह्य घटकाला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देऊ लागल्यास ऍलर्जी निर्माण होऊ शकते.
धूळ, धूर, विशिष्ट प्रकारचा वास, अत्तराचा सुगंध, फळ, भाजी खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. अर्थात अशा ऍलर्जीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. ऍलर्जी असणारा पदार्थ किंवा घटक टाळला जातो इतकंच! त्या पलीकडे फारसं काही केलं जात नाही. ऍलर्जी जीवघेणी नसल्यामुळे लोक हे प्रकरण फार गांभीर्याने घेत नाहीत. मात्र जगभरातच ऍलर्जीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
भारतातल्या 25 ते 30 टक्के लोकांना कसली ना कसली ऍलर्जी आहे. डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ऍलर्जी हे प्रमुख कारण बनू लागलं आहे. ऍलर्जी निर्माण करणार्या घटकाशी संपर्क झाल्यानंतर त्वचा, श्वसनमार्ग, पचनसंस्थेचा दाह असा त्रास होऊ शकतो. ऍलर्जीची तीव्रता व्यक्तीगणिक बदलत जाते. कोणाला सौम्य स्वरुपाचा त्रास होतो तर कोणाला होणार त्रास रौद्र रुप धारण करतो. ऍलर्जीमुळे सौम्य किंवा किरकोळ स्वरुपाचा त्रास होत असला तरी तुमच्या दैनंदिन कामावर याचा परिणाम होत असतो.
प्रत्येक प्रकारच्या ऍलर्जीवर उपचार करून घ्यायला हवेत. पण त्यासाठी ऍलर्जीचं निदान होणं गरजेचं आहे. ऍलर्जीच्या निदानासाठी डॉक्टर विविध बाबी विचारात घेतात. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास, लक्षणं, शारीरिक तपासणी, रक्ततपासणी, त्वचेची तपासणी या पद्धतींनी रुग्णाला होणार्या त्रासाचं निदान केलं जातं.
या चाचण्यांमुळे ऍलर्जीची नेहमी स्थिती जाणून घ्यायला मदत होते. रुग्णाची आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरते. रुग्णाच्या लक्षणांवरून ऍलर्जीचं निदान करणं शक्य होतं. रुग्णाच्या नातेवाईकांमध्येही ऍलर्जीची काही लक्षणं आहेत का, हे ही डॉक्टर जाणून घेतात. निदानाची प्रक्रिया झाल्यानंतर उपचारांना सुरूवात होते. ऍलर्जीचा प्रकार, ऍलर्जी निर्माण करणारा घटक, रुग्णाची जीवनशैली या सर्व बाबींचा विचार करून उपचारांची पद्धती ठरवली जाते.
– रणजित देवकुळे