शीतपेय पिताना काहींना छान वाटते. अनेकजण जाहिराती पाहून शीतपेय पिऊ लागतात. पण, हे शीतपेय आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतात हे विविध संशोधनातून पुढे आले आहे. जे शीतपेयं तुम्हांला काहीकाळासाठी थंडाव्याचा आनंद देणार आहेत, तेच तुमच्या आरोग्याला मात्र धोका निर्माण करत नाहीत ना? शीतपेयांमुळे आरोग्यावर किती दुष्परिणाम होतात, यावर अनेकठिकाणी संशोधन झाले आहे.
धोका कर्करोगाचा…
शीतपेयांमध्ये रंग येण्यासाठी जळालेल्या साखरेचा पाक वापरण्यात येतो. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेत केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या 11 शीतपेयांची तपासणी करण्यात आली. या पेयांमधील 4 मिथेलीमिडझोलमुळे (4-ाशींहूश्रळाळवरूेश्रश) कर्करोगाचा धोका संभवू शकतो. जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर अ लिव्हेबल फ्युचर इन बाल्टिमोअर येथे स्मिथ टेलर यांच्या संघाने संशोधन केले.
शीतपेयांच्या बाटल्यांवर कर्करोगाच्या धोक्याची माहिती देण्यात यावी याविषयी कायदा कॅलीफोर्निया येथे केला आहे. असाच कायदा इतर राज्यांनीही करावा. तसेच शीतपेय बनविणाऱ्या कंपन्यांनीही नागरिकांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.
कीडनीवर होणारा दुष्परिणाम…
जपानमधील ओसाका विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसीनने संशोधन केले. त्यात शीतपेय आणि साखरेचा वापर केल्याने किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. ज्या व्यक्तींना दिवसातून दोन पेक्षा अधिक बाटल्या शीतपेय प्यायची सवय असते, त्यांच्या कीडनीवर दुष्परिणाम झाल्याचे दिसले.
अमेरिकेतील विद्यापीठांमध्येही याविषयावर संशोधन झाले. उंदरांवर प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये शीतपेय पिणाऱ्या उंदरांमध्ये अँजिओटेसिन हे प्रोटीन वाढल्याचे लक्षात आले. हे प्रोटीन मधुमेह, लठ्ठपणा, किडनीनिष्क्रीयता, हायपरटेन्शन आदी नुकसान करते.
स्वीडनमधील संशोधन…
स्वीडन येथे झालेल्या संशोधनात शीतपेय अतिरिक्त प्रमाणात घेतल्यावर कर्करोग होऊ शकतो, हे स्पष्ट झाले. जे पुरुष जास्त प्रमाणात शीतपेयं पितात, त्यांना प्रॉस्ट्रेट ग्रंथींचा कर्कहोण्याची शक्यता वाढते, असे पुढे आले. शीतपेयातील साखरेमुळे हॉर्मोन इन्सुलीन स्रवतात. त्यामुळे ट्युमर व्हायला मदत होते.
मधुमेह…
शीतपेयातील अतिरिक्त साखरेमुळे शारीरिक दुष्परिणाम होतात, हृदयविकार, मधुमेह, वजन वाढणे याचे धोके असतातच. तसेच हाडे ठिसूळ होऊ शकतात. स्वादुपिंडाचा कर्करोगही होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्नायू दुर्बल होणे, लकवा किंवा अर्धागवायू होऊ शकतो.