[[{“value”:”
Cleaning Tips: सणासुदीचे दिवस जवळ आले की घराची साफसफाई सुरू होते. पूजेसाठी वापरली जाणारी तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करण्याकडेही विशेष लक्ष दिलं जातं. मात्र, ही भांडी अनेक दिवस वापरात नसतील आणि कपाटात किंवा पिशवीत ठेवली असतील, तर त्यावर काळपट डाग जमा होतात. हे डाग सहज निघत नाहीत आणि भांडी पुन्हा चमकदार करण्यासाठी बराच वेळ लागतो.
पितांबरी किंवा इतर पावडरने भांडी घासताना हातांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करता येतात. हे उपाय करून पाहिल्यास भांडी कमी मेहनतीत स्वच्छ आणि चमकदार दिसू शकतात.
पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर
पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मीठ हा सोपा उपाय करता येतो. यासाठी एक लिंबू अर्धा कापून त्यावर थोडं मीठ शिंपडा. आता हे लिंबू पितळेच्या भांड्याच्या आतल्या आणि बाहेरच्या भागावर गोलाकार पद्धतीने घासा.
ज्या ठिकाणी काळपट डाग किंवा मळ जास्त असेल, तिथे थोडं जास्त घासू शकता. काही वेळाने भांडं पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरड्या सुती कापडाने व्यवस्थित पुसून घ्या. भांड्यावरचा मळ कमी होऊन त्याला चमक येण्यास मदत होऊ शकते.
दही आणि हळदीची पेस्टही उपयोगी
पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी दही आणि हळद यांची पेस्टही वापरता येते. यासाठी थोडी हळद दह्यात मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यावर लावून काही मिनिटं तशीच ठेवा. त्यानंतर भांडं हलक्या हाताने घासून पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडाने पुसा.
तांब्याची भांडी चिंचेने करा स्वच्छ
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंच हा घरगुती उपाय वापरता येतो. यासाठी चिंच काही वेळ पाण्यात भिजवून तिचा गर काढून घ्या. हा गर तांब्याच्या भांड्यावर सर्व बाजूंनी लावा आणि साधारण पाच मिनिटं तसाच राहू द्या. यानंतर स्क्रबर किंवा मऊ घासणीने भांडं स्वच्छ करा. शेवटी पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसून घ्या. यामुळे तांब्याच्या भांड्यावरील काळपटपणा आणि डाग कमी होण्यास मदत होऊ शकते.
चांदीची भांडी कशी स्वच्छ कराल?
चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी, बेकिंग सोडा आणि मीठ वापरता येतं. एका मोठ्या भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल पसरवा. त्यात गरम पाणी घेऊन बेकिंग सोडा आणि मीठ मिसळा. त्यानंतर चांदीची भांडी त्यात ठेवून काही वेळ भिजू द्या. साधारण २० मिनिटांनंतर भांडी बाहेर काढून मऊ ब्रश किंवा मऊ कापडाने स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडी करा.
टोमॅटो आणि व्हिनेगरचाही पर्याय
घरात लिंबू किंवा चिंच नसेल, तर टोमॅटोचा रसही वापरता येतो. टोमॅटोचा रस भांड्यावर लावून काही वेळ ठेवला आणि नंतर स्वच्छ घासलं, तर डाग कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय व्हिनेगर आणि सैंधव मीठ यांचाही वापर करता येतो. मात्र कोणताही उपाय करण्यापूर्वी भांड्याच्या छोट्या भागावर तो प्रयोग करून पाहणं चांगलं. साफसफाई केल्यानंतर भांडी नीट धुऊन पूर्णपणे कोरडी करून ठेवावीत. त्यामुळे सणासुदीला पूजेसाठी वापरायची तांबे-पितळेची भांडी कमी वेळात स्वच्छ आणि चकचकीत करता येतील.
“}]]
