
christmas 2021 : ख्रिसमस आला नवी संधी घेऊन…
December 25th, 9:32amDecember 25th, 9:34am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
ज्यावेळी देव एखादी गोष्ट बोलतो, त्यावेळी ती निश्चितच महत्त्वाची असते. ती गोष्ट मनुष्याने समजून घ्यायला हवी, अशी अपेक्षा तो करतो. ख्रिसमसच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी देव काय बोलला? येशूचा जन्म होण्याच्या वेळी देव आपल्या दूताकरवी म्हणाला, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो, ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.
तारणारा म्हणजे मुक्ती देणारा आणि ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त! येशूसारखी वैशिष्ट्यपूर्ण, अनन्यसाधारण व अद्वितिय व्यक्ती, या जगातील मानवाच्या पापाचे निर्मूलन करण्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आली, ही गोष्ट आनंदाची नाही का? जर या गोष्टीचा आनंद एखाद्या व्यक्तीला होत नसेल, तर त्याचे कारण एकच आहे की, येशूच्या त्या समर्पणाच्या घटनेचे लागूकरण, त्या व्यक्तीने स्वत:ला केले नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी येशू स्वर्गीय वैभव सोडून पृथ्वीवर आला आणि त्याच्या पापांचे प्रायश्चित म्हणून तो क्रुसावर मरण पावला. तत्कालीन रोम राजवटीने, यहुदी धर्मपुढाऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर आणि त्याने केलेल्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास ठेवला नाही आणि त्यांनी येशूला नाकारले.
त्यांनी केलेल्या चुकीची आज पुनरावृत्ती होऊ नये, अशी देवाची इच्छा असल्याचे बायबल सांगते. अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली, पण आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्तप करावा, अशी आज्ञा तो मनुष्यास करतो. चुकीच्या कल्पना अंत:करणात बाळगल्याने आतापर्यंत कोणाला अद्वितीय अशा येशूची ओळख झाली नसेल, तर ती करून घेण्याची संधी आज ख्रिसमसमुळे मिळाली आहे. यासाठी की कोणीही अज्ञानात जगू नये.
ख्रिसमसचा आनंद फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, तर सर्व जगासाठी आहे. येशूने आपले निष्कलंक रक्त सर्व जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर वाहिले. मानवाच्या शारीरिक मृत्यूनंतरचे देवाच्या सहवासातील सर्वकाळचे आनंदमय जीवन व सर्वकाळच्या भयानक यातना, यातून कशाची निवड करायची, याचा निर्णय देवाने मानवाच्या हातात ठेवला आहे आणि तो मानवाने जिवंत असतानाच घ्यायचा आहे. परमेश्वर म्हणतो, आकाश व पृथ्वी यांस साक्षी ठेवून, आज मी तुम्हांस सांगतो की, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शापही तुजपुढे ठेविले आहेत, तू जीवन निवडून घे!
– शरद गायकवाड सातारा.