– डॉ. तुषार पालेकर
कोरोना विषाणुपासून मुले सुरक्षित रहावी यासाठी मुलांना घराबाहेर पाठवू नका अशा सूचना लॉकडाऊन मध्ये करण्यात आल्या. पण लहान मुलांचा ओढ खेळण्याकडे जास्त असतो. अशा वेळी मुलांना घरात थांबणे कसे शक्य आहे? बऱ्याच मुलांचे आई वडील हे वर्किंग आहेत. लॉकडाऊनमध्ये काही ऑफिसेस बंद असल्याने पालक घरुन काम करित आहेत मात्र घरात मुलांच्या गोंधळामुळे त्यांना काम करणे अशक्य किंवा अवघड आहे.
आई वडीलांना आजी-आजोबा म्हणतात मुलांवर चिडू नका शाळा, ट्युशन, चिल्ड्रन्स सेंटर्स, हॉकी क्लासेसला नियमित जाणारी मुले घरात अडकून पडली आहेत, म्हणून ही मुले आई बाबांकडे विचारायला येणे सहाजिकच आहे. म्हणून तुमच्या कामांतून काही ब्रेक घ्या आणि काही वेळ मुलांसोबत घालवा. स्वत: वाचून मुलांना वाचनाची गोडी लावा. त्यांच्या आवडीची पुस्तके वाचायला घ्या.
व्यायाम किंवा योगा करण्यासाठी काही वेळ काढा. सुलभ योगासनाची चित्रे पाहून तुम्ही ही योगासने करण्याची सवय लावा. त्याने तुम्हा सर्वांची शारिरीक लवचिकता आणि स्नायूंना शक्ति मिळेल तसेच पचनाची, फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढेल. सूर्य नमस्कार केल्याने हृदय बळकट होईल. पश्चिमोतनासन, वीरभद्रासन, ताडासन, नौकासन, भुजंगासन इत्यादी योगासने मुले सहज करु शकतात. काही शाळा विद्याथ्र्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस आयोजित करतात. त्या शिकण्यात काही मुलांचा वेळ जात असतो. जी मुले आधीच कमी बोलतात किंवा फार कुणात मिसळत नाही त्यांच्याशी आई वडीलांनी संवाद किंवा चर्चा करुन त्यांच्या मानातील समस्यांना समजावून घेणे फार महत्वाचे आहे. काही मुले परिक्षा रद्द झाल्याने किंवा शिक्षकांशी किंवा मित्रांशी समोरासमोर भेटता येत नसल्याने चिंताग्रस्त असतात.
काही आई-वडीलांमध्ये तणावग्रस्त वावरणे दिसल्याने लहान मुलांवर घातक परिणाम होतात. अशा वेळी पालकांनी घरातील वातावरण प्रेरणादायी ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यांना ऑनलाईन क्लासेस माध्यम समजावून दिले तर त्यांची चिंता कमी होईल. आई-वडील “”वर्क फ्रॉम होम” वरच संतुष्ट राहतात. पण ऑफिसचे काम घरी करताना अनेक लोक ए.सी. लावून बेड, पलंग, खुर्च्या, सोफासेट यावर बसून सर्व कामे करतात. त्यामुळे घरात मोकळे फिरायला मुलांना फार कठीन होते. अशा वेळी आई-वडीलांनी स्वत:ची व मुलांची काळजी घेतली पाहीजे. लहान मुलांनी किंवा त्यांच्या आई-वडिलांनी बराच वेळ एका ठिकाणी बसण्याने हालचाल होत नाही.
मानेवर, खांद्यावर, कंबरेवर दबाव येऊन सांध्याची समस्या उद्भवते. सतत हालचाल करित राहाणे. पुन्हा मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करताना खाली झूकून करु नका. कॉम्प्युटरचा स्क्रीन चेहऱ्याच्या समोर दिसेल, अशी सोय करा जेणे करुन मुलांना व आई-वडिलांनाही पाठीच्या मणक्याचा त्रास जाणवणार नाही. जास्तवेळ टाईप करतांना की बोर्डवर दोनही बाजूंना मनगट व कोपर वाकऊन ठेवल्यास सांधे व त्यांच्या मज्जातंतूंना त्रास होतो. पुढे कार्प्पल टनेल सिंड्रोम हा रोग होऊ शकतो. त्यासाठी लॉकडाऊनच्या काळात कामाला कुठे तरी खंड देऊन मान, पाठ, खांदे आणि पाय यांच्या हालचाली किंवा सुलभ व्यायाम करा, उभे रहा, पायरी चढा आणि उतरा.
आता काळ बदलत आहे. आई-वडिलांचे विचारही काळासोबत बदलायला पाहिजे. त्यामुळे मुलांवर संस्कार करतांना कही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात लठ्ठपणा समृध्दीचे लक्षण मानेले जात होते पण आजच्या काळात मध्यवर्गीय लोकांमध्ये लहान मुले लठ्ठ झालेली दिसतात. काही लहान मुले अनुवंशिकतेने लठ्ठ असतात. आई-वडिल सडपातळ असतांना काही मुले लठ्ठ होत असलेली दिसतात. याचे कारण काही मुले पालकांकडून हातात पैसे मिळाल्यामुळे फुड कोर्ट, मॅकडोनाल्ड, पिझा हट वगैरेमध्ये खातात त्यांत पौष्टिकतेचे घटक कमी असतात. कधी कधी पालकांना आपल्या मुलांच्या जास्त वजनांबद्दल ज्ञान नसते. ते बाळाससुदृढ समजतात. पण त्यांनी वेळीच अवलोकन करुन बाहेरचे खाणे बंद करुन घरचे साजुक जेवण द्यायला पाहिजे. कारण लठ्ठ मुलांना पुढे शाळेतील मित्र सुध्दा चिडवतात.
आपल्या मुलांना आपल्या सोबत फिरायला नेले पाहिजे. त्यांनी सायकलने फिरुन यायला पाहिजे. पोहणे शिकायला पाठविले पाहिजे. घरकामात मदत करायला चालना द्यायला पाहिजे. आता लॉकडाऊन काळात सर्व सांध्यांना हालचाली देणारे व्यायाम करायला पाहिजे. त्यांच्या दैनंदिन वेळापत्रकांत त्यांच्याच सहकार्याने सकाळ पासून संध्याकाळपर्यंतचा वेळ सदुपयोगी करायला पाहिजे. योगासने करण्याची सवय लावली पाहिजे. वाकणे, ताणणे अशा व्यायामाने स्थूलपणा कमी होतो.
पश्चिमोत्तानासन करतांना बसून हाताने पायापर्यंत पोचवतांना पोटाला आकार येतो. विरभद्रासन उभे राहून करतांनामुलांच्या शरीराचे संतुलन होते. हलासन केल्याने पोटांचे स्नायू बळकट होतात तणाव कमी होतो. नौकासन आतड्यांना चालना देते. दंडासनाने हात आणि पायांना शक्ती येते. मुलांना प्रोत्साहन येते. श्वसनक्रिया उत्तम होते. शरिरातील अतिरीक्त चरबी कमी होते. मुलांचे वजन कमी होते. मुले सडपातळ दिसायला लागतात. नियमित व्यायाम केल्याने रोग टाळता येतात, शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते, मानसिक आरोग्य प्रसन्न राहते, नवीन उर्जा प्राप्त होते. लठ्ठपणा कमी होतो.
व्यायामाचे प्रकार –
1) ताणण्याचे व्यायाम, योगासने, सुर्यनमस्कार
2) रक्ताभिसरणाचे व्यायाम- चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालविणे, नृत्य, जॉगिंग (एरोबिक्स)
3) शक्तीचे व्यायाम- वजन उचलणे
4) श्वसनाचे व्यायाम- प्राणायाम
वडिलांनी आपल्या लहान मुलांना व्यायामाचे फायदे पटवून द्यायला पाहिजे ते पुढिलप्रमाणे
1) वजन नियंत्रित करता येते.
2) शारिरीक क्षमता वाढते.
3) निराशा कमी होऊन प्रसन्नता वाढते.
4) स्नायू मजबूत होतात.
5) रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
– डॉ. तुषार पालेकर