गाजर हे फळ ही मानतात आणि भाजीही मानतात. गाजरात दोन प्रकारची गाजरे येतात.
1) देशी 2) विदेशी
देशी गाजरे ही पांढरी, पिवळसर, काळसर, लाल असतात. तर विदेशी गाजरं ही नारिंगी रंगाची असतात. विदेशी गाजरे ही नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात येतात. संस्कृतमध्ये गाजराला गुंजन असे म्हणतात. हिंदीमध्ये गाजर, गुजराथीमध्ये गाजर म्हणतात तर इंग्रजीमध्ये कॅरेट म्हणतात.
आयुर्वेद शास्त्रच्या दृष्टीने गाजर हे गोड, रसयुक्त, अग्नि वाढविणारे तेजस्वी, कफ नष्ट करणारे असे आहे. शरीरातील मळ साठविण्याचे व मळ बांधणीचे काम गाजर करते. पोटांच्या तक्रारीवर गाजर हे रामबाण उपाय आहे.
गाजर अरूची दूर करते आणि पचनशक्ती वाढविते. कोणत्याही तुत गाजर आपली कफनाशक प्रवृत्ती सोडत नाही. छातीत तसेच घशात कफ झाला असता शरीर कमजोर होते. पण गाजरांच्या फोडींना आलं आणि लवंग यांचा चुरा लावला असता कफ पातळ होण्यास मदत होते आणि कफाचा खोकला जातो.
गाजरात मुख्यतः व्हिटॅमिन अे असते. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन अे ची आवश्यकता असते. गाजर खाल्ले तर साथीच्या डोळ्यांच्या रोगात प्रतिरोध म्हणून गाजर काम करते. गाजरात व्हिटॅमिन सी पण असते. या अे आणि सी व्हिटॅमिनस्मुळे गाजराचे महत्त्व वाढले आहे. यकृताचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी गाजराचा रस प्यावा.
थंडीत प्रत्येक माणसाने रोज 100 ग्रॅम गाजर खावे. कारण आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी हा एक पौष्टिक आहार होतो.रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याची क्षमता गाजरातील खनिज लवणामध्ये असते. म्हणजेच गाजरातील खनिज क्षारांमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. रक्त, मांस, वृद्धी होते. उष्णतेचे विकार बरे होतात. शरीराला विविध प्रकारचा खनिज क्षारांची गरज गाजरामुळे भागविली जाते.गाजरात दोन प्रकारची लवणे असतात.
1) प्राणीजन्य लवण
2) क्षारोत्पादन लवण दोन्ही लवणांचा उपयोग मानवी शरीराला होतो.
रोज गाजर खाणाऱ्या माणसाचे शरीर धष्टपुष्ट तर बनतेच पण त्याची कार्यक्षमता वाढून त्याला कोणताही रोग होत नाही.
1) अग्निमांद्य – अग्निमांद्य म्हणजेच मंदाग्नि. अमाशयात अन्न न पचताच तसेच पडून राहण्याची क्रिया शरीराला हानिकारक असते. हा रोग पाणी कमी पिणाऱ्या माणसांना अधिक प्रमाणात होतो. या रोगात भूक कमी लागते, पोट भरल्यासारखे सतत वाटत राहते, आळस येतो. करपट ढेकरा भोजनानंतर येत राहतात. या रोगांवर प्रथम उपचार म्हणजे रोज सकाळी अर्धा कप गाजराचा रस लिंबू व आल्याचा रस मिसळून प्यावा.धने, पांढरी जिरं आणि दालचिनी समप्रमाणात कुटून त्याला थोडेसे पादेलोण लावून गाजराच्या रसात मिसळून प्यावे.
5 ग्रॅम कापूर, 10 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम पुदिना चूर्ण, 10 थेंब लवंगाचे तेल हे सर्व एकत्र करून 1 चमचा आल्याच्या रसात आणि गाजराच्या रसात प्यावे.
आलं, लसूण, कांदा आणि गाजर समप्रमाणात वाटून चटणी बनवावी. यात थोडेसे काळे मीठ घालावे आणि चार दिवस जेवणानंतर हे चूर्ण घ्यावे. सुंठ काळीमिरी, पिंपळाची साले, दालचिनी हे सर्व समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण बनवावे. यामध्ये थोडेसे मीठ घालून गरम गाजराच्या रसात घालून प्यावे.अशाप्रकारे मंदाग्निवर गाजराचे उपचार होऊ शकतात.
2) अजीर्णावर गाजर
अजीर्ण झाले असता पोट भरल्यासारखे वाटते, पोटात बारीक दुखते, उलटी होईल असे वाटते. गॅसेस होतात अशा वेळी गाजराच्या रसात चिमूटभरे हिंग, सुंठ, जिऱ्याची पावडर भुरभुरावी आणि प्यावे. दालचिनी, हिंग आणि पादेलोण यांचे मिश्रण खाऊन गाजराचा रस प्यावा. गाजराच्या रसात 2 चमचे कांद्याचा रस मिसळून प्यावा.
अर्धा कप गाजराचा रस, 1 चमचा आल्याचा रस, 1 चमचा लिंबाचा रस सर्व एकत्र करून त्यात मीठ, हिंग, जिऱ्याची पावडर टाकून सकाळ संध्याकाळ प्यावा.
100 ग्रॅम गाजरे किसून कढईत त्या किसाला वाफ आणावी. थोडासा हिंग आणि काळेमिठ घालून खावे.
उचकी लागताच 1 चमचा गाजराच्या रसात साजूक तूप मिसळावे व खावे. गाजराच्या रसात किंचित मध टाकून खावा. गाजराच्या रसात हिरच्या धन्याचे चूर्ण मिसळून खावे. गाजराच्या रसात 1 चमचाभर कांद्याचा रस मिसळून प्यावा.