पती-पत्नीचे नाते हे खूप नाजूक खूप सुंदर आणि खूप काळजीपूर्वक सांभाळण्याचे. आणि मी नेहमी म्हणते कोणत्याही नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. तसाच या नात्यात तो महत्त्वाचा. दोघांचा एकमेकांवरचा विश्वास संसाराचा गाडा नीट पेलू शकतो आणि आयुष्याला सुंदर बनवू शकतो. माझ्या समोरचे कुटुंब अगदी हेवा वाटण्यासारखे आहे. नवरा-बायको आणि दोन मुले आणि नवऱ्याची आई. अतिशय छान कुटुंब त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटते. पत्नी किती छान घर सांभाळून घेते. नवरा मुले आणि सासूबाई या सर्वांचे सर्व काम हसत हसत करत.
एकदा तिच्याबरोबर अशाच गप्पा मारत होते. त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांना घरातील काही गोष्टी सांगत होतो. त्यावेळी तिने जे सांगितले. एकूण मी आश्चर्यचकित झाले. ती म्हणाली की, माझ्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली. पण अजूनही जिवाची धाकधूक कमी होत नाही. लग्न झालं आणि दुसऱ्याच वर्षी नवऱ्याला खूप मोठा ऍटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. नवीन नवीन मला काही समजत नव्हते. माझा मुलगा अगदी 1।। वर्षाचा. त्याला सोडून मला हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. त्यांची तब्येत अतिशय सिरियस होती. तीन महिने हॉस्पिटलमध्ये रहावे लागले. त्यातील काही महिने आयसीयूमध्ये खूप भीती वाटत होती.
डॉक्टर रोज एक सांगायचे. माझ्या नवऱ्याला बोलता येत नव्हते ऑक्सिजन मास्क सतत त्यांच्या तोंडाला असे. आधार देणारं कुणी नव्हतं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ येत होती. रोज एक नवीन प्रॉब्लेम समोर असायचा. कधी पैशाचा तर कधी खायचा औषधांचा असे रोज एके पण मी मनातून बिलकुल खचले नव्हते. माझा माझ्या स्वतःवर विश्वास होता की माझा नवरा बरा होणार, हे नक्की! त्यामुळे मी कुणाकडे लक्ष देत नव्हते. लोक नको ते बोलत होते. अगदी “आपण दुसरे लग्न करू’ इथपर्यंत.
हळूहळू त्यांची तब्येत बरी होत होती; तो तो मला बरे वाटत होते. मुलाचंही तोंड 3 महिने पाहायला मिळालं नव्हतं. आता डॉक्टर सांगत होते की, पेशंट बरा होतोय आणि तुम्ही थोडे दिवसात घरी घेऊन जाऊ शकता. थोडे दिवसातच नवऱ्याला घरी आणले. दवाखान्यात असताना लोक माझ्याबद्दल काही पण बोलायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. घरी आल्यावर त्यांच्याच घरातल्यांनी त्यांना माझ्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तुझी बायको अशी तशी. पण माझ्या नवऱ्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता.
एवढ्या आजारपणातही तो घरच्यांच्या पूर्ण विरोधात जाऊन माझी साथ दिली आणि सांगितले, “माझ्या आजारपणात जे कुणी केले नाही ते तिने केले. आज मला मरणाच्या दारातून तिने बाहेर आणले. माझ्यात जो जगण्याचा आशावाद निर्माण केला तो तिने. त्यामुळे कुणी काहीही सांगितले तरी मी तिची साथ सोडणार नाही. आज माझ्या एवढ्या मोठ्या आजारपणात जी खंबीरपणे उभी राहिली ती बायको. तिच्या विश्वासाला कधीही मी तडा जाऊ देणार नाही,’ असं सांगत त्यांनी मला खूप साथ दिली आणि आमचा संसार सुखाचा झाला. ती सांगत होती ते ऐकून मी विचार करु लागले…
नवरा आणि बायको हे खूप सुंदर नाते आहे. ते नीट जपता आले पाहिजे. कोणतेही प्रसंग, कितीही, मोठे संकट आले तरी दोघांनी एकमेकांची साथ सोडता कामा नये. त्यासाठी त्यांच्या नात्यात प्रेमाबरोबर विश्वासाचा ओलावा पाहिजे आणि हे नाते सांभाळताना जपताना संशयरुपी काटेरी झुडूप बाजूला ठेवले पाहिजे. जर यामध्ये संशय आला तर तुमचे नाते कधीच टिकू शकत नाही.
त्यामुळे या नात्याचा गोडवा जपण्यासाठी दोघांनी एकमेकांबरोबर समजुतीने राहणे खूप गरजेचे असते. घर आहे म्हटल्यावर वाद-विवाद, रुसवे-फुगवे असणारच; पण तेही समजूतदारपणे मिटवता आले पाहिजेत. जर समोरचा चिडला तर आपण शांत राहून ते वाद किंवा ती वेळ मारून नेता आली पाहिजे.