वाढत्या विकासाबरोबर आपण चालणेही विसरलो आहोत. जवळपासही कुठे जायचे असेल तरीही आपल्याला रिक्षा, टॅक्सी किंवा स्वत:चे वाहन लागते. चालणे टाळल्यामुळे अनेक विकारांचा सामना करावा लागत आहे.
मात्र नव्या संशोधनानुसार दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे 50 टक्के विकार कमी होतात. 65 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी तर चालणे वरदानच आहे. अशा व्यक्तींनी दररोज चालले तर हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने घटू शकेल, असे हे संशोधन सांगते.
65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या व्यक्तींना बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी जडतात. जसे हृदयविकार, मधुमेह, पक्षघात, स्थुलता आदी. त्यासाठी त्यांच्या शरीराला चालना देणे आवश्यक आहे. जर चालण्याचा व्यायाम दररोज केला तर या विकारांचे निराकरण होऊ शकते. हृदयविकार तर चालण्यामुळे मोठया प्रमाणात कमी होऊ शकतो.