-डॉ. भावना पारीख
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2017 या बारा वर्षांमध्ये 84 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कॅन्सरची रूपरेषा
फुप्फुसाचा आणि तोंडाचा कर्करोग हा सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो. तर महिलांमध्ये स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होतो. सध्याच्या घडीला भारतात कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक असून तीन दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. भारतात वर्षाला जवळपास 5 लाख लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, या वर्षी ही संख्या 7 लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. प्रतिवर्षी कर्करोगाने मृत्यू होणाऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
तसंच फुप्फुसं, तोंड, ओठ, घसा आणि मानेचा कर्करोग प्रामुख्याने पुरुषांमध्ये तर बहुतांश महिलांमध्ये गर्भाशय, स्तन आणि अंडाशयाचा कर्करोग आढळतो. भारतात प्रामुख्याने मूत्रपिंड, पुरुषांचे जननेंद्रिय, आतड्यांचा कर्करोग वृद्ध पुरुषांना तर गर्भाशयाचा कर्करोग हा वृद्ध महिलांना होतो. बाकीचे बहुतांश कर्करोग हे वयाच्या 32 ते 35 या वयोमर्यादेत होतात. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 300हून अधिक कर्करोग निदान संस्था असून त्यापैकी 40 संस्थांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. 2020 पर्यंत भारतात 600 कर्करोग निदान संस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे.
स्तनांचा कर्करोग
गेल्या काही वर्षांत स्तनांचा कर्करोग हा तरुण वयातच होण्याचं प्रमाण अधिक वाढलेलं दिसतंय. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. पूर्वीपेक्षा हे प्रमाण अधिक वाढलं आहे. अलीकडे याकडे लक्ष केंद्रित केल्याने काही रुग्ण प्रगतिपथावर आहेत. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हा कर्करोग बरा होण्याची शक्यता असते. यासाठी नियमित एक तास स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या 20 वर्षीपासूनच योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून या कर्करोगाचं निदान लवकर होण्यास मदत होईल आणि वेळीच उपचार केल्याने एखादीला नव्याने जीवनाची संधी मिळू शकते.
जगभरातील महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमुख कारण स्तनांचा कर्करोग हे आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार असं सिद्ध झालं आहे की दर अठ्ठावीस महिलांमधील एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतात स्तनांचा कर्करोग 43 ते 46 या वयादरम्यान होतो. म्हणूनच स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अधिकाधिक जागरूकता कशी निर्माण होईल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
कॅन्सरची रूपरेषा आणि उपचार (भाग-1)