– डॉ. तेजल लाठीया
मातृत्वासाठी प्रयत्न करणा-या कोणत्याही स्त्रीसाठी मधुमेह हा अडसर असता कामा नये. मात्र डायबेटिस मेलिटस असलेल्या स्त्रियांनी एका गोष्टीची नोंद घ्यायला हवी की, त्यांना आपल्या बाळांना स्तनपान देता येण्याची शक्यता कमी असू शकेल. विशेषत: गरोदरपणाच्या काळा त त्यांनी इन्सुलिन इंजेक्शन्सच्या रूपात उपचार घेतले असतील तर ही गोष्ट अधिक लागू होते. यशस्वी लॅक्टेशनसाठी गायनॅकोलॉजिस्ट आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट यांनी एकत्रितपणे आणि अत्यंत लक्षपूर्वक केलेल्या प्रयत्नांची गरज भासते.
बाळाच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी सर्व स्त्रियांनी बाळांना केवळ स्तनपान द्यावे ही शिफारस जगभर केली जाते. स्तनपानाचे फायदे जसे बाळाला मिळतात तसेच ते आईलाही मिळतात. स्तनपानामुळे शरीराचे ग्लुकोज आणि लिपिड मेटॅबॉलिझम म्हणजे शर्करा आणि स्निग्धांशांच्या चयापचयाची क्षमता वाढते. स्तनपानाच्या काळामध्ये इन्सुलिनप्रती शरीराची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेची व लिपिडची पातळी खाली येते; प्रसूतीनंतर वजन कमी होण्यासही स्तनपानाची मदत होते.
म्हणूनच गरोदरपणात गर्भावस्थेशी निगडित मधुमेहाचा (जेस्टेशनल डायबेटिस) त्रास सुरू झालेल्या स्त्रियांच्या रक्तातील सारखेची पातळी एकदा स्तनपान सुरू झाले की, कोणत्याही औषधोपचाराशिवाय चटकन सामान्य पातळीवर येते. अर्थात अशा स्त्रियांना भविष्यात टाईप2 डायबेटिस होण्याचा धोका अधिक असतो. (गर्भावस्थेशी निगडित मधुमेह असलेल्या एकूण स्त्रियांपैकी 50-90% स्त्रियांना प्रसूतीनंतर दहा वर्षांच्या आत टाईप 2 डायबेटिसचा त्रास सुरू होतो). मात्र केवळ 1-2 महिन्यांच्या स्तनपानाने हा धोका 40-60 टक्क्यांनी कमी होतो.
स्तनपान दिलेल्या स्त्रियांच्या तुलनेत, ज्या स्त्रियांनी कधीही स्तनपान दिलेले नाही अशा स्त्रियांना, उच्च रक्तदाबाचा धोका दुपटीने जास्त असतो, वजन वाढण्याचा धोका तीनपट अधिक असतो. तर टाइप 2 डायबेटिस जडण्याचा धोका 6 पटींनी जास्त असतो. तेव्हा, केवळ काही महिन्यांच्या स्तनपानाचा स्त्रीच्या चयापचय यंत्रणेच्या आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो, असे दिसते.
भारताच्या आरोग्यव्यवस्थेवर टाइप 2 डायबेटिस मेलिटस आजाराचा आधीच मोठा भार आहे, त्यात अलीकडे गर्भधारणेचे वय पुढे पुढे सरकत आहे, परिणामी टाइप 2 डायबेटिस असलेल्या स्त्रिया कधी नव्हे इतक्या अधिक संख्येने मातृत्वाचा निर्णय घेत आहेत. डायबेटिस मेलिटसवर चांगले नियंत्रण नसेल तर त्याचा बाळाचे हृदय, पाठीचा मणका आणि मेंदू यांवर विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मातृत्वाचे नियोजन करण्याआधीच एंडोक्रिनोलॉजिस्टचा सल्ला घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण शक्य तितक्या सामान्य पातळीवर आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मधुमेहावरील उपचारासाठी तोंडावाटे औषधे घेणा-या स्त्रियांना हे औषध इऩ्सुलिनच्या रूपात घेण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल. कितीही काळापासून मधुमेहाचा त्रास असलेली कोणतीही स्त्री गरोदर राहण्याचा निर्णय घेऊ शकते, मात्र त्यासाठी गरोदरपणाच्या काळात गंभीर रूप धारण करू शकतील अशा मधुमेहजन्य गुंतागुंतींची शक्यता नसल्याची खातरजमा करून घ्यायला हवी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुरक्षित पातळीवर आणायला हवे.
बहुतांश स्त्रियांची गरोदरपणाच्या काळात इन्सुलीन इंजेक्शन्स घ्यायला हरकत नसते, मात्र स्तनपानाच्या काळात इन्सुलीन घेणे हे नवमातांसाठी एक खडतर आव्हान बनते. बाळाच्या स्तनपानाची वेळ, त्याचे झोपेचे वेळापत्रक आणि स्वत:च्या गरजा सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी वारंवार इंजेक्शन्स घ्यावी लागतात व नियमितपणे साखरेचे प्रमाण तसेच ते खाली घसरण्याचा धोका यांची तपासणी करत रहावी लागते. प्रसूतीपश्चात स्त्रिया मेटफॉर्मिन (Metformin) आणि ग्रायपिझाइड/ग्लायेबेनक्लॅमाइड (Glipizide/ Glibenclamide) यांसारखी तोंडावाटे घ्यायची औषधे सुरक्षितपणे घेऊ शकतात.
दुधामध्ये त्यांचा अंश अगदीच नगण्य प्रमाणात उतरतो. मेटफॉर्मिन औषधाच्या मात्रेच्या केवळ 0.3% हून अधिक तर ग्लायबेनक्लॅमाइड औषधाच्या मात्रेच्या केवळ 1.5% पेक्षा अधिक अंश मातेच्या दुधामध्ये उतरत नाही. याचा अर्थ या औषधांमुळे बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासारख्या दुष्परिणामांचा धोका संभवत नाही. गोळ्या घेण्यामुळे स्त्रियांचा गोंधळ कमी होतो, साखरेवर चांगले नियंत्रण राहते आणि माता व बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते.