पुणे – स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणारा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. दुर्दैवाने दिवसेंदिवस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करत असताना दुसरीकडे स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा कशी करता येईल आणि उपचारामुळे होणारे दुष्परिणाम कसे कमी होतील, त्याकडे लक्ष केंद्रित केले जात असल्याचे तज्ज्ञांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.
रुबी हॉल क्लिनिकच्या रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ. मानसी मुन्शी म्हणाल्या, स्तनाच्या कर्करोगाचा उपचार घेणाऱ्या महिलांपैकी 90 टक्के महिलांना शस्त्रक्रियेनंतर रेडिओथेरपीची गरज भासते. जेणे करून मूळ स्थानावर पुन्हा कर्करोग होण्यापासून प्रतिबंध होण्यास मदत होते आणि जीवनकाळ सुधारण्यास मदत होते. रेडिओथेरपीचे चांगले परिणाम होतात.
मात्र, काही बाबतीत विशेष करून डावीकडच्या बाजूला झालेल्या स्तन कर्करोगांच्या बाबतीत याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. मात्र आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक रेडिओथेरपीद्वारे दुष्परिणाम कमी होत आहे. डीप इन्स्पिरेटरी ब्रेथ होल्ड (डीआयबीएच) या तंत्रामुळे हृदयाकडे जाणारा डोस 75 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.