बद्धहस्त गोमुखासन हे बैठकस्थितीतील ध्यानात्मक आसन आहे. बद्ध म्हणजे बांधलेले. इथे बद्धहस्त म्हणजे बांधलेले हात. गोमुखासनात हात एकमेकांत अडकवून हे आसन केले जाते. म्हणून याला बद्धहस्त गोमुखासन म्हणतात. ( gomukhasana benefits )
आसन करताना बैठकस्थिती घ्यावी. उजव्या पायाची पोटरी व मांडी थोडी उचलून व डावा पाया गुडघ्यात वाकवून डावी टाच उजव्या नितंबा शेजारी जमिनीवर ठेवावी. मात्र त्यावर बसू नये. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाची टाच डाव्या नितंबाशेजारी ठेवावी. दोन्ही टाचा नितंबाना टेकून असाव्यात. डाव्या गुडघ्यावर उजवा गुडघा येऊ द्यावा. आता उजवा हात वर उचलावा. तो डोक्याच्या दिशेने ताणावा. मग तो कोपरात वाकवावा व तळहात पाठीमागे नेऊन दोन्ही खांद्याच्या मधे ठेवावा. डावा हात कोपरात वाकवावा. डाव्या बाजूने पाठीकडे न्यावा व तळहात पाठीला लावावा व दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवावी. पाठ ताठ करून श्वसन संथ ठेवावे.
आसनस्थिती सोडताना गोमुखासनात पाठीमागे अडकवलेली हाताची बोटे सोडवून उजवा हात पूर्वस्थितीत आणावा. मग डावा हात पूर्वस्थितीत न्यावा. डावा पाय सरळ न्यावा. उजवा पाय सरळ करून बैठक स्थितीत यावे. गोमुखासनात जो गुडघा वरती तो हात पाठीमागे वरून खाली व दुसरा हात पाठीमागे खालून वर नेऊन हातांच्या बोटांची पकड करावी. आदर्श गोमुखासनात वरच्या हाताचा दंड मान, व डोक्याच्या मागे असावा. डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस कलता नको. मान सरळ असावी. पुढे झुकलेली पण नसावी.
फुप्फुसातील नाजूक वायू कोष या आसनात बऱ्याच प्रमाणात ताणले जातात. त्यामुळे कोणी कोणी या आसनात दीर्घ श्वसनाऐवजी उज्जयी प्राणायाम करतात. कालावधी 10 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंत वाढवता येतो. या आसनाचे अनेक फायदे आहेत. प्रथमतः आपली श्वसन क्षमता वाढते. पाठीच्या कण्यातील दोष दूर होतात. दमा, क्षय या व अन्य श्वासन विकारांवर हे आसन करावे. ज्यांना सतत क्रॅम्स येतात त्यांनी हे आसन रोज करावे.
खांदे व कंबरेचे स्नायू सूखावह ताणामुळे कार्यक्षम बनतात. मधुमेही संधिवात झालेल्यांनी हे आसन रोज करावे.बद्धहस्त गोमुखात काही वेळा वृषणावर दाब येतो. तो येऊ नये याची काळजी घ्यावी. आसन घाईघाईने करू नये व घाईघाईने सोडू नये. त्यामुळे नितंबाचा भागसुद्धा दुखावला जाऊ शकतो. यात योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.( gomukhasana benefits )