पुणे – अनेक गंभीर व्याधी आपल्याला शरीरात प्रवेश केल्यानंतरच कळतात. त्यामुळे आपल्या शरीराची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शरीराची संपूर्ण तपासणी करून घेण्यास पाच-सहा हजार रुपये खर्च येतो. हा खर्च करण्यास अनेकांची तयारी नसते. मात्र, एकदाच हा खर्च करून आपण अनेक गंभीर व्याधींवरच्या उपचाराचा खर्च वाचवू शकतो हे लक्षात ठेवा.
भूक लागणे हे आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आवश्यकच आहे; परंतु जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल, तहान लागत असेल, तुमची जखम भरून यायला वेळ लागत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार तहान-भूक लागणे, जखमा लवकर भरून न येणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत. मधुमेहाचा शरीरातील प्रवेश चोरट्या पावलांनी होतो. अनेक आजार आपली लक्षणे पूर्वीच जाणवून देतात. मात्र मधुमेहाचे तसे नाही. मधुमेह ही व्याधी आपल्या शरीरात केव्हा नकळत प्रवेश करते हे रूग्णाला कळूनच येत नाही. सध्याच्या काळात मधुमेह ही अत्यंत गंभीर व्याधी समजली जाते. आधुनिक जीवनशैलीमुळे या व्याधीवर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन बसले आहे.
करिअरच्या तीव्र स्पर्धेत आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. नियमित व्यायाम न करणे आणि अयोग्य आहार घेणे यामुळे आपल्या शरीराचे हळूहळू मोठे नुकसान होत असते. दैनंदिन जीवनातील वेगवेगळी आव्हाने पेलत असताना आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्ष्यामुळे आपण अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत असतो. खरे तर अशा गंभीर आजारांचे संकेत शरीराकडून आपल्याला दिले जातात. मात्र आपण या संकेतांचा अर्थ ओळखण्यास असमर्थ ठरतो. त्यामुळे आपल्याला अचानक मोठ्या व्याधीला तोंड द्यावे लागते. याकरिता आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे आवश्यक असते.
संपणू आरोग्य तपासणीच्या सुविधा अनेक रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. आपण व्यवस्थित चालतो फिरतो आहोत म्हणजे आपल्याला कसलाच आजार नाही, अशी समजूत करून घेत आपण शरीराची संपूर्ण तपासणी करून घेण्याकडे लक्षच देत नाही.
शरीराची संपूर्ण तपासणी करून घेतली तर मधुमेहासारख्या चोरट्या मार्गाने शरीरात शिरणाऱ्या व्याधींचा तपास लागतो. आपल्याला होणारे अनेक किरकोळ आजार, दुखणी आपण औषध विक्रेत्याने सांगितलेली गोळी घेऊन दूर करत असतो. मात्र या आजारामागे नेमके कोणते कारण आहे, हे जाणून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. जेव्हा आपण एखाद्या आजारामुळे अंथरूणाला खिळून पडतो, तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो. त्या स्थितीत आपल्यापुढे डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्यावर अशी वेळ ओढवलेली असते. जर आपण आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर आपला औषधोपचाराचा खर्च वाचला असता, ही गोष्ट आपण विचारातच घेत नाही. वर्षातून एकदा तरी शरीराची संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे.
मुत्र, शर्करा आणि रक्ताच्या तपासणीतून अनेक गंभीर व्याधींचे निदान होऊ शकते. अशा तपासणीतून जर आपली प्रकृती ठणठणीत आहे असे दिसून आले तर आपल्या मनाला आपोआपच समाधान मिळते. समजा अशा तपासणीतून आपल्याला काही व्याधी झाल्याचे निदान झाले तर त्यातून त्या व्याधीवर तातडीने उपचार करणे सोयीचे जाते. सुरूवातीच्या स्थिती त्या आजारावर उपचार केले गेले तर, तो आजार लवकर बरा होण्यास मदत होते.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ः
1) वारंवार तहान-भूक लागणे ः जर तुम्हाला सारखी तहान लागत असेल, भूक लागत असेल तसेच वारंवार लघवीला जावे लागत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. काही जणांच्या जखमा भरून येण्यास खूप वेळ लागतो. अशी लक्षणे आपल्यात आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडून शरीराची तपासणी करून घ्या. ही लक्षणे मधुमेहाची असू शकतात. रक्ताची चाचणी केल्यावर आपल्याला मधुमेह आहे की नाही, हे कळू शकते.
2) छातीत आणि पोटाच्या वरच्या भागात दुखणे ः छातीत वारंवार दुखत असेल किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे हृदय रोगाची असू शकतात. काही जणांना जेवण केल्यानंतर पोटाच्या वरच्या भागात दुखू लागते. अशी लक्षणे आढळल्यास ईसीजी काढून हृदयाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
3) डोकेदुखी ः बराच वेळ डोके दुखत असेल तर ते उच्च रक्तदाब, डोळे खराब होणे आणि स्पॉंडिलायटीसचे लक्षण मानले जाते. त्यामुळे वारंवार दीर्घकाळासाठी डोके दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याकरिता आपल्या शरीराचा एक्स-रे काढणे आणि रक्तदाब तपासणे आवश्यक असते. त्यानंतर आपल्यावर आवश्यक ते उपचार केले जातात.
4) भूक न लागणे, वजन कमी होणे ः काही जणांना भूक न लागण्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते. भूक न लागणे आणि त्याचवेळी वजनही कमी होणे, अशक्तपणा जाणवणे, संध्याकाळच्या वेळेला बारीक ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. ही लक्षणे क्षयरोगाची (टीबी) असू शकतात. खोकला झाला तरच ते टीबीचे लक्षण असते असे समजू नका. जर फुफ्फुसात क्षय रोग झाला असेल तरच आपल्याला खोकला होतो. शरीराच्या दुसऱ्या भागात क्षयरोग झाला असेल तर आपल्याला खोकला येत नाही.
5) हाडे वारंवार दुखणे ः तुमची हाडे जर वारंवार दुखत असतील तर त्याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमिन “डी’ची कमतरता आहे. या समस्येवर आज उद्या उपचार करू अशी चालढकल केली तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. शहरी जीवनशैलीत अनेकांना सुर्यप्रकाशात जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू लागते. दिवसभर वातानुकूलीत कार्यालयात काम करणे आणि संध्याकाळी घरी परतणे अशा वेळापत्रकामुळे आपल्याला सूर्यप्रकाशाचा अनुभव शहरी जीवनात कधी घेताच येत नाही. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे दुखू लागतात. त्यामुळे असे लक्षण जाणवल्यास डॉक्टरांना तातडीने भेटा. कोणी तरी सांगितले म्हणून व्हिटॅमिन डी आहारातून घेण्याचा प्रयत्न करू नका.
6) तंदुरुस्त राहण्यासाठी आहार असा असावा ः त्या त्या हंगामानुसार फळे खावीत. त्याचबरोबर सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आहारात असल्याच पाहिजेत. व्हिटॅमिन, मिनरल आणि कार्बोहायड्रेट यांचा समावेश आहारात संतुलित प्रमाणात असला पाहिजे. मांसाहार घेण्यास काहीच हरकत नाही मात्र हा आहार प्रमाणातच घ्यावा.
अनेकदा आरोग्याची तपासणी न करून घेण्यामागे आपल्याला यासाठी येणाऱ्या खर्चाची भिती वाटत असते. शरीराच्या संपूर्ण तपासणी करता तीन ते पाच हजार रुपये एवढा खर्च येतो. वर्षभरात एकदाच हा खर्च करावयाचा आहे. मात्र हा खर्च वेळीच केला तर भविष्यात आपला एखाद्या व्याधीच्या उपचारावर करावा लागणारा खर्च वाचणार आहे, हे डोक्यात ठेवा. शरीराच्या संपूर्ण तपासणी करता अधिक पैसे खर्च होतील या भितीने तपासणी करणे टाळू नका. तपासणी करून घेताना रक्त, रक्तशर्करा, रक्तदाब, यकृत यांची तपासणी करून घ्यावी.
रक्त तपासणी मुळे आपल्या शरीरात रक्ताची कमतरता आहे का? हे कळू शकते. त्याचबरोबर ब्लड कॅन्सर सारख्या व्याधीचे निदान पहिल्याच टप्प्यात होऊ शकते. रक्त शर्करा तपासणीमुळे तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कळू शकते. लिपिड प्रोफाईलमुळे शरीरात किती चरबी आहे, तसेच कोलेस्टरॉलची पातळी किती आहे, हे कळू शकते. यकृताबरोबरच मुत्रपिंडाचीही तपासणी करून घ्या. जर आपल्या गळ्याला सूज आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. गळ्याला सूज येणे हे थायरॉईड आणि गॉयटरचे लक्षण समजले जाते. शहरी भागात आयोडिनच्या कमतरतेमुळे गॉयटर होतो.
महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता अधिक असते. क्षयरोगासारख्या व्याधीचा तपास छातीच्या एक्स-रे मुळे लागू शकतो. ज्या व्यक्ती दीर्घकाळ धूम्रपान करित असतात, अशा व्यक्तींना फुफ्फुसाचा कर्करोग अथवा क्षयरोग होण्याची शक्यता असते. ईसीजी चाचणीमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य कसे आहे हे कळू शकते. या तपासणीमुळे हृदय रोगावर वेळीच उपचार करणे सोपे जाते. जर तुमच्या शरीराल संसर्गजन्य रोगाची बाधा झाली असेल तर ती गोष्ट आपल्याला मुत्र तपासणीमुळे तसेच विष्ठेच्या (स्टूल) तपासणीमुळे करू शकते. महिलांकरिता ही चाचणी आवश्यक असते. महिलांमधील तसेच लहान मुलांमधील कॅल्शियमचे प्रमाण विष्ठेच्या तपासणीमुळे कळू शकते.
– डॉ. प्राजक्ता पाटील